घरसंपादकीयअग्रलेखभाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी

भाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी

Subscribe

शिवसेनेच्या पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट करत भाजपने आधीच कोंडी केली असतानाच नाशिक, ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही यशस्वी ठरलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अशा प्रकारे कोंडीत पकडले जात असल्याने येत्या काही महिन्यातच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होईल या भीतीपोटी शिंदेंसोबत गेलेले आमदारही आता अस्वस्थ होऊ लागले आहेत.

ज्यांचे तिकीट कापले त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असा विश्वास शिंदेंना द्यावा लागत असल्याने शिंदे गटातील खदखद वाढू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपावरून भाजपने कोंडी केली आहे. भाजपने आपल्या जागा जाहीर करून मित्रपक्षांना मतदारसंघासाठी वाट बघावी लावली होती, तर आपल्या मर्जीतील नवनीत राणांसारख्या उमेदवारांना सहजपणे उमेदवारी देण्याचे काम भाजपने केले.

- Advertisement -

नाशिक, ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम असल्याने शिवसेना अजूनही भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आलेल्या तेरापैकी तेरा खासदारांना तिकिटे देऊ शकत नाहीत हे सध्याचे चित्र पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच धोकादायक आहे. मूळ शिवसेना आपलीच आहे, असा दावा करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीसाठी दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर अवलंबून राहावे लागत आहे.

बाळासाहेबांची शिवसेना असे नाव धारण करणार्‍या शिंदे सेनेला भाजपचे पक्षश्रेष्ठी आपल्या तालावर नाचवत आहेत. विद्यमान खासदार हेमंत पाटील, भावना गवळी यांच्यासह शिंदे गटाच्या पाच खासदारांची तिकिटे भाजपकडून कापली गेली. हेमंत गोडसे यांच्यासाठी शिंदे गटाला संघर्ष करावा लागत आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्याने हेमंत गोडसे यांची कोंडी झाली होती. उमेदवारीसाठी गोडसेंवर मुंबईत येऊन शक्तिप्रदर्शन करण्याची वेळ आली होती.

- Advertisement -

भुजबळांनी गेल्या आठवड्यात नाशिकमधून निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करूनही ही जागा शिंदे गटाला भाजपकडून अद्याप सोडण्यात आलेली नाही. यावरून भाजप शिंदे गटाला वेठीस धरत असल्याचे दिसून आले. आपल्या गटाला किमान १६ जागा मिळतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी एका मुलाखतीत म्हटले आहे, पण १३ खासदारांनाच उमेदवारी मिळवताना करावी लागणारी कसरत पाहता शिंदेंना भाजप १६ जागा देईल का, हा खरा प्रश्न आहे. विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनाही भाजपमधून फार मोठा विरोध झाला होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजप नेते जागावाटपासाठी मातोश्रीच्या पायर्‍या झिजवत असत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या खासदारांना तिकिटे मिळवून देण्यासाठी दिल्लीच्या वार्‍या कराव्या लागत असल्याचे दिसणारे चित्र नक्कीच आशादायी नाही. शिवसेना पक्षाच्या बैठकीत खासदारांनी आणि नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर याबद्दल नाराजी व्यक्त केली होतीच. फक्त स्वत:चे मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी त्यांना आता आपल्या काही खासदारांचा बळी द्यावा लागेल अशीच परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे.

रामटेकमध्ये कृपाल तुमाने एकनाथ शिंदे यांच्या विश्वासावर त्यांच्यासोबत आले, परंतु त्यांच्या जागी राजू पारवे या काँग्रेसमधून आलेल्या भाजपच्या पसंतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्याची वेळ शिंदे गटावर आली. यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचेही तिकीट कापण्यात आले. त्यामुळे पश्चिम विदर्भातील शिंदे सेनेचे नेते अस्वस्थ आहेत. भाजपच्या या वापरा व फेका प्रवृत्तीला आगामी विधानसभा निवडणुकीत कसे तोंड द्यायचे, असा प्रश्न आता शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांना पडला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांची भाजपविरोधात बोलण्याची हिंमत नाही.

लोकसभा निवडणुकीत आपल्या खासदारांना आपण तिकीट देऊ शकत नाही याची खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे, परंतु त्यासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावे लागेल याचीही त्यांना भीती आहे. लोकसभा निवडणुकीत कमी तिकिटे देऊन उद्याच्या विधानसभा निवडणुकीत या निकालाचा दाखला दिला जाईल. त्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याच्या विधानसभेच्या जागाही कमी होण्याची दाट शक्यता आहे.

शिंदे सेनेतीलच आमदार अशी चिंता व्यक्त करत आहेत. विद्यमान खासदारांना उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी लागली, परंतु उमेदवारीचा निर्णय भाजपच्या हातात आहे. त्यामुळे इच्छा असूनही कोणताही टोकाचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत मुख्यमंत्री शिंदे नाहीत. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत ज्यांचे तिकीट कापले त्यांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल. लोकसभेच्या १६ जागा मिळतील, असा दावा केला असला तरी सध्या शिवसेनेच्या जागावाटपापासून ते उमेदवार ठरवण्यापर्यंतचे निर्णय भाजपच्या मतानुसारच होतात हे सत्य उघड झाले आहे.

काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवरा यांना राज्यसभेत पाठवणे ही भाजपची खेळी होती. शिंदे गटाच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा मिळेल असे शिंदे गटाला वाटत होंते, पण आता भाजपने तिथेही कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही दबावाखाली काम करत नाही. सत्तेसाठी तडजोड केली नाही, असे सांगत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपने पुरती कोंडी केली आहे. त्यातून ते कसा मार्ग काढतात ते पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -