घरमुंबईज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांचे निधन

Subscribe

ज्येष्ठ पत्रकार आणि दोपहर का सामनाचे ज्येष्ठ सहाय्यक संपादक प्रेमचंद शर्मा यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.

ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक दोपहर का सामना वृत्तपत्राचे ज्येष्ठ सहाय्यक संपादक प्रेमचंद शर्मा यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. प्रेमचंद शर्मा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, स्नुषा, नातू असा परिवार आहे.

अत्यंत मनमिळाऊ आणि सर्वांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे अशी प्रेमचंद शर्मा यांची ओळख होती. शर्मा रविवारी सकाळी घरामध्ये फेर्‍या मारत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारांसाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शीव हिंदू स्मशानभूमीमध्ये दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय क्षेत्रातील शर्मा यांचे मित्रपरिवार सहभागी झाले होते. शर्मा यांच्या अकस्मात निधनाने त्यांच्या मित्रमंडळीमध्ये शोककळा पसरली आहे. सोमवारी नाशिक येथे त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात येणार आहेत. तर दशक्रिया विधी २६ जून रोजी प्रतीक्षा नगर येथे त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.

- Advertisement -

प्रेमचंद शर्मा..एक व्यासंगी व्यक्तिमत्व!

प्रेमचंद शर्मा हे तीन दशकांपासून ‘दोपहर का सामना’मध्ये कार्यरत होते. ज्येष्ठ सहाय्यक संपादक म्हणून सध्या ते कार्यरत होते. प्रेमचंद शर्मा यांचे हिंदीबरोबरच मराठी भाषेवरही प्रभुत्त्व होते. त्यांनी हिंदीतील अनेक लेखन साहित्याचे मराठीमध्ये आणि मराठीतील लेखनाचे हिंदीमध्ये अनुवाद केले आहेत. शर्मा हे विधीमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई हिंदी पत्रकार संघ आणि प्रेस क्लबचे सदस्य होते. त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनांसोबत ते जोडलेले होते. ‘आपलं महानगर’चे मुख्य वार्ताहर सौरभ शर्मा हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -