घरमुंबईनगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीत संमिश्र निकाल

नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीत संमिश्र निकाल

Subscribe

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या महाराष्ट्रात वाहू लागले असताना रविवारी श्रीगोंदा नगरपालिका, कर्जत आणि कराड-मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक पार पडली. त्यामध्ये मात्र संमिश्र निकाल दिसून आले. श्रीगोंदा नगरपालिकेवर भाजप, कर्जत नगरपरिषदेवर शिवसेना तर कराड-मलकापूर नगरपरिषदेवर काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकावला.

श्रीगोंदा नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी घोडदौड कायम राखत भारतीय जनता पक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपालिकेवरही वर्चस्व मिळवले. एकूण १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ११ जागा जिंकत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले, परंतु नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे यांचा विजय झाला. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा मात्र तब्बल दीड हजार मतांनी पराभव झाला. पोटे या पूर्वी भाजपमध्येच होत्या. मात्र, ऐनवेळी पक्षांतर करून त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली होती.

- Advertisement -

कर्जत नगरपरिषदेवर शिवसेनेचा विजय
कर्जतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्णा जोशी विजयी झाल्या. गेल्या 25 वर्षांपासून आघाडीकडे असलेली सत्ता खेचून आणत सुवर्णा जोशी 2100 मतांनी विजयी झाल्या. नगरपरिषदेचे 18 सदस्य निवडीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. त्यात शिवसेनेने 4, भाजपने 4 आणि आरपीआयने 1 जागा जिंकली. तर राष्ट्रवादीने आठ जागांवर विजय मिळवला. कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष आणि 18 सदस्य निवडण्यासाठी मतदान घेण्यात आले होते.

कराड-मलकापूर नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा
कराड-मलकापूर नगरपरिषदेवर काँग्रेसने विजय मिळवला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी हे मैदान राखले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही काँग्रेसच्याच नीलम येडगे या विजयी झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसचे १४ तर भारतीय जनता पार्टीचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा थोडक्यात पराभव झाला आणि काँग्रेसच्या नीलम येडगे नगराध्यक्षपदी निवडूण आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -