घरमुंबईतीन लाख रुपयांच्या बोगस नोटासह दोघांना अटक

तीन लाख रुपयांच्या बोगस नोटासह दोघांना अटक

Subscribe

तीन लाख रुपयांच्या बोगस नोटांसह दोघांना बुधवारी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. असाउल मुसा कलीम शेख आणि असीम राबन कर्मकार अशी या दोघांची नावे असून ते दोघेही पश्चिम बंगालच्या मालदा शहराचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बोगस नोटा जप्त केल्या आहेत. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानाजवळ काही तरुण बोगस नोटांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट तीनच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्‍यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी सायंकाळी तिथे असाउल शेख आणि असीम कर्मकार हे दोघेही आले होते, या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पोलिसांना सुमारे तीन लाख रुपयांच्या बोगस नोटा सापडल्या. त्यात पाचशे रुपयांच्या बारा आणि दोन हजार रुपयांच्या 147 नोटा सापडल्या.

- Advertisement -

पोलीस तपासात त्यांनी त्या नोटा पश्चिम बंगाल येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणल्या होत्या. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळणार होते. बोगस नोटा बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -