घरमहाराष्ट्रश्रीवर्धनमध्ये रंगणार ‘हॅट्ट्रिक’चा सामना!

श्रीवर्धनमध्ये रंगणार ‘हॅट्ट्रिक’चा सामना!

Subscribe

आदिती तटकरे विरुद्ध विनोद घोसाळकर

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती सुनील तटकरे यांना रिंगणात उतरविण्यात आले असून, यावेळची लढत पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध शिवसेना अशी होणार आहे. शिवसेनेकडून विनोद घोसाळकर उमेदवार आहेत. यावेळी तटकरे विजयाची हॅटट्रिक साधणार, की शिवसेनेला पराभवाची हॅटट्रिक पत्करावी लागणार, याची उत्सुकता आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शन तरी जोरदार झाले आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर श्रीवर्धन, म्हसळे व तळे तालुक्यांसह माणगाव व रोहे तालुक्याचा काही भाग मिळून श्रीवर्धन मतदारसंघ तयार झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते बॅ. ए. आर. अंतुले यांचा गड अशी श्रीवर्धनची ओळख. 1978 चा अपवाद वगळता 1962 ते 1985 पर्यंतच्या पाच निवडणुकांत बॅ. अंतुले निवडून आले, तर १९९० मध्ये काँग्रेसचेच रवींद्र राऊत तेथून निवडून आले आहेत. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत 1978 मध्ये जनता पार्टीचे ए. एस. ऊकये विजयी झाले. 1995 पासून काँग्रेसची विजयी परंपरा खंडित झाली ती कायमची! १९९५, ९९ व 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचे श्याम सावंत विजयी झाले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी 2009 मध्ये श्रीवर्धनमधून शिवसेनेला हद्दपार करण्याची किमया साधली. त्यांनी त्यावेळी तुकाराम सुर्वे यांचा जवळ-जवळ 10 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. पुढच्या, 2014 च्या निवडणुकीत तटकरे यांनी आपला पुतण्या अवधूत अनिल तटकरे यांना रिंगणात उतरवले. राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीत विजय झाला खरा पण तो अवघ्या ७७ मतांचा होता. तटकरे यांना हा धक्का होता.

आपण हरलोय या भावनेने तटकरे यांनी गेल्या पाच वर्षांत श्रीवर्धन मतदारसंघावर पद्धतशीरपणे लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात जिल्हा परिषदेपासून ते आमदार, खासदार निधी जास्तीत जास्त कसा तिकडे वळवता येईल, हे पाहिले आहे. तटकरे यांचे आमदार पुत्र अनिकेत तटकरे यांचा जास्तीत जास्त मुक्काम श्रीवर्धनमध्ये असल्याने यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असलेल्या आदिती तटकरे याच उमेदवार असतील अशी खूणगाठ प्रत्येकाने बांधली होती, ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी त्यांना उमेदवारी देत शिक्कामोर्तब केले आहे.

- Advertisement -

शिवसेनेने मुंबईत कार्यरत असलेल्या विनोद घोसाळकर यांना तिकीट दिल्याने स्थानिकांत काहीशी नाराजीही आहे. ही मते राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळण्याची भीती शिवसेनेचेच काही कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवतात. सुनील तटकरे यांची श्रीवर्धनमधील अनेक शिवसैनिकांशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहे. त्यामुळे विनोद घोसाळकर यांना सर्वप्रथम असंतुष्टांना हेरावे लागणार आहे. घोसाळकर यांचा या मतदारसंघात फारसा संपर्क नाही. त्यांचे बंधू प्रमोद घोसाळकर यांनी अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा श्रीवर्धनमध्ये किती प्रभाव पडणार, यावर तूर्त तरी प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसचे ज्ञानदेव पवार यांनी बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्यांचे बंड थंड केले जाणार, की त्यांना दुर्लक्षित केले जाणार, यावर उलटसुलट मते प्रदर्शित केली जात आहेत.

या मतदारसंघात शिवसेनेला सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी कमालीची शर्थ करावी लागणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला सलग तिसरा विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 35 हजारांपेक्षा अधिक मतांची मिळालेली आघाडी शिवसेना कशी मोडून काढणार, हा प्रश्न आहे. आघाडी व युतीकडून श्रीवर्धनची जागा प्रतिष्ठेची केली गेल्यास नवल वाटणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसची साथ कशी मिळणार, हाही औत्सुक्याचा भाग आहे.

2014 ची निवडणूकः-
अवधूत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)- 61038
रवी मुंडे (शिवसेना)- 60961

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -