घरक्रीडाENG vs PAK : स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचा नवा वनडे संघ जाहीर; तब्बल...

ENG vs PAK : स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचा नवा वनडे संघ जाहीर; तब्बल नऊ नवखे खेळाडू

Subscribe

पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला गुरुवारपासून कार्डिफ येथे सुरुवात होणार आहे.

तीन खेळाडू आणि चार सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे इंग्लंडच्या एकदिवसीय संघाला क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे आगामी पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) संपूर्ण नव्या १८ सदस्यीय संघाची निवड करावी लागली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला गुरुवारपासून कार्डिफ येथे सुरुवात होणार असून तीन सामन्यांच्या या मालिकेत अष्टपैलू बेन स्टोक्स इंग्लंडचे नेतृत्व करेल. तसेच या संघात तब्बल नऊ नवख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून त्यांना याआधी एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नाही.

सात सदस्यांना कोरोनाची बाधा  

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना रविवारी ब्रिस्टल येथे झाला. त्यानंतर इंग्लंडच्या सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सोमवारी या चाचणीचे रिपोर्ट आल्यावर तीन खेळाडू आणि चार सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना झालेले सदस्य युके सरकारच्या नियमांनुसार क्वारंटाईन होतील. त्यांच्या क्वारंटाईनचा कालावधी ४ जुलैपासून सुरु झाला आहे. तसेच इतर सदस्य कोरोनाबाधित सदस्यांच्या संपर्कात आल्याने त्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागणार आहे, असे ईसीबीने सांगितले. त्यामुळे ईसीबीला पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी नव्या संघाची निवड करावी लागली आहे.

- Advertisement -

स्टोक्स पहिल्यांदा वनडे संघाच्या कर्णधारपदी 

आयपीएल स्पर्धेत खेळताना स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो काही काळ मैदानाबाहेर होता. परंतु, आता त्याचे संघात पुनरागमन झाले असून तो इंग्लंड संघाचे नेतृत्व करेल. ‘इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्याची ही स्टोक्सची पहिलीच वेळ असेल. त्यामुळे त्याच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून आम्ही त्याला शुभेच्छा देतो,’ असे ईसीबीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट अ‍ॅशली जाईल्स म्हणाले.

इंग्लंडचा संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जेक बॉल, डॅनी ब्रिग्स, ब्रायडन कारसे*, झॅक क्रॉली*, बेन डकेट, लुईस ग्रेगरी*, टॉम हेल्म*, विल जॅक्स*, डॅन लॉरेन्स*, साकीब महमूद, डाविड मलान, क्रेग ओव्हर्टन, मॅट पार्किन्सन, डेविड पेन*, फिल सॉल्ट*, जॉन सिम्सन*, जेम्स विन्स.
(* = एकदिवसीय क्रिकेटचा अनुभव नसलेले खेळाडू)

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -