घरदेश-विदेशसमान नागरी कायद्याचा वायदा

समान नागरी कायद्याचा वायदा

Subscribe

व्होट बँकेसाठी मुस्लिमांची माथी भडकवण्याचे काम - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भोपाळ येथे ५ वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. यानंतर भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्यावर (युनिफॉर्म सिव्हिल कोड) भाष्य केले. दोन कायद्यांवर देश कसा चालेल? संविधानदेखील समान हक्कांबाबत बोलते. देशात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करीत आहे, मात्र व्होट बँकेसाठी काही लोक या कायद्याला विरोध करीत कायद्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवत आहेत. एका कुटुंबामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम असतील, तर ते कुटुंब पुढे कसे जाईल, असा प्रश्न उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्राच्या अजेंड्यावर समान नागरी कायद्याचा मसुदा असल्याचे संकेत दिले. सोबतच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारतातील मुस्लीम बांधवांना भडकवून काही राजकीय पक्ष त्यांचा राजकीय फायदा घेत आहेत. समान नागरी कायद्याच्या नावाखाली हे भडकवण्याचे काम होत आहे. तिहेरी तलाकचे समर्थन करणारे मतांचे भुकेले राजकीय पक्ष मुस्लीम मुलींवर मोठा अन्याय करीत आहेत. तिहेरी तलाक केवळ मुलींवरच अन्याय करीत नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतो. तिहेरी तलाक हा इस्लामचा अत्यावश्यक भाग असेल तर कतार, जॉर्डन, इंडोनेशियासारख्या देशांमध्ये त्यावर बंदी का घालण्यात आली? मी नुकताच इजिप्त दौर्‍यावर होतो. त्या देशामध्ये सुमारे ८०-९० वर्षांपूर्वीच ट्रिपल तलाक रद्द केला आहे. समान नागरी कायद्याबाबतचा संभ्रम भाजप दूर करेल.

- Advertisement -

विरोधकांचा एकत्रित घोटाळा २० लाख कोटींचा –पंतप्रधान मोदी
पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवरही पंतप्रधान मोदींनी टीका केली. काही नेते फक्त स्वतःच्या पक्षासाठी भ्रष्टाचार, कमिशनच्या माध्यमातून पैसे गोळा करतात. सर्व विरोधी पक्षांच्या घोटाळ्यांचा आकडा एकत्र केला तर २० लाख कोटींचा घोटाळा होण्याची खात्री आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. असे एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. तुम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, राजद, नॅशनल कॉन्फरन्स, बीआरएस, डीएमके या पक्षप्रमुखांच्या मुला-मुलीला मोठे करायचे असेल तर त्यांना मतदान करा आणि स्वत:च्या मुला-मुलींना, नातवंडांना मोठे करायचे असेल तर भाजपला मतदान करा, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी यावेळी केले.

विरोधकांनी एकत्र येणे पटले नाही – शरद पवार
पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेले शिखर बँक प्रकरण न्यायालयात आहे. माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही. सुप्रिया सुळे यांचे नाव घेण्याचे काही कारण नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षांचे लोक एकत्र येतात, देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची विधाने केली जातात. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, असे खडे बोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -