घरदेश-विदेशअटल बिहारी वाजपेंयी यांच्या अस्थींचे मुंबईत विसर्जन

अटल बिहारी वाजपेंयी यांच्या अस्थींचे मुंबईत विसर्जन

Subscribe

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यामुळे उद्या (दि. २२ ऑगस्ट) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी चार वाजता अटलजींचा अस्थी कलश मुंबईत विमानतळावर आणण्यात येईल. राज्यातील विविध १३ नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत नरिमन पॉइंट येथे एनसीपीए सभागृहात सायंकाळी ६ वाजता सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह नेते अटलजींविषयीच्या भावना व्यक्त करतील. विविध क्षेत्रातील मान्यवरही सभेत सहभागी होतील. मुंबईतील राज्यस्तरीय सभेप्रमाणे राज्यात विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार अटलजींचा अस्थी कलश नवी दिल्ली येथून आणणार आहेत. बुधवारी दुपारी चार वाजता अटलजींचा अस्थी कलश मुंबईत विमानतळावर आणण्यात येईल.

- Advertisement -

या नद्यांमध्ये होणार अस्थींचे विसर्जन

मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड आणि सांगली येथे नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येईल. मुंबईत श्रद्धांजली सभास्थानी अस्थी कलश हस्तांतरित करण्यात येतील. अटलजींचा अस्थी कलश विसर्जनासाठी घेऊन जात असताना नागरिक आणि कार्यकर्ते वाटेत ठिकठिकाणी पुष्पांजली अर्पण करतील, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. त्याचसोबत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तसेच अन्य संस्था, मंडळे आणि महामंडळांमध्ये अटलजींना श्रद्धांजली वाहणारे शोक प्रस्ताव मंजूर करण्यात येतील.

अटलजींचे फोटो आणि आठवणींचे पुस्तक बनणार

अटल बिहारी वाजपेयी जेव्हा महाराष्ट्रातील दौऱ्यावर यायचे तेव्हा अनेकांकडे जायचे त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्ते यांच्याकडे अटलजींच्या अनेक आठवणी आणि फोटो आहेत. त्यांनी आठवणींच्या नोंदी आणि छायाचित्रे [email protected] या ईमेलवर तीस दिवसांत पाठवाव्यात. त्यांचे संकलन करून एक पुस्तक तयार करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच अटलजींचे साहित्य आणि विचार याविषयी पीएच.डी साठी संशोधन करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती भाजपातर्फे देण्यात येईल. राज्यातील सर्व तेरा विद्यापीठांमध्ये अटलजी विचार अध्यासन सुरू करण्यात येईल व त्यासाठी राज्य सरकार वीस कोटी रुपयांची तरतूद करेल, अशा घोषणाही यावेळी त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -