घरदेश-विदेश'मोदी सेलिब्रिटींना भेटतात मग अण्णांना का नाही?'

‘मोदी सेलिब्रिटींना भेटतात मग अण्णांना का नाही?’

Subscribe

'मोदींकडे बॉलिवूडच्या कलाकारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी वेळ आहे, तर मग अण्णांशी चर्चा करायला, त्यांच्याशी बोलायला वेळ का नाही?', असा थेट सवाल तृप्ती देसाईंनी विचारला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपाल आणि लोकायुक्तांच्या त्वरीत नियुक्तीच्या मागणीवरुन उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, गेल्या ७ दिवसांपासून सुरु असलेल्या अण्णांच्या या आंदोलनाला आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ”अण्णांच्या मागण्या योग्य असून सरकारने त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, नाहीतर संघटनेच्यावतीने रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल तसेच प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्याही फोडण्यात येतील”, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. ‘लोकांसाठी अण्णांना वारंवार उपोषणाला बसावं लागतं. सहा दिवस होऊनही अण्णांचे उपोषण सुटत नाही म्हणजे काय? यावरुनच हे सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याचं सिद्ध होतं,’ अशी टीका देसाई यांनी केली आहे.

हेच का अच्छे दिन?

”सर्वांसाठी अच्छे दिन आणणार असे पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं. मग या वयात अण्णांना अशाप्रकारे उपोषणला बसावं लागणं हेच त्यांचे अच्छे दिन आहेत का?” असा सवालही तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. ‘अण्णांच्या वयाचा विचार करुन, मोदींनी निरोप पाठवण्याऐवजी त्यांनी स्वतःच निर्णय घेऊन इथं येणं अपेक्षित होतं. मात्र, अण्णांच्या उपोषणाबाबत अद्याप ते काहीही बोलले नाहीत. मोदींकडे बॉलिवूडच्या कलाकारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी वेळ आहे, तर मग अण्णांशी चर्चा करायला, त्यांच्याशी बोलायला वेळ का नाही?’, असा थेट सवाल तृप्ती देसाईंनी विचारला आहे.

- Advertisement -

सरकारला धडा शिकवणार

यावेळी बोलताना देसाई म्हणाल्या की, ‘मोदींची जर अशीच भूमिका राहिली तर, त्यांच्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अण्णांच्या या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर आमच्यासारख्या महिला संघटनादेखील आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील आणि त्यांना धडा शिकवतील.’ ‘याप्रकरणी तोडगा काढण्याबाबत केंद्राकडून अण्णांना निरोप आला आहे. त्यावर कारवाईसाठी दोन दिवसांचा अवधी आहे. मात्र, ९ फेब्रुवारीपर्यंत अण्णांचं उपोषण न सुटल्यास आमच्या महिला रस्त्यावर उतरुन मंत्र्यांच्या गाड्या फोडतील’, असा धमकी वजा इशारा तृप्ती देसाईंनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -