घरमुंबईआडवे याल तर तुरुंगात जाल!

आडवे याल तर तुरुंगात जाल!

Subscribe

मेट्रो प्रोजेक्टला विरोध करणार्‍यांविरूद्ध फर्मान

राज्य सरकारचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ठरलेल्या मुंबईतल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात येणार्‍यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. या प्रकल्पांना विरोध केल्यास तुरुंगात जाल, असा दम संबंधित आंदोलकांना भरण्यात आला आहे. आजवर प्रकल्पांच्या विरोधकांवर कारवाईसाठी शासनाला पुढाकार घ्यावा लागत होता. आता ते अधिकार संबंधित प्रकल्पाच्या कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. कंत्राटदाराची तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून संबंधितांविरोधी थेट कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शासनाकडून संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे विणण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. शासनाचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून त्याचे काम जोरात सुरू आहे. मुंबईत भूमिगत मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून अनेकांना या कामाचा त्रास होत आहे. त्याबाबतच्या तक्रारी संबंधित विभागाकडे लेखी स्वरूपात आलेल्या आहेत.मेट्रोचे काम सुरू असताना कंत्राटदार, कामगार यांना अनेकांनी त्रास देऊन काही ठिकाणी मेट्रोच्या कामात अडथळा आणून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केले. परंतु या पुढे मेट्रोच्या कामात जो कोणी अडथळा आणेल त्याच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. हे आदेश कागदोपत्री नसले तरी या आदेशाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आलेली आहे. या प्रकरणी अनेकावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

हा शासनाचा प्रोजेक्ट असून त्यात कोणीही अडथळा निर्माण करता कामा नये, अशा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून देण्यात आलेल्या आहेत.पोलीस ठाण्याकडून ही सूचना तंतोतंत पाळली जात असून मेट्रोच्या कामात अडथळा आणणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे. याबाबत वरिष्ठ पोलिसांकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. आमच्याकडे या मेट्रोच्या संबंधित कुठलीही तक्रार आल्यावर आम्ही तक्रारीची शहानिशा करून त्यानंतर कारवाई करीत असल्याचे एका पोलीस अधिकार्‍याने म्हटले आहे.

मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झालेले असून त्यात काही स्थानिक पुढार्‍यांचा समावेश आहे. ज्या विभागात मेट्रोचे काम सुरू आहे त्या विभागातील काही पुढारी आम्हाला या कामात सामावून घेण्यात यावे, मेट्रोचे लहान मोठे काम आम्हाला मिळावे म्हणून धडपड करीत असतात,त्यामुळे मेट्रोच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे प्रकार यातूनच होत आहेत.

- Advertisement -

मुंबईकरांच्या भविष्यासाठी मुंबई मेट्रोचे काम सुरू करण्यात आलेले आहे, मात्र काही विघ्नसंतोषी असतात. त्यांना चांगले झालेले बघवत नाही, तेच या कामात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याविरुद्ध तक्रार आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.-पोलीस अधिकारी

दोन दिवसापूर्वी कुर्ला पूर्व येथे मेट्रोच्या कामासाठी पत्रे टाकण्याचे काम सुरू होते. त्या वेळी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आणि त्याच्या दोन कार्यकर्त्यांनी मेट्रोच्या कंत्राटदारांसोबत हुज्जत घातली होती. त्यांच्यात धक्काबुक्की होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत येऊन ठेपले होते, मात्र स्थानिकांच्या मध्यस्थीमुळे ते टळले. परंतु कंत्राटदाराने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली, या तक्रारीची ताबडतोब दखल घेऊन पदाधिकार्‍यांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पदाधिकार्‍यांचे म्हणणे हेच होते की, तुम्ही पत्रे टाकताना अगोदर रस्त्यावरील खड्डे बुजवा म्हणजे वाहतूक कोंडी होणार नाही.– स्थानिक कार्यकर्ता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -