घरपालघरवैतरणा – फणसपाडा परिसरात तेरा वर्षांनी आरोग्य सुविधा

वैतरणा – फणसपाडा परिसरात तेरा वर्षांनी आरोग्य सुविधा

Subscribe

यासाठी या भागात एक तरी आरोग्य केंद्र असावे अशी मागणी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांनी महापालिकेकडे केली होती. या मागणीनुसार वैतरणा फणसपाडा या भागात पालिकेने आरोग्य केंद्र उभारले आहे.

वसईः विरारजवळील वैतरणा – फणसपाडा परिसरात वसई-विरार महापालिकेने नवीन आरोग्य केंद्र सुरू केले आहे. जवळपास १३ वर्षांनंतर ही आरोग्य सेवा सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरारजवळील भागात वैतरणा परिसर आहे. या भागात फणसपाडा यासह इतर खेडेपाडे आहेत. मात्र अनेक वर्षांपासून आरोग्य सेवा नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. आरोग्य सेवा मिळवण्यासाठी वैतरणा विभागातील नागरिकांना नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या विरार येथील खासगी अथवा सरकारी दवाखान्यात जावे लागत होते. मधल्या काळात इथला रस्ता व्यवस्था खराब असल्याने रुग्णांना उपचार घेण्यासाठी जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हा परिसर वसई- विरार महापालिकेच्या अखत्यारीत येतो. परंतु हा परिसर शहरापासून दूर अंतरावर असून आरोग्य सेवा नसल्यामुळे सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया, काविळ आणि सर्पदंशसारख्या अनेक लहान- मोठ्या आजारांवर रुग्णांना वेळीच उपचार मिळणे कठीण होत होते. यासाठी या भागात एक तरी आरोग्य केंद्र असावे अशी मागणी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांनी महापालिकेकडे केली होती. या मागणीनुसार वैतरणा फणसपाडा या भागात पालिकेने आरोग्य केंद्र उभारले आहे.

या आरोग्य केंद्राचे उद्घाटन आमदार हितेंद्र ठाकूर, खासदार राजेंद्र गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन नाईक, महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार, आरोग्य विभागाचे अधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाले. या आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण विभाग सेवा, दीर्घकालीन संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगाची तपासणी व प्रतिबंध उपाययोजना, एच.बी. (हिमोग्लोबिन), मलेरिया चाचणी (बी.एस.एम.पी.) युरिन प्रेगनन्सी रॅपिड टेस्ट, मधुमेह तपासणी, डेंग्यू चाचणी, लसीकरण अशा सुविधा या केंद्रातून पुरविल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. अनेक वर्षांनंतर वैतरणा फणसपाडा आरोग्य केंद्र तयार झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -