घरदेश-विदेशफिफा वर्ल्ड कप २०१८ साठी २० लाख कुत्र्यांचा बळी

फिफा वर्ल्ड कप २०१८ साठी २० लाख कुत्र्यांचा बळी

Subscribe

फुटबॉल २०१८चा विश्वचषक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. १४ जूनला पहिला सामना होणार असून, रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात ही पहिली लढत रंगणार आहे. जगभरात वर्ल्ड कपची तयारी सुरू आहे. फुटबॉलप्रेमींचा उत्साह तर गगनात मावेनासा झालाय. अशावेळी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियात फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ज्या ११ शहरांत होणार आहे, तिथले २० लाख भटके कुत्रे आणि मांजरी मारण्याचे आदेश रशियन सरकारने दिले आहेत. या कामासाठी तब्बल १९.५ लक्ष डॉलर्स (सुमारे १३ कोटी रुपये) खर्च करणार असल्याची माहिती आहे. कुत्री आणि मांजरींना मारणाऱ्या या स्क्वॉडला ‘कॅनी केजीबी’ असे नाव देण्यात आले आहे. यापूर्वीही, रशियात झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी देखील रस्त्यावरील हजारो कुत्रे मारले गेले होते.

ज्या शहरांमध्ये ही कारवाई होणार आहे, तिथे कुत्रे आणि मांजरांची संख्या जास्त आहे. वर्ल्ड कपसाठी येणाऱ्या प्रेक्षकांना याचा त्रास होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात येणार आहे. पशु अधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे की सरकार केवळ त्यांच्या शहरांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्राण्यांचा बळी देत आहे. याआधीही हजारो पक्ष्यांना जिवंत जाळण्यात आले होते.

- Advertisement -

पशु अधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या विषयात हात घालताच रशियाच्या उप-पंतप्रधान विटाली मुटाको यांनी या विषयी स्पष्टीकरण दिले. प्राणीमित्र संघटनांनी घेतलेली आक्रमक भूमिका शांत करण्यासाठी त्यांनी या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये ‘भटके कुत्रे आणि मांजरींना न मारता त्यांना शेल्टर्समध्ये बंद करण्यात येईल’, असं आश्वासन मुटाको यांनी दिलं. मात्र, त्यानंतरही कुत्रे आणि मांजरींना मारलंच जात आहे, असा दावा या संघटनांनी केला आहे. त्यामुळे रशियात होणाऱ्या या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेवर भटक्या कुत्र्यांचा आणि मांजरींच्या प्रश्नाचं सावट असणार हे निश्चित.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -