घरसंपादकीयअग्रलेखदिल्लीतील सफाई...!

दिल्लीतील सफाई…!

Subscribe

दिल्ली हे भारताचे प्रवेशद्वार आहे त्यामुळे दिल्लीतील राजकीय घडामोडींना राष्ट्रीय पातळीवर अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साहजिकच दिल्ली महापालिकेच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जी कमाल करून दाखवली आहे ती खरोखरच भाजपला तर चिंताजनक आहेच, मात्र त्याचबरोबर देशातील अन्य राजकीय पक्षांनादेखील विचार करायला लावणारी आहे. खरेतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे तसेच पक्षातील कार्यकर्त्यांचे या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदनच केले पाहिजे. कारण जो भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून घेतो त्याला केजरीवाल यांनी दिल्लीतील मैदानात चारी मुंड्या चीत केले आहे. दिल्ली महापालिकेवर गेली पंधरा वर्षे सातत्याने भाजपचे वर्चस्व होते. देशात भाजपा ही २०१४ पासून एक महाशक्ती म्हणून उदयास आलेली असतानाही देशातील अत्यंत बलशाली राष्ट्रीय पक्षाला दिल्लीसारख्या शहरात पराभूत करणे हे दुर्लक्षित करण्यासारखी घटना नाही.

बुधवारी दिल्ली महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाली आणि दुपारनंतर दिल्ली महापालिका ही पूर्णपणे आपच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट झाले आणि त्यानंतर आपने दिल्लीसह पंजाब महाराष्ट्रातदेखील विजयी जल्लोष केला. याचे प्रमुख कारण म्हणजे आता आपच्या ताब्यात दिल्ली आणि पंजाब ही दोन प्रमुख राज्ये तर असणार आहेतच, मात्र त्याचबरोबर दिल्ली महापालिका ही देशातील एक महत्त्वाची महापालिका त्यांच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच आपवरील आणि विशेषत: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. वास्तविक तसं बघायला गेल्यास दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये जिंकलेल्या आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी असल्यामुळेे येथील स्थानिक सेवा सुविधांचा कारभार हा प्रामुख्याने दिल्ली महापालिकेतर्फे चालवला जातो. आतापर्यंत सलग तीन वेळा दिल्ली महापालिका ही भाजपने जिंकलेली आहे. दिल्लीची विधानसभा आपच्या ताब्यात असली तरीदेखील दिल्ली महापालिका मात्र भाजपच्या कब्जात होती. तथापि, आता दिल्ली सरकारला या महापालिकेच्या माध्यमातून दिल्ली शहराला अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

दिल्लीतील रस्ते, महापालिकांच्या शाळा, शिक्षण व्यवस्था, आरोग्य, साफसफाई याकडे आपला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. वास्तविक दिल्ली महापालिकेची निवडणूक ही एप्रिल महिन्यात होणार होती. तथापि, भाजप नेत्यांच्या इच्छेनुसारही त्यावेळी निवडणूक न होता ती पुढे ढकलून गुजरात विधानसभेबरोबर घेण्यात आली, मात्र भाजप नेतृत्वाचा हा निर्णयदेखील चुकला असेच म्हणावे लागेल. दिल्ली महापालिका ही भाजपच्या ताब्यात असल्यामुळे आणि दिल्लीची विधानसभा ही आपच्या ताब्यात असल्यामुळे महापालिकेला नागरी सुविधांसाठी निधी मिळत नाही, अशी तक्रार भाजप नेते वारंवार करत होते. दिल्ली महापालिकेत आपचे वर्चस्व वाढू नये याकरिता भाजपने गेल्या काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे आपचे खच्चीकरण कसे होईल याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करून पाहिल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी वारंवार केला आहे, मग त्यामध्ये दिल्लीतील आपचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचाही उल्लेख आपकडून वारंवार केला जातो, याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सिसोदिया यांनी आपला मतदान करणार्‍या दिल्लीकरांचे तर आभार मानलेच आहेत, मात्र त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या महाशक्तीचा आणि सर्वात मोठ्या नकारात्मक राजकीय पक्षाचा दिल्लीतील मतदारांनी पराभव केल्याचा टोलादेखील त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

दिल्ली महापालिकेतील पराभव हा भाजपला मोठा धक्काच म्हणावा लागेल. अर्थात दिल्लीचे भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी जनमताचा कौल लक्षात न घेताच दिल्लीचा पुढील महापौर हा भाजपचाच होणार असल्याचे जाहीर केल्याने महापौर निवडणुकीपर्यंत भाजप आणि आपमधील लढाई ही सुरूच राहील याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अर्थात एक्झिट पोलमध्ये भाजपला अगदीच ९० ते ९२-९४ अशा जागा दाखवल्या होत्या. या जागांच्या तुलनेत भाजपने १०४ जागा जिंकत एक्झिट पोलवाल्यांचे पितळ उघडे पाडले आहे. तसेच, यामध्ये सर्वात दारुण अवस्था काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची झाली आहे. काँग्रेसला दिल्ली महापालिकेत दोन आकडी संख्याबळदेखील गाठता आलेले नाही ही खरोखरच शरमेची बाब म्हणावी लागेल. विशेष करून राहुल गांधी हे गेल्या काही महिन्यांपासून भारत जोडो यात्रेमध्ये व्यस्त होते. त्यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे समाज माध्यमांवरून सातत्याने सांगितले जात होते, मात्र असे असूनदेखील काँग्रेसला अवघ्या नऊ जागांवर दिल्ली महापालिकेत समाधान मानावे लागले आहे, याचेही आत्मचिंतन काँग्रेसने करण्याची गरज आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर जगातील सर्वात मोठी महाशक्ती बनणार्‍या भाजपने दिल्ली का गमावली याचे गांभीर्याने चिंतन करण्याची गरज आहे. विशेषत: भाजपला देशात काँग्रेसपेक्षाही आप हा नवीन पर्याय उभा रहात आहे का, याचाही विचार आता भाजप नेतृत्वाने करण्याची गरज आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आपने सर्वप्रथम दिल्ली जिंकली. आपने दिल्ली त्या काळात जिंकली आहे जेव्हा देशामध्ये मोदी लाट प्रचंड प्रमाणावर होती. त्यामुळे आपच्या दिल्लीतील यशाकडे दुर्लक्ष करणे हे भाजपसाठी भविष्यात अत्यंत धोकादायक ठरू शकते याचाही विचार आता भाजप नेतृत्वाने करण्याची गरज आहे. भाजपकडे ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यासारखे अत्यंत हुकमी आणि करिष्माकारी नेतृत्व आहे असा कोणताही करिष्मा आम आदमी पक्षाकडे नाही.

अथवा आपचे नेते अरविंद केजरीवाल हे काही करिष्मा असलेले नेते नाहीत. सामान्य माणसांचा पक्ष एवढीच काही ती आपची जनमानसातील प्रतिमा आहे. तथापि आपने सर्वप्रथम दिल्ली विधानसभा जिंकली. त्यानंतर गेल्याच वर्षी आपने पंजाब राज्य जिंकून सर्वांनाच धक्का दिला. आता तर भाजपच्या ताब्यात असलेल्या दिल्ली महापालिकेवर आपने स्वतःचा झेंडा रोवून भाजपच्या नेतृत्वाला दिल्लीतच आव्हान दिले आहे. या सर्वसामान्य जनतेच्या आव्हानाचा विचार भाजपच्या महाशक्तीने जर वेळीच केला नाही, तर हळूहळू भाजपच्या ताब्यातील अन्य राज्यांमध्येही आपचा प्रभाव वाढू लागेल आणि त्यानंतर मात्र आपला कंट्रोल करणे हे भाजपच्या हाताबाहेर जाईल. किंबहुना, आताही आपवर नियंत्रण मिळवणे हे भाजप नेतृत्वाच्या हातात राहिलेले नाही. आप भी कूछ कम नही, हाच एकमेव संदेश भाजपला तसेच अन्य राजकीय पक्षांना दिला गेला आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती वाटू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -