घरदेश-विदेशन्या. चेलमेश्वर यांचे बार असोसिएशनसोबतचे मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

न्या. चेलमेश्वर यांचे बार असोसिएशनसोबतचे मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात तीन ज्येष्ठ सहकाऱ्यांसोबत बंड करणाऱ्या न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांचे बार असोसिएशनसोबतचे मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. चेलमेश्वर यांनी त्यांना निरोप देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. न्या. चेलमेश्वर यांच्या सन्मानार्थ सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने निरोप समारंभ आयोजित केला आहे. आपण निरोपाच्या समारंभात सहभागी होणार नसल्याचे न्या. चेलमेश्वर यांनी बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांच्याकडे स्पष्ट केले.

न्या. चेलमेश्वर यांची सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या बरोबरीनेच १० ऑक्टोबर २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. ते २२ जून रोजी निवृत्त होत आहेत. येत्या १८ मे पासून सर्वोच्च न्यायालयाला उन्हाळ्याच्या सुट्या लागणार आहेत. त्यानंतर न्यायालयाचे कामकाज २ जुलै रोजी सुरू होईल. तेव्हा न्या. चेलमेश्वर निवृत्त झालेले असतील. त्यामुळे कामकाजाच्या शेवटच्या दिवशी, १८ मे रोजी त्यांच्या निरोप समारंभाचे सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने आयोजन करण्याचे ठरविले आहे. पण न्या. चेलमेश्वर यांनी वैयक्तिक कारणांमुळे या समारंभाला नकार दिला आहे.
बार असोसिएशनच्या कार्यकारिणीचे सदस्य न्या. चेलमेश्वर यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा आग्रहाची विनंती करणार असल्याचे विकास सिंह यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

न्या. चेलमेश्वर यांनी सरन्यायाधीशांच्या विरोधात केलेले बंड आणि त्यानंतरही न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वारंवार केलेले पत्रव्यवहार यामुळे त्यांच्यातील नाराजी स्पष्ट दिसून येते. निरोप समारंभाला दिलेला नकार हा नाराजी दर्शवण्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -