घरक्रीडान्यूझीलंडला सूर गवसणार की भारतच बाजी मारणार ?

न्यूझीलंडला सूर गवसणार की भारतच बाजी मारणार ?

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना बुधवारी वेलिंग्टन येथे होणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये दाखवलेला फॉर्म न्यूझीलंडमध्येही कायम ठेवत एकदिवसीय मालिका जिंकली. या मालिकेत न्यूझीलंडला चौथा सामना वगळता चांगली कामगिरी करण्यात अपयश आले, मात्र आता टी-२० मालिकेत त्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी आहे. त्यामुळे ते या मालिकेत तरी आपला खेळ उंचावतात की पुन्हा भारतासमोर नांगी टाकतात हे पाहणे रंगतदार ठरणार आहे.

भारताने न्यूझीलंडमध्ये फारसे टी-२० सामने खेळलेले नाहीत. २००९ च्या दौर्‍यामध्ये या संघांत २ टी-२० सामने झाले होते आणि हे दोन्ही सामने भारताने गमावले होते. त्यामुळे पहिल्या सामन्यात भारताला पहिल्यांदा न्यूझीलंडमध्ये टी-२० सामना जिंकण्याची संधी आहे. मात्र ही कामगिरी भारताला विराट कोहलीविनाच करावी लागणार आहे. कोहलीला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर अधिक जबाबदारी असणार आहे.

- Advertisement -

तसेच युवा फलंदाज शुभमन गिलला या सामन्यात टी-२० मध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल. गिलला चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांत संधी मिळाली होती, पण त्याला या सामन्यांत अनुक्रमे ९ आणि ७ धावाच करता आल्या. मात्र टी-२० मध्ये तरी फॉर्म सापडेल अशी संघ व्यवस्थापनाला आशा असेल. एकदिवसीय संघातून वगळण्यात आलेल्या रिषभ पंतचा टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला आणि अष्टपैलू कृणाल पांड्यालाही पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे न्यूझीलंडला मागील काही काळात टी-२० सामन्यांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांना मागील ७ टी-२० मालिकांपैकी अवघ्या २ मालिका जिंकण्यात यश आले आहे. मात्र असे असले तरी त्यांच्या संघात काही असे खेळाडू आहेत, जे आपल्या संघाला सामने जिंकवून देऊ शकतात. एकदिवसीय मालिकेत सलामीवीर कॉलिन मुनरोला चांगली कामगिरी करता आली नसली तरी टी-२० क्रिकेटमध्ये त्याने मागील काही महिन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्यासोबतच केन विल्यम्सन, जिमी निशम, रॉस टेलर यांसारखे खेळाडूही न्यूझीलंड संघात असल्याने भारताला हा सामना जिंकणे सोपे जाणार नाही हे निश्चित.

- Advertisement -

संभाव्य संघ –

भारत : शिखर धवन, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, कुलदीप यादव

न्यूझीलंड – कॉलिन मुनरो, केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टीम सायफर्ट (यष्टीरक्षक), जिमी निशम, कॉलिन डी ग्रँडहोम, मिचेल सॅन्टनर, स्कॉट कुगलायन, डग ब्रेसवेल / टीम साऊथी , लोकी फर्ग्युसन, ईश सोधी

सामन्याची वेळ – दुपारी १२:३० पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -