घरमुंबईत्या नराधमाची माहिती देणार्‍याला ५० हजारांचे इनाम

त्या नराधमाची माहिती देणार्‍याला ५० हजारांचे इनाम

Subscribe

वसई : मुंबई,ठाणे,नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात 14 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या विकृताची माहिती देणार्‍याला नवी मुंबई, पालघर आणि मुंबई पोलिसांकडून एकूण ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच त्या संशयित नराधमाची छायाचित्र असलेली होर्डिंग नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात लावण्यात आली आहे.

25 ते 30 वयोगटातील विकृत तरुणाने 9 ते 12 वर्षांच्या मुलींना आपले सावज करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटना मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये घडल्या आहेत. मुलींना फूस लावून निर्जनस्थळी नेवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. अर्धवट बांधकाम झालेल्या इमारती,रेल्वे रुळाजवळील निर्जन जागा, उड्डाणपुलाखालील जागा, इमारतीच्या टेरेसवरील कॅबीन, झोपडपट्टी अशा ठिकाणाचा वापर त्या नराधमाने अत्याचारासाठी केला आहे.

- Advertisement -

दोन आरोपी असल्याची शंका

गेल्या दीड वर्षात घडलेल्या या घटनांमध्ये कोणताही पुरावा त्या नराधमाने सोडलेला नाही. सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीसांनी त्याचे फोटो व्हायरल केले आहेत. फुटेजमध्ये दिसत असलेल्या वेगवेगळ्या फोटोमुळे या सर्व घटनेत एकापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

जागोजागी होर्डिंग

- Advertisement -

वाशी, खारघर, रबाळे, सानपाडा, सीबीडी, एपीएमसी, कोपरखैरणे, दिंडोशी, कांदिवली, नेरुळ,रबाळे आणि तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत या अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.14 पैकी 3 घटना खारघरमध्ये घडल्या आहेत. या नराधमाविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीसांनी होर्डिंग्ज लावून नागरिकांची मदत मागितली आहे.

8805524100 वर संपर्क करा!

आरोपीची माहिती देणार्‍याचे नाव गुपीत ठेवण्यात येईलच, तसेच त्याला 25 हजार रुपये रोख देण्याचे नवी मुंबई पोलीसांनी जाहीर केले आहे. पालघर पोलीसांनीही रोख रकमेचे इनाम जाहीर केले असून, माहितीच्या अनुषंगाने पैसे देण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसही माहिती देणार्‍यास इनाम देणार आहेत. असे एकूण 50 हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. 8805524100 मोबाईलवर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महिला वर्गात घबराट

नवी मुंबई,मुंबईनंतर अशा घटना वसईतही घडु लागल्याचे वाचून समजल्यामुळे आम्ही भयभित झालो आहोत.मुलगी घरी सुखरुप पोहचेपर्यंत आम्हाला धास्ती लागते.पोलीसांनी युद्ध पातळीवर या नराधमाचा शोध घ्यावा.आणि त्याला कठोर शासन करावे.अशा प्रतिक्रिया महिलांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -