घरमुंबईरेल्वेची परीक्षा रुळावरुन घसरली

रेल्वेची परीक्षा रुळावरुन घसरली

Subscribe

सर्व्हर गोंधळामुळे हॉल तिकीटच डाऊनलोड करता आलेली नाहीत. तसेच हॉल तिकीट मिळाली असतानाही शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभे रहावे लागले. या भरतीसाठी १ लाख पदांकरीता २.५ कोटींपेक्षा जास्त उमेदवारांनी देशभरातून अर्ज केले आहेत.

रेल्वे प्रशासनाने देशभरासाठी चतुर्थश्रेणी कामगारांची मेगा भरती जाहीर केली असून मुंबईत सुरू असलेल्या या मेगा भरतीची प्रक्रिया प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुळावरुन घसरली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत, मात्र सर्व्हर गोंधळ तसेच हॉल तिकिटाअभावी हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. सर्व्हर गोंधळामुळे हॉल तिकीटच डाऊनलोड करता आलेली नाहीत. तसेच हॉल तिकीट मिळाली असतानाही शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभे रहावे लागले. या भरतीसाठी १ लाख पदांकरीता २.५ कोटींपेक्षा जास्त उमेदवारांनी देशभरातून अर्ज केले आहेत.

रेल्वेच्या ग्रुप डीची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली आहे. प्रत्येक केंद्रावर तीन वेळांमध्ये परीक्षा घेण्यात येत असून सुमारे पंधरा दिवसांच्या कालावधीत ही परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुंबईत या चतुर्थश्रेणी परीक्षा घेण्यात येत आहे. सोमवारी या परीक्षेचा पहिला दिवस होता. त्यामुळे वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी रविवार रात्रीपासून मुंबईत हजारोंच्या संख्येने गाव खेड्यातून विद्यार्थी दाखल झाले होते. मात्र अनेक विद्यार्थांना परीक्षेचे हॉल तिकिट डाऊनलोड न झाल्यामुळे परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांना परीक्षा न देता परत जावे लागले आहे.

- Advertisement -

उमेदवारांना परीक्षेसाठी ४ दिवसांपूर्वीपासून रेल्वे बोर्डाच्या संकेतस्थळावर ग्रुप डीच्या परीक्षांचे हॉल तिकीट काढण्यास सांगितले होते. मात्र रेल्वेच्या संकेतस्थळावर अधिक भार पडल्यामुळे सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे डाऊनलोड होऊ शकली नाहीत. याची माहिती मिळताच रेल्वे भरती बोर्डाने ज्यांचे हॉल तिकिट डाऊनलोड झालेले नाही, त्यांना २ वाजण्याच्या सुमारास एसएमएस पाठविला. त्यामुळे तिसर्‍या सत्रातील विद्यार्थांना या एसएमएसच्या आधारे परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. पण पहिल्या आणि दुसर्‍या सत्रातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रशासनाशीदेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे उत्तर न देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रकरणाबद्दल आपलं महानगरच्या प्रतिनिधींने रेल्वे भरती बोर्ड मुंबईचे अध्यक्ष गोपाला चंद्रा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

ट्विटरकडेही दुर्लक्ष

दरम्यान, परीक्षा हुकलेल्या लाखो विद्यार्थ्यांनी यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्विटरवरही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. तर हॉल तिकिट डाऊनलोड होत नसल्यामुळे रेल्वे भरती बोर्डाच्या दूरध्वनी क्रमांकावर अनेक विद्यार्थांनी याची तक्रार केली आहे. दिवसभर सतत रेल्वे बोर्डाचे दूरध्वनी व्यस्त होते. ही परिस्थिती महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आहे. त्यामुळे रेल्वेच्या ग्रुप डीची परीक्षा हजारो विद्यार्थ्यांना देता आली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे वर्षभराचे परिश्रम वाया गेले आहेत. या गैरसोयीला रेल्वे भरती बोर्ड जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

- Advertisement -

विद्यार्थी संघटनाही आक्रमक

या परीक्षेसाठी राज्यभरातील विद्यार्थी याठिकाणी आले होते. मात्र त्यांना प्रशासनाने दाद न दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी संघटनांकडे धाव घेतली आहे. तर संघटनांनी यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याबद्दल बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी म्हणाले की, जरी टप्प्याटप्प्याने होणार्‍या परीक्षेनुसार हॉलतिकीट मिळणार असेल तरी याविषयीचा संभ्रम बोर्डाने दूर करायला हवा. तशा सूचना विद्यार्थ्यांना द्यायला हव्या. नाहीतर विद्यार्थी हॉलतिकीट मिळेपर्यंत तणावात राहतील.

माझी परीक्षा १२. ३० वाजता म्हणजे दुसर्‍या सत्रामध्ये होती. मी मागील ४ दिवसांपासून हॉल तिकिट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे माझे हॉल तिकिट डाऊनलोड झाले नाही. त्यामुळे मला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला नाही. रेल्वेकडून मला २ वाजता मेसेज आला. मात्र तेव्हा परीक्षेची वेळ निघून गेली होती. रेल्वे भरती बोर्डाला माझी विनंती आहे की, ज्यांना हॉल तिकिट डाऊनलोड न झाल्यामुळे परीक्षा देता आलेली नाही, त्यांची परीक्षा घेण्यात यावी. – नईम खान, मुंब्रा (परीक्षेसाठी आलेला विद्यार्थी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -