घरमुंबई२५ वर्षांनंतर सापडला बेपत्ता भाऊ!

२५ वर्षांनंतर सापडला बेपत्ता भाऊ!

Subscribe

१९९४ मध्ये छत्तीसगडमधून बेपत्ता झालेल्या सलीम शेख यांचा तब्बल २५ वर्षांनी शोध लागला.

तब्बल २५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. छत्तीसगडमधील सलीम शेख अचानक बेपत्ता झाले. कुटूंबातील सदस्यांनी त्यांचा खूप शोध घेतला. मुलाच्या परतीची वाट पाहताना आईचे निधन झाले. पण एक समाजसेवी संस्था आणि पोलिसांच्या पुढाकाराने हरवलेले सलीम शेख यांचा शोध लागला. विशेष म्हणजे तब्बल २५ वर्षांनंतर दोन भावांची भेट घडली. रविवारी सकाळी सलीमचा भाऊ जुनेद कल्याणला पोहचला. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात सलीम याला जुनेदला सुपूर्द करण्यात आले. जुनेद यांनी ‘आधार’ संस्थेचे पदाधिकारी आणि पोलिसांचे आभार मानले.

१९९४ सालापासून सलीम शेख बेपत्ता

छत्तीसगड येथील विलासपूरमध्ये राहणारे सलीम शेख यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. १९९४ सालापासून सलीम शेख घरातून अचानक बेपत्ता झाले. त्यावेळी त्यांच्या घरात आई आणि भाऊ जुनेद होता. घरच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी सलीमला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु सलीमचा कुठेच शोध लागला नाही. सलीमची वयोवृद्ध आई मुलाच्या परतीची वाट पाहत होती. पण अखेर तीसुद्धा हे जग सोडून गेली. घरच्यांनीही सलीम परतण्याची आशाच सोडून दिली.

- Advertisement -

‘आधार’ संस्थेचे विनायक आभाळांना आला दूरध्वनी

काही दिवसांपूर्वी ‘आधार’ संस्थेचे पदाधिकारी विनायक आभाळे यांना एका व्यक्तीची दूरध्वनी आला. कल्याणमधील बैलबाजार परिसरात रस्त्यावर एक मनोरुग्ण व्यक्ती पडल्याची माहिती त्या व्यक्तीने आभाळे यांना दिली. विनायक आभाळे कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणले. यावेळी विचारपूस केली असता ती व्यक्ती छत्तीसगड येथे राहत असल्याची माहिती विनायक यांना मिळाली. विनायक आभाळेंनी आपल्या साथीदारांसोबत त्याच्या कुटुंबियांचा शोध सुरु केला. काही उपचार केल्यानंतर या मनोरुग्ण व्यक्तीला डोंबिवलीतील एका संस्थेत दाखल करण्यात आल.

भावाने मानले आभार

दरम्यान विनायक आभाळे यांनी छत्तिसगडचे आयजी यांच्याशी संपर्क साधला. अखेर छत्तिसगड येथील पोलिसांच्या मदतीने सलीमच्या घराचा शोध लागला. रविवारी सकाळी सलीमचा भाऊ जुनेद कल्याणला पोहचला. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात सलीम याला जुनेदला सुपूर्द करण्यात आले. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे ‘आधार’ संस्थेचे विनायक आभाळे आदी उपस्थित हेाते. जुनेद यांनी ‘आधार’ संस्थेचे पदाधिकारी आणि पोलिसांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -