घरमुंबईडीपीवरील फोटोवरून चक्क चोर सापडला

डीपीवरील फोटोवरून चक्क चोर सापडला

Subscribe

नातेवाईकाला चोरीचा माल देणे मोलकरणीला पडले महाग

घरकाम करताना मोलकरणीने आपल्या मालकिणीचा पाच तोळ्याचा सोन्याचा हार चोरला. ही चोरी पचून जाईल, असे तिला वाटत होते. पण श्रीमंती दाखवण्याची हौस मोलकरणीला आवरता आली नाही, त्यामुळेच तिचे पितळ उघडे पडले. मालकिणीचा चोरलेला महागडा हार आपल्या नातेवाईक महिलेला घालायला दिला. तिने हार घातला आणि फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीवर टाकला. मात्र त्या फोटोने मोलकरणीची पोलखोल केली. मालकिणीने फोटोतला तो हार ओळखला आणि त्या मोलकरणीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मूळची पश्चिम बंगालची असलेली रिटा गोराई (40) ही महालक्ष्मी सात रस्ता येथील एका व्यावसायिकाकडे मागील काही वर्षांपासून मोलकरीण म्हणून कामाला होती. सन 2016 मध्ये रिटा काम करत असलेल्या व्यावसायिकाच्या पत्नीचा महागडा पाच तोळ्यांचा सोन्याचा हार (नेकलेस) हरवला. त्यांनी आपला हार घरात शोधला. मात्र तो सापडला नाही. आपणच तो कुठेतरी ठेवला असेल, आजचा ना उद्या मिळेल असे समजून मालकिणबाईंनी शोध घेणे बंद केले. तब्बल दोन वर्षांनंतर मागच्या आठवड्यात सहज म्हणून मालकिणबाईंनी रिटाचा मोबाईल चाळला. रिटाच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, फोटो चाळले.

- Advertisement -

त्या दरम्यान रिटाच्या एका नातेवाईक महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीतील फोटोवर त्यांचे लक्ष गेले. मालकिणीने डीपीवरील तो फोटो मोठा करून बारकाईने बघितला. तेव्हा त्या फोटोमधील महिलेच्या गळ्यात असलेला सोन्याचा हार हरवलेल्या हाराशी मिळताजुळता असल्याचे त्यांना जाणवले. तो हार आपलाच असल्याची त्यांची खात्री झाली.याबाबत मोलकरीण रिटाला काहीही कळू न देता मालकिणीने आपल्या पतीसोबत चर्चा केली. हार हरवलेला नसून तो मोलकरीण रिटा हिनेच चोरल्याचा त्यांचा संशय बळावला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी त्यांनी थेट आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी रिटाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. मात्र रिटाने कानावर हात ठेवले.पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यावरून रिटाला अटक केली. ज्या महिलेने तो हार घातला होता, ती पश्चिम बंगालमध्ये रहात असून ती रिटाची चुलत बहीण आहे. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता, तो सोन्याचा हार रिटानेच मला तात्पुरता लग्नात घालण्यासाठी दिला होता, अशी माहिती तिने दिली. आग्रीपाडा पोलिसांनी पश्चिम बंगाल येथे राहणार्‍या रिटाच्या नातेवाईक महिलेच्या घरातून चोरीला गेलेला सोन्याचा हार हस्तगत केला. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -