घरमुंबईलॅपटॉप चोरी करुन बॅग परत करणार्‍या रिक्षाचालकास अटक

लॅपटॉप चोरी करुन बॅग परत करणार्‍या रिक्षाचालकास अटक

Subscribe

रिक्षात प्रवाशाने विसरलेल्या बॅगेतील लॅपटॉप चोरी करुन कपडे असलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न रिक्षाचालकाचा चांगलाच अंगाशी आला. लॅपटॉप चोरीप्रकरणी अखेर या प्रामाणिक रिक्षाचालकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत त्याने चोरीचा लॅपटॉप त्याच्या मेहुण्याला दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. धोंबी कुतहूल साह असे या ३९ वर्रच्या रिक्षाचालकाचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टामध्ये हजर केले असता कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

काय आहे घटना ?

याप्रकरणातील तक्रारदार ठाण्यातील टिजेएसबी सहकारी बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला असून बँकेच्या कामासाठी त्यांना बँकेने एक एचपी कंपनीचा लॅपटॉप दिला होता. शुक्रवारी १४ जूनला ते बँकेच्या कामासाठी गोवा येथे गेले होते. दुसर्‍या दिवशी काम संपल्यानंतर ते सांताक्रुज विमानतळावर आले. यावेळी घरी जाण्यासाठी त्यांनी एक रिक्षा घेतली होती. ही रिक्षा जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवरुन मिलिंद नगरजवळ आली असता त्यांनी ती रिक्षा थांबविली. त्यानंतर ते पाण्याची बाटली घेण्यासाठी दुकानात गेले होते. याच दरम्यान रिक्षाचालक तेथून निघून गेला होता. त्यांनी दोन तास रिक्षाची वाट पाहिली. मात्र रिक्षाचालक परत आला नाही. त्यामुळे त्यांनी विमानतळवरील पोलीस चौकीत धाव घेऊन तिथे घडलेला प्रकार सांगितला.

- Advertisement -

प्रामाणिकपणे बॅग दिली मात्र लॅपटॉप चोरला

या घटनेनंतर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांना रिक्षाचा क्रमांक सापडला. मंगळवारी विमानतळ पोलिसांना ही बॅग मिळाली होती. तपासानंतर याच रिक्षाचालकाने विलेपार्ले पोलीस ठाण्यात सकाळी सात वाजता येऊन ही बॅग परत केली होती. त्यानंतर ही माहिती तक्रारदारांना देण्यात आली. त्यांनी बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात फक्त त्यांचे कपडे होते. मात्र एचपी कंपनीचा लॅपटॉप नव्हता. रिक्षाचालकाने लॅपटॉपची चोरी करुन कपडे असलेली बॅग परत करुन आपण प्रामाणिक असल्याचे दाखवून दिले. मात्र लॅपटॉप चोरी केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रारदारांनी पवई पोलिसांत तक्रार केली होती.

आरोपी रिक्षाचालकाला अटक

आरोपी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखलल होताच आरोपी रिक्षाचालकाचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. यावेळी हा रिक्षाचालक विलेपार्ले येथील हायवे रोडवरील शास्त्रीनगरमध्ये राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर रिक्षाचालक धोंबी साह याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा लॅपटॉप चोरी करुन कपडे असलेली बॅग परत केल्याची कबुली दिली. हा लॅपटॉप त्याने त्याचा मेहुणा वासुदेवला दिल्याचे तपासात उघडकीस आले. हा लॅपटॉप लवकरच त्याच्या मेहुण्याकडून ताब्यात घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत धोंबी हा पोलीस कोठडीत असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत. रिक्षात विसरलेली बॅग परत करुन त्याने आपण प्रामाणिक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅगेतील लॅपटॉप चोरी केल्याने या प्रामाणिक रिक्षाचालकाला आता पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -