घरदेश-विदेशCOVID 19 : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तीन राज्यांत मास्क सक्ती, मुंबईसह...

COVID 19 : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तीन राज्यांत मास्क सक्ती, मुंबईसह राज्यात होणार मॉकड्रिल

Subscribe

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील काही भागात कोरोना (Corona) संसर्गाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे नियम आणि शिस्तीचे पालन करण्याच्या सूचना येऊ लागल्या आहेत. अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे पुन्हा बंधनकारक केले आहे. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या देशभरात मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही याकडे जिल्हा प्रशासन आणि पंचायतींकडून लक्ष देताना काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी केरळ सरकारने मास्क अनिवार्य केले आहेत. पुद्दुचेरी प्रशासनानेही तत्काळ प्रभावाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. यूपी सरकारने राज्यातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

दोन दिवस मॉकड्रिलचे आयोजन
कोरोना संसर्गामुळे पुढील काही दिवसात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दोन दिवस मॉकड्रिल होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाचे प्रधान आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासोबत आढावा बैठकीची तयारी तपासण्याचे निर्देश दिले होते.

मांडवियांकडून न घाबरता सतर्क राहण्याचे आवाहन 
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज झज्जर येथील एम्सला भेट देताना मॉकड्रिलच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यांनी लोकांना न घाबरता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मांडविया म्हणाले की, गेल्या काही दिवसात वाढणाऱ्या कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. आयसीयू बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, इतर आवश्यक उपकरणे आणि पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून तयारीचा साप्ताहिक आढावाही घेतला जात आहे.

- Advertisement -

रविवारी 5,357 नवीन रुग्ण आढळले
गेल्या 24 तासांत देशात 5,357 नवीन रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या आता 32,814 वर पोहोचली आहे. नवीन प्रकरणे शनिवार पेक्षा जास्त आहेत. शनिवारी 6,155 नवीन प्रकरणांची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत फक्त केरळमध्ये 1801 नवीन रुग्ण आढळले आहेत. एर्नाकुलम, तिरुअनंतपुरम आणि कोट्टायम जिल्ह्यात कोरोना रुग्णात वेगाने वाढ झाली आहे.

दिल्लीत संसर्गामुळे एका दिवसात चार मृत्यू
राजधानी दिल्लीत रविवारी चार रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय काल दिवसभरात 699 नवीन रुग्ण आढळले आहेत. 467 रुग्ण बरे झाल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. दिल्लीत सक्रिय प्रकरणे 2,460 पर्यंत वाढली असून यापैकी 126 रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत, त्यात 53 आयसीयूमध्ये, 8 व्हेंटिलेटरवर आणि 33 ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -