घरसंपादकीयअग्रलेखटोमॅटो खातोय भलताच भाव!

टोमॅटो खातोय भलताच भाव!

Subscribe

एखाद्याच्या तब्येतीचे कौतुक करताना टोमॅटोसारखे लाल गाल, अशी उपमा सर्रासपणे दिली जाते. त्या तुलनेत डोळ्यात पाणी आणणार्‍या कांद्याला मात्र नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागते. खरेतर कांदा आणि टोमॅटो ही कुठल्याही स्वयंपाकघरात अधिराज्य गाजवणारी जोडगोळी. खाद्यपदार्थ कुठलाही असो व्हेज किंवा नॉन व्हेज, कांदा-टोमॅटोची पेस्ट वा तडक्याशिवाय मजाच नाही. झटपट होणार्‍या कांदा-टोमॅटो चटणीच्या जोडीला चपाती म्हणजे सकाळच्या ऑफिस अवरच्या गडबडीत डबा तयार करताना गृहिणींना मोठा आधार. असा हा नेहमीच साथसोबत करणारा लालबुंद टोमॅटो सध्याच्या घडीला गृहिणींच्या डोळ्यातून आसवे काढत आहे.

राज्याच्या राजकारणात कुठला नेता कुठल्या गटात जाईल याचा नेम नाही. अशा अनिश्चिततेच्या काळात टोमॅटोनेही या धूर्त राजकारण्यांचे अनुकरण करत स्वस्ताईचा पक्ष सोडून महागाईच्या पक्षात प्रवेश करत सर्वसामान्यांना जबरदस्त धक्का दिला आहे. दोघेही वरच्या पातळीवर जाऊन पोहोचल्याने खाली सर्वसामान्यांचे काय हाल होताहेत हे बघण्याची उसंत त्यांना नाही. कधीकाळी कांद्याच्या दराने उसळी घेताच हॉटेलच्या मेन्यूतून कांद्याची भजी, कांदा पोहे, मिसळीतून कांदे गायब व्हायचे आता पिझ्झा-बर्गरमधून टोमॅटोने काढता पाय घेतल्याने या धोरणावर युवा पिढी नाराज होण्याची दाट चिन्हे आहेत.

- Advertisement -

महिनाभरापूर्वी २० ते ३० रुपये किलो दराने मिळणार्‍या टोमॅटोचे दर आता किरकोळ बाजारात १२० ते १६० रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचले आहेत. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे खाटकाच्या दुकानात ब्रॉयलर चिकनदेखील १६० रुपये प्रति किलो रुपयांना मिळते. इथे चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला ही म्हणही बिनकामाची ठरेल. कारण अख्ख्या मसाल्याचा खर्च एकीकडे आणि एकट्या टोमॅटोचा खर्च दुसरीकडे अशी गत झाली आहे. त्यामुळे सूप चिकनचे प्यायलात काय किंवा टोमॅटोचे तुम्हाला फिल शाहीच येईल, याची हमी. फक्त राज्यातच ही परिस्थिती नाही, तर देशातील अनेक भागात टोमॅटोच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

ही दरवाढ महाराष्ट्रासह दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशमध्येदेखील पहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने आधीच देशभरात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याचा अनुभव देशभरातील बळीराजा घेत आहे. पुरवठा आणि मागणीतील व्यस्त प्रमाणाने टोमॅटोचीही गणित बिघडवून टाकले आहे. याआधी आवक मोठी आणि मागणी कमी असल्याने फेब्रुवारी ते अगदी एप्रिल महिन्यापर्यंत बाजारात टोमॅटोला म्हणावा तसा भाव नव्हता. ग्रामीण भागात तर टोमॅटोचे दर प्रति किलो ५ ते १० रुपयांपर्यंत खाली आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत २० किलोच्या कॅरेटला २० ते ३० रुपयांचा भाव होता.

- Advertisement -

म्हणजेच एका किलोला जवळपास एक ते दीड रुपये इथपर्यंत टोमॅटोने लोळण घेतली होती. टोमॅटो पिकासाठी लाखभर रुपये खर्च करूनही २० ते २५ हजार रुपये हाती पडत होते. उत्पादन खर्च तर दूरच तोडणी आणि वाहतुकीचा अर्धा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल केला होता. त्यावेळी निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी होत होती. त्याच्या अगदी उलटे चित्र सध्या बाजारात दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनला उशीर झाला. अजूनही सरासरीपेक्षा पाऊस कमीच पडला आहे. त्यामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले आहे. त्याआधी कडाक्याच्या उकाड्यामुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम होऊन उत्पादन घटले होते. भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनीही टोमॅटोच्या पिकाकडे दुर्लक्ष केले. याचा एकत्रित परिणाम म्हणजे बाजारात टोमॅटोची आवक घटली आहे.

नाशिक, नगर, पुणे, औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच राजस्थान, बंगळुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मंडईंमध्ये मोठी आवक होते, परंतु इतर राज्यांतून होणारी आवकही घटली आहे. त्यामुळे प्रति क्विंटल सरासरी ६ ते ८ हजार रुपयांपर्यंत टोमॅटोचे दर उसळले आहेत, पण त्याचा फायदा मोजके शेतकरी वगळता कुणालाही मिळताना दिसत नाही. सर्वसामान्यही टोमॅटो खरेदी करताना हात आखडता घेऊ लागलेत. टोमॅटो असे पीक आहे, जे बाजारात आल्यानंतर दोन नाहीतर चार दिवसांत खराब होतेच. नवीन टोमॅटोचे पीक बाजारात येईपर्यंत किमान महिना दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे, तोपर्यंत किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर चढेच राहणार आहेत.

मान्सूनला उशीर झाल्याने केवळ टोमॅटोच नाही तर मंडईतील इतर हिरवा भाजीपालाही महागला आहे. कोथंबिरीची एक जुडी ८० ते १०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्याशिवाय शिमला मिरची ८० ते १०० रुपये प्रति किलो, गवार १०० ते १२० रुपये प्रति किलो, वांगे ७० ते ८० रुपये प्रति किलो, भेंडी ७० ते ८० रुपये प्रति किलो, वाटाणा १०० ते १२० रुपये प्रति किलो, घेवडा १०० ते १२० रुपये प्रति किलो, फरसबी १०० ते १२० रुपये प्रति किलो दर झाले आहेत. तूर, मूग, मटकी आणि इतर कडधान्यांच्या पिकालाही मान्सूनचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. जोपर्यंत नवे पीक बाजारात येत नाही, तोपर्यंत भाववाढीमुळे कोलमडलेले गृहिणींचे बजेट सावरण्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. कारण सध्या टोमॅटोचे भाव खाण्याचे दिवस आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -