घरदेश-विदेशदहनाच्या आधीच रावणाचा पुतळा गायब! आयोजक बुचकळ्यात, जाळायचं कुणाला?

दहनाच्या आधीच रावणाचा पुतळा गायब! आयोजक बुचकळ्यात, जाळायचं कुणाला?

Subscribe

दसऱ्याच्या अर्थात विजयादशमीच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्याची प्रथा आहे. विशेषत: उत्तर भारतामध्ये ही प्रथा मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. या दिवशी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जातं. पण उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये दसऱ्याच्या दिवशी एक अजब प्रकार घडला. या प्रकारामुळे रामलीलाचे आयोजक देखील बुचकळ्यात पडले. कारण सकाळी दहनासाठी मैदानात लावलेला पुतळा संध्याकाळी अचानक गायब झाला होता. त्यामुळे आता रावण दहन म्हणून जाळायचं काय? असा प्रश्न देखील आयोजकांना पडला. शेवटी रावण दहन सोडून संगीत रामायणावर भागवलं गेलं. पण पुतळा गेला कुठे? याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही!

नक्की झालं काय?

अलिगढच्या सरयू पाल रामलीलामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही रावणाचं दहन केलं जाणार होतं. त्यासाठी कारागिराकडून विशेष पुतळा बनवून घेण्यात आला होता. पण रविवारी सकाळी जेव्हा आयोजन समितीचे पदाधिकारी मैदानावर आले, तेव्हा त्यांना तिथे पुतळा गायब असल्याचं दिसलं. पुतळा गेला कुठे? याची चौकशी करण्यासाठी तपास सुरू केला असता पुतळा बनवणारा कारागीर देखील गायब असल्याचं लक्षात आलं. यावरून कारागीरच पुतळा घेऊन फरार झाला असावा, असा अंदाज पदाधिकाऱ्यांनी लावला. पण कारागीर पुतळा घेऊन का फरार होईल?

- Advertisement -

पदाधिकाऱ्यांचे वेगवेगळे दावे!

आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारीच स्थानिक पोलीस चौकीने कोरोनाच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर पुतळा दहनाला परवानगी नाकारली होती. मात्र, आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या अटीवर रावण दहनाला परवानगी देण्यात आली. मात्र, आयोजनावरून समितीमध्येच नंतर वाद सुरू झाला. काही पदाधिकाऱ्यांच्या मते, समितीतल्याच नाराज पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कारागिराने पुतळा गायब केला असावा. मात्र, अजूनही पुतळा गायब होण्याचं नक्की हेच कारण आहे का? याचा थांगपत्ता लागू शकलेला नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -