घरसंपादकीयअग्रलेखकेसीआर की केबीसी!

केसीआर की केबीसी!

Subscribe

दोन दिवसांपूर्वी ‘गुलाबी वादळ महाराष्ट्रात’ अशी बातमी काही दूरचित्रवाहिन्यांनी देण्यास प्रारंभ केला तेव्हा अलीकडच्या चक्रीवादळांमुळे धास्तावलेल्या जनतेला वाटले असावे की ही आणखी कुठली आपत्ती येऊ घातली आहे, पण राजकीय नेत्यांपैकी अनेकांना या वादळाची भीती वाटत असावी. गुलाबी उपरणे अंगावर टाकून तेलंगणाचे मुख्यमंत्री कल्वाकुंतला अर्थात के. चंद्रशेखर राव श्रीक्षेत्र पंढरपुरात दाखल झाले आणि त्यांचे ज्या पद्धतीने स्वागत झाले ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनाही याची दखल घ्यावी लागली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसीआर यांच्या पंढरपूर दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर कुणाला यायचे असेल त्यांनी यावे, मात्र राजकारणासाठी येऊ नये, असे वक्तव्य केले होते.

याचा अर्थ राजकीयदृष्ट्या या दौर्‍याला असलेले महत्त्व फडणवीसांनी जाणले. पंढरपुरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकर्‍यांची गर्दी झालेली असताना केसीआर मंत्री, आमदार, खासदारांसह सोमवारी तेथे दाखल झाले. केसीआर यांनी महाराष्ट्रावर पद्धतशीरपणे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. नांदेड आणि नागपूर येथे त्यांनी स्थापन केलेल्या भारत राष्ट्र समितीचे मोठे मेळावेही झाले. काही दिवसांपूर्वी जळगावमधील सावखेडा ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या पक्षाला बिनविरोध सरपंचपदही मिळाले. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचा हा चंचूप्रवेश प्रत्येक राजकीय पक्षाने दखल घ्यावी असा आहे. त्यामुळे केसीआर यांचा झंझावात किंवा वादळ हे वावटळ असल्याचे म्हणणार्‍यांना चपराक बसली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजकीय परिपक्वता दाखवत केलेले विधान महत्त्वाचे म्हणता येईल. के. चंद्रशेखर राव हे भारतीय असल्याने त्यांना कोणत्याही राज्यात पक्ष स्थापन करण्याचा किंवा आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असून त्यांना कमकुवत समजण्याची चूक कोणी करू नये, असे ते म्हणाले होते. पवार यांनी केलेल्या विधानाची दखल आता सर्वच राजकीय पक्षांना घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात १५ विरोधी पक्षांची मोट बांधली जात असताना केसीआर यांच्यासह मायावती, ओवेसी, जगन रेड्डी, चंद्राबाबू नायडू, नवीन पटनायक यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

कदाचित त्यामुळेच केसीआर यांची भारत राष्ट्र समिती भाजपची बी टीम असल्याचा आरोप होत आहे. असाच आरोप अलीकडे ओवेसी यांच्या एमआयएमबाबत झाला आहे. केसीआर यांनी मोदींविरोधात शड्डू ठोकल्याचे म्हटले जात असले तरी तेलंगणा राज्याशेजारीच असलेल्या महाराष्ट्रावरच प्रथम लक्ष का स्थिरावण्याचा प्रयत्न चालवलाय, असा सवाल अनेकांपुढे आहे. केसीआर जेव्हा भूमिका स्पष्ट करतील तेव्हाच वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीचे भलेमोठे होर्डिंग्ज हमरस्त्यावर लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisement -

असा दावा केला जातोय की अल्पावधीतच या समितीचे महाराष्ट्रभर दोन लाख सदस्य झाले आहेत. नेते आणि प्रमुख कार्यकर्ते हायटेक असतील याचीही पद्धतशीरपणे काळजी घेतली जात आहे. त्यासाठी पैशांची कुठे कमतरता पडणार नाही याचीही काळजी घेतली जात असल्याची चर्चा आहे. तसे असेल तर हा पैसा कुठून येतोय याची माहिती समोर येण्याची गरज आहे. केसीआर यांची भारत राष्ट्र समिती पाठिंबा देणार का, याची वाट काही प्रमुख राजकीय पक्ष पाहत असावेत आणि त्यामुळे पैशांच्या चौकशीची मागणी करण्याबाबत कदाचित सबुरी स्वीकारली जात असावी. तेलंगणासारख्या एका नवनिर्मित राज्याचा मुख्यमंत्री पक्षवाढीसाठी ढिले हात सोडतोय हा प्रकारच सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारा आहे. त्यामुळे ‘कौन बनेगा करोडपती’ पाहताना त्यात मिळणार्‍या मोठमोठ्या रकमेच्या बक्षिसांमुळे लोक जसे भारावून जात होते, तशी अवस्था सध्या महाराष्ट्रात झालेली आहे.

आंध्र प्रदेशमधून तेलंगणा या दुसर्‍या राज्याची निर्मिती व्हावी म्हणून त्यांनी काँग्रेसच्या राजवटीत या पक्षाला पाठिंबा देऊ केला होता. शिवाय केंद्रात मंत्रीपदही भूषविले होते. कधीकाळी तेलुगू देसम पार्टीचे सदस्य असलेल्या केसीआर यांनी तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी तेथून बाहेर पडत तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली. नंतर काँग्रेसशी युती करून निवडणूक लढवली. तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर २०१४ मध्ये ते त्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. आपल्या कारकिर्दीत तेलंगणाचा कायापालट कसा झपाट्याने होतोय हे दाखविण्यासाठी त्यांनी देशातील प्रमुख वर्तमानपत्रांना जाहिराती देण्याचा सपाटा लावला आहे. यावर अफाट खर्च होत आहे. विरोधकांच्या टीकेला केसीआर जुमानत नाहीत.

त्यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही, मात्र विरोधी पक्षांना जाऊन मिळाले तरी ही आघाडी केसीआर यांचा चेहरा पंतप्रधानपदासाठी पुढे करण्याची अजिबात शक्यता नाही. भाजपला पाठिंबा दिला तरी तेथे त्यांची डाळ शिजणार नाही. एका ठरावीक मर्यादेपर्यंतच त्यांना सीमित ठेवले जाईल. धूर्त राजकारणी अशी ओळख असलेल्या केसीआर यांना याची कल्पना असणार यात शंका नाही. म्हणून आस्ते कदम टाकत त्यांनी महाराष्ट्रातील असंतुष्टांना हेरण्याचा सपाटा लावला आहे. अनेक जण त्यांच्या पक्षात सामील होत आहेत. या समितीने निवडणूक रिंगणात उडी घेतली तर काही ठिकाणच्या लढती चुरशीच्या होतील, असे तूर्त तरी वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -