घरमुंबईऐन गणेशोत्सव काळात; खड्ड्यांवरून होणार खडाजंगी

ऐन गणेशोत्सव काळात; खड्ड्यांवरून होणार खडाजंगी

Subscribe

न्यायालयानेही खड्ड्यांवरून महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. तरीही रस्त्यांवर खड्डे नसल्याचा दावा पालिका करत आहे. हा दावा बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने खोडून काढला आहे. वारंवार तक्रारी करूनही पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समितीकडून केला जात आहे.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून पालिकेवर नेहमीच टीका होत आली आहे. न्यायालयानेही खड्ड्यांवरून महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. तरीही रस्त्यांवर खड्डे नसल्याचा दावा पालिका करत आहे. हा दावा बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने खोडून काढला आहे. वारंवार तक्रारी करूनही पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समितीकडून केला जात आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात महापालिका आणि समन्वय समिती यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. उत्सव साजरा करण्यापूर्वी केल्या जाणार्‍या उपाययोजनांबाबत महापौर, पालिका आयुक्त व वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आढावा बैठक आयोजित केल्या जातात. या बैठकांमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रारी केल्या जातात. पालिकेकडून कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र रस्त्यांवरील खड्डे बुजवलेच जात नसल्याची तक्रार गणेशोत्सव मंडळांकडून केली जाते. याबाबत पालिकेच्या रस्ते विभागाचे मुख्य अभियंता विनोद चिटोरे यांच्याशी संपर्क साधला असता १० जूनपासून शहरात खड्डे पडल्याच्या सुमारे २ हजार ६१२ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी २ हजार ३९२ तक्रारींची दखल घेण्यात आली असून २२० तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. कोणत्याही गणेशोत्सव मंडळाने पालिकेच्या रस्ते विभाग किंवा वॉर्डकडे खड्ड्यांबाबत एकही तक्रार केलेली नाही, असा दावा चिटोरे यांनी केला आहे.

- Advertisement -

पालिकेने खड्ड्यांबाबत केलेल्या दाव्याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांच्याशी संपर्क साधला असता, समन्वय समिती गेले तीन महिने खड्ड्यांबाबत कार्यशील आहे. मंडळांना आम्ही आवाहन केले आहे. आगमन आणि विसर्जन दिवसाआधी जर रस्त्यावर खड्डे असतील तर त्याची पाहणी करून वॉर्डला कळवावे. काही मंडळांनी तक्रारही केली आहे. अंधेरी कुर्ला रोड, सफेद पूल येथील खड्ड्यांचे फोटो पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे पाठवले आहेत. असे फोटो पालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीतही दाखवण्यात आले आहे. परंतु, अद्याप कार्यवाही झालेली नाही. मी समन्वय समितीचा अध्यक्ष असताना माझ्याच तक्रारींवर कार्यवाही झालेली नाही, मग सामान्य कार्यकर्त्यांच्या तक्रारींवर कार्यवाही होत असेल का, असा प्रश्न दहिबावकर यांनी उपस्थित केला आहे.

विसर्जनाला होणार उशीर
मुंबई महापालिकेने खड्डे बुजवल्याच्या केलेल्या दाव्याबाबत मी सहमत नाही. समन्वय समितीला पर्याय राहिलेला नसल्याने मंडळांना आवाहन केले आहे. ज्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्या रस्त्यावरून मूर्ती नेताना मूर्तीला धक्का लागणार असेल तर खड्ड्यांमध्ये गोणी टाकावी. त्यावर स्टीलची प्लेट टाकावी व त्यानंतर मूर्तीची ट्रॉली न्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जनाला उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा उशीर झाला तर त्यासाठी मंडळांना दोषी न धरता संबंधित प्रशासनाला दोषी धरावे.
– नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -