घरदेश-विदेशदिल्ली महापालिकेत ‘आप’ची एकहाती सत्ता झाडूने केला भाजपचा सुपडा साफ

दिल्ली महापालिकेत ‘आप’ची एकहाती सत्ता झाडूने केला भाजपचा सुपडा साफ

Subscribe

भाजपच्या १५ वर्षांच्या सत्तेला खिंडार पाडत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अखेर दिल्ली महापालिकादेखील आपल्या हाती घेतली आहे. दिल्ली महापालिकेच्या २५० जागांपैकी १३४ जागा जिंकत आपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यामुळे दिल्ली महापालिकेवरील भाजपची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजपला १०४ जागा मिळाल्या असून काँग्रेसला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले, तर ३ जागांवर अपक्ष निवडून आले आहेत.

दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झाले होते, तर बुधवारी मतमोजणी पार पडली. या निवडणुकीसाठी २५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपने या निवडणुकीत पसमांदा कार्ड खेळत ४ पसमांदा मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. यात ३ महिला उमेदवार होत्या, मात्र यापैकी एकही उमेदवार या निवडणुकीत जिंकून येऊ शकला नाही. पसमांदा मुस्लीम समाज हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ठ्या मागास समजला जातो. यात अन्सारी, कुरेशी, मन्सुरी, सिद्दीकी अशा ४१ जातींचा समावेश आहे. २०१७ मध्ये भाजपने २७० पैकी १८१ जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा आपला केवळ ४८ जागांवर आणि काँग्रेसला ३० जागांवर विजय मिळवता आला होता, मात्र यंदा आपने दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला खर्‍या अर्थाने धूळ चारली आहे.

- Advertisement -

जगातील सर्वात मोठ्या पक्षाला हरवले
या विजयानंतर ‘आप’चे खासदार राघव चड्डा यांनी देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातील सर्वात मोठ्या पक्षाला हरवले, असे म्हणत भाजपला खोचक टोला लगावला. १० वर्षांपूर्वी आमच्या छोट्या पक्षाला ना निवडणूक लढता येत होती, ना कोणती संसाधने होती. केवळ लोक पाठिंब्यावर १० वर्षांत या छोट्याशा पक्षाने २ राज्यांत सरकार बनवले आहे. छोट्या पक्षाचे दिल्ली, पंजाब, गोवा आणि आता गुजरातमध्येही आमदार येतील, असेही चड्डा म्हणाले.

दिल्लीच्या लोकांना द्वेषाचे राजकारण आवडत नाही. जनता शाळा, रुग्णालये, वीज, स्वच्छता, पायाभूत सुविधांना मत देते.
– भगवंत मान, मुख्यमंत्री, पंजाब

- Advertisement -

सर्व दिल्लीकरांचे आभार. आता आपण सर्व मिळून दिल्ली स्वच्छ आणि सुंदर बनवूयात. दिल्ली ठिक करण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आशीर्वाद हवेत. जे २५० नगरसेवक विजयी झाले ते कोणत्याही पक्षाचे नाहीत.
– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

भलेही या निवडणुकीत आप जिंकली असेल, तरी अजून महापौर निवडीची प्रक्रिया प्रलंबित आहे. जरी निवडणुकीत आम्ही बहुमतापासून थोडे मागे राहिलो असलो तरी हिंमत हरलेलो नाही. ज्यावेळी महापौरांच्या निवडीची प्रक्रिया पार पडेल, तेव्हा सर्व गोष्टी स्पष्ट होतील.
-आदेश गुप्ता, भाजप अध्यक्ष, दिल्ली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -