घरपालघरशिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन सर्व गडकिल्ले सर करणार केरळचा तरुण

शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन सर्व गडकिल्ले सर करणार केरळचा तरुण

Subscribe

महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन त्याने महाराजांचा संपूर्ण इतिहास वाचून काढला. महाराजांवर आधारित माहितीस्रोत आणि चित्रपटांमधून त्याने शिवाजी महाराजांचे कार्य, युद्धनीती, हिंदवी स्वराज्यासाठी दिलेला लढा, महाराजांची नितीमूल्ये, तत्व, नियम यांचा अभ्यास केला.

डहाणू: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन केरळचा तरुण एम.के. हमरास याने शिवाजी महाराजांच्या तत्कालीन 317 गडकिल्ल्यांचे सफर करण्याची योजना आखली आहे. हमारास याने 2 महिने सायकल चालवण्याचा सराव करून 1 मे पासून सायकलवरूनच गडकिल्ल्यांच्या सफरीला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत त्याने 4500 किलोमीटर प्रवास पूर्ण केला असून, 61 गडकिल्ले सर केले आहेत. तर उर्वरित किल्ले येत्या 2 वर्षात पूर्ण करण्याचे ध्येय त्याने समोर ठेवले आहे. त्याच्या या प्रवासादरम्यान हमरास कासा येथे आला असता, कासा पोलीस स्टेशन प्रभारी श्रीकांत शिंदे यांनी त्याचे स्वागत केले असून त्याच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली होती. केरळ कोटपुरम इथला रहिवासी असलेला हमरास एम. के. (वय-२६) ह्याचे बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण झाले असून, त्यानंतर तो सौदी-अरब येथे ड्रायव्हरची नोकरी करत होता. दरम्यान त्याच्या वाचनात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आला. महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन त्याने महाराजांचा संपूर्ण इतिहास वाचून काढला. महाराजांवर आधारित माहितीस्रोत आणि चित्रपटांमधून त्याने शिवाजी महाराजांचे कार्य, युद्धनीती, हिंदवी स्वराज्यासाठी दिलेला लढा, महाराजांची नितीमूल्ये, तत्व, नियम यांचा अभ्यास केला.

महाराजांच्या कार्याने हमरास इतका भारावून गेला की, त्याने शिवाजी महाराजांच्या चरणाने पावन गड किल्ल्यांची सफर करण्याचे ठरवले. शिवाजी महाराजांबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्याचे ध्येय ठेऊन त्याने गडकिल्ल्यांच्या सफरीला सुरुवात केली आहे. या प्रवासदरम्यान हमरासला त्याच्यासारखे अनेक प्रवासी भेटले असून त्यांनी एकमेकांना मदतीचा हात दिला आहे. केरळमधून महाराष्ट्राच्या सफरीला निघालेल्या हमरासने महाराष्ट्रातील राजगड किल्ल्यापासून गड किल्ले दर्शनाला सुरुवात करून आतापर्यंत तोरणा, प्रतापगड, लोहगड, विसापूर, सुधागड, सारसगड, मृगगड, हरिहर गड, माहुली गड इत्यादी मुख्य गड किल्ल्यांसोबत पालघरमधील आशेरी गड, गंभीर गड, तांदुळवाडी व कोहोज सोबत इतर मिळून 61 गड किल्ले सर केले आहेत.

- Advertisement -

लोणावळा येथे एका किल्ल्याची सफर करत असताना हमरास तिथल्या घनदाट जंगलात वाट चुकून अडकून बसला होता. दरम्यान वाटेत भेटलेल्या एका महिलेला त्याने संपर्क करून आपण हरवल्याची माहिती कळवली असता महिलेने लोणावळा येथील एका समाजसेवी संस्थेला हमरास हरवल्याची माहिती दिली. त्यांनतर समाजसेवी संस्थेने जंगलात शोध घेत हमरासला जंगलाबाहेर काढल्याची माहिती त्याने दिली आहे. त्यासोबतच प्रवासादरम्यान त्याच्यासोबत घडलेल्या अनेक घटनांची वाच्यता त्याने आपलं महानगर सोबत बोलताना केली आहे. गडकिल्ल्यांच्या सफरीला निघालेल्या अवलिया हमरासने आपल्या सफरीला सोबत म्हणून एक सायकल, रात्री राहण्यासाठी तंबू, लाकडी स्टोव, जेवणाचे व बनवण्याचे जुजबी साहित्य, मोबाईल, गो-प्रो कॅमेरा, स्वतःचे दोन जोड कपडे इत्यादी साहित्य घेतले आहे. हमरासचे सफरीला निघण्यापूर्वीचे वजन 120 किलो एवढे होते. प्रवासाच्या पाच महिन्यात वजन घटून 90 किलो झाल्याची माहिती हमरास गमतीने देतो. हमरासच्या घरी त्याच्या व्यतिरिक्त त्याचे वडील आणि दोन लहान भाऊ असल्याचे त्याने सांगितले. त्याचे वडील हे कपडे शिवायचे काम करतात. दोन वर्षापासून हमरासने दुर्ग सफरीला निघायचे ठरवले होते. त्यासाठी त्याने 2 महिने सायकल चालवण्याचा सराव देखील केला होता. त्याच्या प्रवासाची संपूर्ण माहिती हमरासच्या viewpoint 3434 या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.

हमरासने आपलं महानगर सोबत बोलताना दिलेल्या माहिती नुसार, हमरासला रहस्यमयी (advantures) गोष्टी अभ्यासने व प्रत्यक्ष अनुभवण्याची विशेष आवड त्याने बोलून दाखवली आहे. महाराष्ट्रातील त्याचा प्रवास खूपच मजेशीर आणि आनंददायी झाल्याचे त्याने सांगितले आहे. महाराष्ट्रातील त्याच्या प्रवासात त्याला स्थानिकांनी नेहमीच मदत मिळाली असून, अनेक वेळा त्याच्या जेवणाखाण्याची सोय देखील स्थानिकांमार्फत होत असल्याचे त्याने सांगितले आहे. महाराष्ट्रातील लोकांमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रती असलेला आदर बघून मान भारावून जात असल्याचा अनुभव त्याने कथन केला आहे. हमरासची चौकशी करणार्‍यास त्याच्या प्रवासब्बद्दलची माहिती देताच समोरच्याकडून हमरासला आदरयुक्त वागणूक मिळत असल्याचे त्याने सांगितले आहे.

- Advertisement -

हमरासने व्यक्त केली खंत

छत्रपतींच्या कार्याने प्रेरित हमरासने महाराजांच्या चरणाने पावन गड किल्ल्यांची सफर करण्याचा कयास बांधून सफर सुरू केली आहे. मात्र, काही मोजके किल्ले सोडून महाराजांचा इतिहासाचा वारसा असलेल्या अनेक किल्ल्यांची पडझड झाली असून ते किल्ले दुर्लक्षित असल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. तर अनेक किल्ल्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून, गड किल्ल्यांच्या वापर पार्ट्या करण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी करण्यात येत असल्यासारखे भासत असल्याचे त्याने सांगितले. अनेक किल्ल्यांवर दारूच्या बाटल्या, किल्ल्यांच्या भिंतींवर कोरलेली नावे इत्यादींमुळे किल्ल्यांची दुरवस्था झाल्याचे त्याने म्हटले आहे. तर गडकिल्ल्यांमध्ये होणार्‍या पार्ट्या आणि प्रवाशंमार्फत टाकण्यात येणार्‍या कचार्‍याबाबत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्याचा सांभाळ करून त्यांना नवसंजीवनी देण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले आहे. भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला देखील कळावा आणि त्यांच्या मनात महाराजांबद्दल आदर निर्माण व्हावा असे वाटत असेल तर गड किल्ल्यांची दुरुस्ती आणि सांभाळ करणे आवश्यक असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -