घरसंपादकीयअग्रलेखअसुरक्षिततेच्या भयामुळे पक्षहानी!

असुरक्षिततेच्या भयामुळे पक्षहानी!

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत जे झाले तेच कधीतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत होणार होते, पण ती शक्यता लक्षात घेऊन शरद पवारांनी काळजी घेतली होती, पण विशिष्ट काळानंतर त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी ते झालेच. शरद पवार यांच्यासोबत राजकारणात लहानाचे मोठे झालेले आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मानले जाणारे अजित पवार यांनी निर्णायक बंड करून काकांना धक्का दिला. अजितदादांनी

यापूर्वीही बंडखोरी करून देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेला राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ते बंड शरद पवारांनी पद्धतशीरपणे मोडून काढले होते. त्याचसोबत अजितदादांना पुन्हा स्वगृही आणण्यात शरद पवार यांची पत्नी प्रतिभाताई पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी अजितदादा यांच्यासोबत पवारांचे खास समजले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील असल्यामुळे आता या बंडातून शरद पवारांना मागच्या वेळेसारखी हवा काढता येणे वाटते तितके सोपे नाही. त्यात पुन्हा काही दिवसांपूर्वी पवारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यामुळे पवार आता निवृत्तीच्या दिशेला वळत आहेत याची कल्पना त्यांच्या जवळच्या सहकार्‍यांना आली होती.

- Advertisement -

खरेतर पवारांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना जेव्हा पवारांनी राजकारणात सक्रिय केले तेव्हाच अजित पवार नाराज झाले होते. कारण त्यांना सत्तेचे समांतर असे दुसरे केंद्र तयार झाले होते. त्यापासून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना पत्रकार प्रश्न विचारत असत की, शरद पवार यांचे राजकीय वारसदार कोण? त्याचे निश्चित उत्तर दोघांनाही देता येत नव्हते. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्याला विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदामध्ये रस नाही. मला पक्षाची जबाबदारी द्या. आपल्याला प्रदेशाध्यक्षपदामध्ये रुची आहे, असे सांगितले होते. त्याच वेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती, पण अजितदादांच्या या नाराजीकडे शरद पवारांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यानंतर अल्पावधीत अजितदादा त्यांच्या समर्थक आमदारांना घेऊन भाजपसोबत गेले.

महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ही दोन प्रमुख राजकीय घराणी आहेत. अजितदादांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला आहे. जे एकनाथ शिंदे यांनी केले तेच अजितदादांनी केले. शिवसेना विचित्र पद्धतीने फुटली आहे. मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या या संघटनेची जी दशा झाली आहे ती पाहून त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना हळहळ वाटू लागली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता एकत्र यावे, अशी मागणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. तसे फलकही लावण्यात येत आहेत. नेते आपापल्या महत्त्वाकांक्षेसाठी वेगळे होतात, पण हातात हात घालून काम करणार्‍या कार्यकर्त्यांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती अशी होते.

- Advertisement -

त्यामुळे आपल्या नेत्यांनी मतभेद बाजूला सारून एक व्हावे, संघटनेला मजबूत करावे असे वाटते. राज ठाकरे आणि अजित पवार सुरुवातीपासून आपल्या काकांच्या राजकीय तालमीत वाढले, पण जेव्हा त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा मात्र काकांनी त्यांना डावलून आपल्या मुलांना पुढे आणले. आजवर ज्या काकांच्या सोबत आपण राहिलो, त्या काकांनी असे करावे, त्यामुळे नाराज झालेल्या या दोघांनी बंड केले. राज आणि उद्धव त्यांच्याकडे उपजतच नेतृत्वगुण होते, पण ज्यावेळी स्वपक्षातील एखादा नेता स्वयंप्रेरित असतो, त्यावेळी तो पुढील काळात आपले ऐकेल का, आपल्या स्थानाला धक्का बसेल का, अशी भीती मुख्य नेत्याच्या मनात निर्माण होते. त्यातूनच मग त्याला बाजूला सारण्यात येते. मुख्य जबाबदारीपासून दूर ठेवण्यात येते. त्याच्या महत्त्वाकांक्षेला वेसण घालण्यात येते.

राज यांच्याकडे मुख्य सूत्रे दिली तर ते उद्या आपल्याला मान देतील का, तसेच निर्णय घेताना ते आपले मत विचारात घेतील का, अशी शंका बाळासाहेबांच्या मनात आली असावी. शरद पवारांच्या बाबतीतही तसेच झाले. कारण जेव्हा जेव्हा अजितदादांना मोठी संधी देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना बाजूला ठेवले. त्याविषयीची नाराजी अजितदादांनी काही वेळा दाखवून दिली, पण शरद पवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असे कार्यकर्ते म्हणत असले तरी तसे होईल असे वाटत नाही.

कारण राज यांच्या नेतृत्वामुळे आपण झाकोळून जाऊ अशी भीती उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे. त्यामुळे यापूर्वी राज यांनी टाळीसाठी हात पुढे केला, पण उद्धव ठाकरे यांनी टाळी दिली नाही. अगदी काँग्रेसचीही तशीच अवस्था आहे. सोनिया गांधी यांनी सुरुवातीलाच प्रियांका गांधी त्यांना पुढे आणले असते, तर पक्षाची इतकी वाताहत झाली नसती, पण प्रियांका गांधी आपल्याला जुमानतील का, ही भीती त्यांच्या मनात होती. पक्षांच्या मुख्य नेत्यांच्या मनात असलेल्या या असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांनी जे निर्णय घेतले त्याची किंमत पुढे पक्षाला मोजावी लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -