घरसंपादकीयअग्रलेखद्वेष विरुद्ध द्वेष!

द्वेष विरुद्ध द्वेष!

Subscribe

शिवसेनेतील फुटीनंतरचे ५७ व्या वर्धापन दिनाचे दोन मेळावे सोमवारी मुंबईत पार पडले. गेल्या वर्षी २० जून रोजी शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याची अखेर ३० जून रोजी शिंदे भाजपच्या मदतीने राज्याचे मुख्यमंत्री होण्यात झाली. पुढे पक्षाचे चिन्ह, नाव यावरून कोर्टबाजी झाली, केंद्रीय निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले गेले. यातून शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले. हा गदारोळ सुरू असताना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात पराकोटीचा तणाव वाढला आणि दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. या दोन गटातील वाद आता इतका टोकाला पोहचलाय की अशा प्रकारचा वाद राज्याच्या राजकारणात फारसा कधी अनुभवायला आलेला नसेल. मुंबईत वर्धापन दिनाचे जे दोन मेळावे झाले त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेण्यात आले.

पक्षाच्या वर्धापन दिनाचा मेळावा असला की उपस्थित कार्यकर्ते आपला नेता पुढील वाटचालीसाठी कोणती दिशा देणार, हे ऐकण्यास उत्सुक असतो. पण या दोन्ही मेळाव्यांतून दिशा मिळणे राहिले दूर, राजकारणातील वैचारिक पातळीची कशी दशा उडालेय, याचा प्रत्यय आला. शाब्दिक कोट्या करून नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर मनसोक्त टीका केली. तर शिंदे यांनीही ठाकरेंबाबत तोच कित्ता गिरवला. तिकडे कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेलक्या भाषेत उद्धव ठाकरे यांची ‘धुलाई’ केली. ठाकरे, फडणवीस, शिंदे यांची अशी ही किती दिवस धुलाई चालणार आहे, असा प्रश्न लोकांना पडला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याने ठाकरे यांच्यावर शिंदे गटासह भाजपाने पद्धतशीरपणे शरसंधान साधले आहे. त्यामुळे ठाकरे यांनीही शिंदे, फडणवीस यांच्यासह नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले आहे. मोदी हे सूर्य असल्याचा साक्षात्कार शिंदे यांना होणे स्वाभाविक आहे. पण ठाकरे यांना ते मान्य नसल्याने मणीपूरमध्ये तुमचा सूर्य केव्हा उगवणार, असा सवाल केला. यावरूनही आता ठाकरे विरुद्ध भाजप, शिंदे अशा चकमकी भविष्यात झडतील यात शंका नाही. सध्या सर्व नेते एकमेकांवर तुटून पडत असल्याने निवडणुका जवळ आल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.

लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक होणार का, तसे झाले तर महाराष्ट्र विधानसभेचीही मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते, या शक्यतांवर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षणात वातावरण भाजपसह शिंदे गटाला अनुकूल असल्याचे म्हटले गेल्याने निवडणुकीची तयारी भाजपकडून सुरू होऊ शकते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना दिवसागणिक ऊत येणार, यात शंका नाही. मुदतपूर्व निवडणुका झाल्या नाही तरी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. परिणामी एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे राजकारण अत्युच्च पातळी गाठणार आहे.

- Advertisement -

सध्या आरोप-प्रत्यारोपांतून राजकारणाची पातळी घसरल्याचे स्पष्ट दिसत असल्याने आगामी निवडणुकांत प्रचाराची पातळी निश्चितपणे खालावणार हे सांगण्यास कुणाही राजकीय तज्ज्ञाची गरज नाही. राजकारणाशिवाय या राज्यात दुसरे कोणते प्रश्नच शिल्लक नसल्याचे वातावरण तयार झाले आहे. कोणताही कार्यक्रम असला तरी मुख्यमंत्री, मंत्री विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तेथे काही बोलता आले नाही तर बाहेर प्रसारमाध्यमांसमोर येऊन विरोधकांवर, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर, टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. राजकारणातील ही झोंबाझोंबी सर्वसामान्यांच्या पचनी पडलेली नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. राज्यापुढे अनेक प्रश्न असल्याने त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. राजकीय नेते एकमेकांची औकात काढण्यात धन्यता मानले आहेत.

सध्या द्वेष विरुद्ध द्वेष असे वातावरण आहे. राजकारण म्हटले की असे चालायचेच असा यावर युक्तिवाद केला जाईल. हिन पातळी गाठलेल्या राजकारणात सुशिक्षित तरुण पिढी उतरेल का, हा सवाल आजही अनुत्तरित आहे. खालच्या पातळीवरील भाषा राजकारणातील ‘अलंकारिक’ भाषा ठरत आहे. अशी ‘अलंकारिक’ भाषा वापरत शिवेसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांचा खरपूस समाचार घेतला. ‘कुठे नेऊन ठेवलंय राजकारण’ असे म्हणून कपाळावर हात मारून घेण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे. ५८ वा वर्धापन दिन साजरा होईल तेव्हा उपस्थितांना वैचारिक खुराकच मिळेल, असा संकल्प दोन्ही गटांनी सोडला तर बरे होईल.

दोन्ही शिवसेनेत तुंबळ वाक्युद्ध सुरू असताना दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाला विधान परिषदेत धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने या गटाचे ९ आमदार उरले आहेत. सध्या विरोधी पक्ष नेतेपद ठाकरे गटाकडे आहे. ७८ सदस्यीय विधान परिषदेत २१ जागा रिक्त असून, राष्ट्रावादी काँग्रेसचेही ९ आमदार आहेत. त्यामुळे विरोधी नेते पदावर राष्ट्रवादी दावा ठोकणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते याबाबत कोणता निर्णय घेणार, हा औत्सुक्याचा भाग आहे. तूर्त तरी यात जैसे थे स्थिती ठेवली जाण्याची शक्यता अधिक आहे. यदाकदाचित विरोधी पक्ष नेतेपद गमाविण्याची वेळ आलीच तर तो ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -