घरमहाराष्ट्रकोकणKashedi Ghat Tunnel : कशेडी बोगद्यात पाणीगळती

Kashedi Ghat Tunnel : कशेडी बोगद्यात पाणीगळती

Subscribe

कशेडी बोगद्याच्या अर्धवर्तुळाकार असलेल्या खडकांमधून रस्त्यावर पाणी गळते आहे. या पाण्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर फटी रुंदावून मोठी पाणीगळती होण्याची भीती व्यक्त केली जाते.

पोलादपूर : सत्ताधाऱ्यांची उदासीनता, प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, लोकप्रतिनिधींची अनास्था त्यात प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची पडलेली भर याचे वास्तव म्हणजे मागील चौदा वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग. रखडलेल्या रस्त्याची गिनीज बुकात नोंद व्हावी, इतके या महामार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया कोकणवासीयांकडून केली जाते.

कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यांच्या ७६० किलोमीटर अंतरात लहान-मोठे ९१ बोगदे सर्वसुविधांनी युक्त असे बांधण्यात आले आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे बांधत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा प्रकल्पाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग चार वर्षे उलटली तरी पूर्ण करू शकलेली नाही. जनतेच्या रेट्यामुळे यंदा २५ फेब्रुवारीपासून एका बोगद्यातून कोकणच्या दिशेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी बोगद्याच्या अर्धवर्तुळाकार असलेल्या खडकांमधून रस्त्यावर पाणी गळते आहे. या पाण्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर फटी रुंदावून मोठी पाणीगळती होण्याची भीती व्यक्त केली जाते.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Mahad Helipad : महाडमधील हेलिपॅड का विकलं?

या पाणीगळतीकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग महाड कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. एखाद्या मंत्रीमहोदयांचा दौरा असेल तेव्हाच या विभागाच्या अधिकाऱ्यांचे चेहरे दिसून येतात, या शब्दात लोक प्रतिक्रिया देत आहेत. सध्या कशेडी घाटात मुंबईच्या दिशेकडील बोगद्याचे बांधकाम सुरू आहे. पोलादपूर तालुक्यातून जाणारा महामार्ग १८ किलोमीटरचा असून कशेडी घाटात जेथे हा महामार्ग नवीन चौपदरी रस्त्याला दत्तवाडी येथे जोडला जात आहे त्या ठिकाणी दोन पूल आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर या पुलांची कामे आता संबंधित ठेकेदाराकडून सुरू करण्यात आली आहेत. इतक्या संथगतीने कामे केल्यास संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होईल, असा सवाल विचारला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Election Helpline EPIC : साहेब, मतदार ओळखपत्र कधी मिळेल?

खडकातून पाणीगळती ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे पाणी खडकाला छिद्र पाडून एकत्ररित्या दोन्ही बाजूच्या गटारात आणण्याचे काम कशेडी गावाच्या बाजूला सुरू आहे. वायुविजन आणि लाईट (वीज) तसेच पुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येतील. तसेच दुसऱ्या बोगद्याचे काम ऑगष्टपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहिती प्रकल्पाचे कंत्राटदार शिंदे डेव्हलपर्स कंपनीचे कशेडी बोगदा प्रकल्प अधिकारी अमोल शिवतरे यांनी दिली. चार-पाच दिवसांत बोगद्यातील पाणीगळतीवर उपाययोजना करण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे महाडचे शाखा अभियंता अमोल महाडकर यांनी दिली आहे.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -