घरमुंबईभाजपची विजयी परंपरा मोडण्याचे विरोधकांपुढे आव्हान

भाजपची विजयी परंपरा मोडण्याचे विरोधकांपुढे आव्हान

Subscribe

वेध मतदार संघाचा ..... डोंबिवली विधानसभा

रेल्वे वाहिनी ही डोंबिवलीकरांची जीवनवाहिनीच समजली जाते. ९० टक्के नोकरदारवर्ग असल्याने, घड्याळ्याच्या काट्यावर डोंबिवलीकरांचा दिनक्रम सुरू होतो. मात्र, डोंबिवलीच्या विकासाची लोकल धीमीच आहे. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. डोंबिवलीचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांना भाजपने तिसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे चव्हाण हे यंदा हॅट्ट्रीक साधण्याच्या तयारीत आहेत. जनसंघापासून ते आतापर्यंत भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. त्यामुळे भाजपच्या विजयाची परंपरा मोडणे विरोधकांपुढे मोठे आव्हान आहे.

२००९ मध्ये कल्याण विधानसभा मतदार संघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदार संघ झाला. भाजपच्या वाट्याला असलेल्या या मतदार संघात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण दोन वेळा निवडून आले आहेत. डोंबिवली पश्चिम आणि पूर्वेतील काही भाग या मतदार संघात येतो. आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसकडून राधिका गुप्ते तर मनसेकडून नगरसेवक मंदार हळबे यांना निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मनसेने राज्यमंत्र्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. त्यामुळे सध्या तरी भाजप विरूध्द मनसे अशीच लढत रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

प्रत्येक निवडणुकीत चव्हाण यांना भाजपमधील एका गटाचा छुप्या पध्दतीने विरोध असतो. पण तो उघडपणे कधीच केला जात नाही. तरीसुद्धा चव्हाण हे बाजी मारत आले आहेत. हे मोठे कौशल्य त्यांच्याकडे आहे. लोकसभेच्या निवडणुकीत डोंबिवली मतदार संघात युतीच्या पारड्यात १ लाख ४३ हजार मत पडली आहेत. तर आघाडीला अवघी १९ हजार मते मिळाली . लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक डोंबिवलीकरांनी नेहमीच युतीच्या पारड्यात भरभरून मत टाकली आहेत. रस्ते, खड्डे, प्रदूषण, वाहतूक कोंडी, अस्वच्छता लोकलमधील जीवघेणा प्रवास … त्याच त्या समस्यांचा सामना अनेक वर्षे डोंबिवलीकर करताना दिसत आहे.

सांस्कृतीक , सामाजिक, शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. डोंबिवलीकर हे कला क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमात रमणारा रसिक म्हणूनच ओळखला जातो. हीच नस ओळखून राज्यमंत्री चव्हाण यांनी गेल्या दहा वर्षांपासून डोंबिवलीकर एक सांस्कृतीक परिवारच्या माध्यमातून सांस्कृतीक चळवळ राबवित आहेत. शहरातील प्रत्येक संस्था, मंडळ जुळलेले आहे. त्यामुळे चव्हाण त्यांच्याशी त्यांचे घट्ट नाते आहे. हा सुध्दा त्यांच्या विजयामागील मोठा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत चव्हाण यांचा विरोधकांशी कसा सामना रंगतो हे काही दिवसातच दिसून येणार आहे.

- Advertisement -

२०१४ मधील विधानसभेतील मते

रविंद्र चव्हाण (भाजप ) – ८३, ८७२
दीपेश म्हात्रे (शिवसेना) – ३७, ६४७
हरिश्चंद्र पाटील (मनसे ) – ११, ९७८
संतोष केणे (काँग्रेस ) – ७०४८
विकास म्हात्रे (राष्ट्रवादी ) – ६३४६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -