घरसंपादकीयअग्रलेखमराठा मंडळाची पुन्हा गरज!

मराठा मंडळाची पुन्हा गरज!

Subscribe

महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीरवैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्रातील सगळ्या मराठीजणांचे ऊर अभिमानाने भरून येईल, अशा या चैतन्य पंक्ती थोर विचारवंत आणि समाजसुधारक सेनापती बापट यांनी लिहून ठेवल्या आहेत. पण आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर मराठी माणसे आरक्षणाचा विषय घेऊन एकमेकांविरोधात आक्रमक झालेली दिसत आहेत. त्यातून काही ठिकाणी हिंसाचार पेटला. त्यात आता मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी असे विविध समाजगट आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झालेले दिसत आहेत. ही आक्रमकता आणि एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप अधिक प्रखर होत चालले आहेत.

आरक्षणावरून आपापल्या समाजगटांसाठी पुढाकार घेणारे नेते एकमेकांविषयी बोलताना एकेरीवर येत आहेत. सेनापती बापट यांनी मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, या ओळीत मराठा शब्द हा संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या मराठी माणसांसाठी योजला आहे. आजही आपण पाहिले तर असे दिसेल की, अन्य राज्यांमधील लोक महाराष्ट्रातील सगळ्या मराठी लोकांना मराठे असेच संबोधतात. त्यामुळे जसे भारतात असताना आपण विविध राज्यांचे म्हणून ओळखले जातो, पण जेव्हा आपण विदेशात जातो, तेव्हा तेथील लोकांकडून आपण सगळे इंडियन्स म्हणजेच भारतीय म्हणून संबोधले जाते. तसेच आपण जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो, तेव्हा त्या लोकांकडून आपण सगळे मराठे म्हणूनच संबोधले जातो आणि ओळखले जातो. जेव्हा पानिपतावर महाराष्ट्राच्या बाहेर युद्ध झाले, तेव्हा तिथे लढणारे सगळे मराठे होते, महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक तिथे गेलेेले होते. पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला तेव्हा पराभूत होणारे हे केवळ एका जातीचे नव्हते, तर ते आपण सगळे मराठे होतो, हे विसरून चालणार नाही.

- Advertisement -

राज्यातील सगळ्या मराठी लोकांनी एकत्र येऊन काही वर्षे लढा दिला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली. महाराष्ट्र हा शब्द तेव्हाच उदयाला आला. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन आपला विकास आणि उत्कर्ष साधावा यासाठी विकासाच्या अनेक योजना हाती घेतल्या. इतकेच नव्हे तर सगळ्या मराठी भाषिकांनी साहित्यिक आणि सांस्कृतिक विकास साधावा यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांना साहित्यिक आणि पत्रकार ग. त्र्यं. माडखोलकर यांनी विचारले की, हे राज्य मराठ्यांचे आहे की, मराठीजणांचे आहे, तेव्हा त्यांनी हे राज्य सगळ्या मराठी माणसांचे आहे, असे सांगितले. यशवंतराव चव्हाण केंद्रात मंत्री असतानाची एक आठवण सांगितली जाते.

त्यांची गाडी हरयाणामधून जात होती, त्यावेळी त्यांना ‘पानिपत’ असा फलक दिसला. त्यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितले. ते गाडीतून उतरले. समोरच्या माळरानावर चालत गेले. अतिशय भावनिक होऊन ते खाली बसले. तिथली माती दोन्ही मुठींमध्ये घेऊन ती माती त्यांनी कपाळी लावली. सोबतच्या अधिकार्‍यांना काही कळेना, त्यांनी विचारले, साहेब काय झाले? त्यावेळी यशवंतराव म्हणाले, मित्रांनो, माझ्या लाखो मराठी बांधवांचे रक्त या मातीत मिसळले आहे. ही माती नव्हे हे कपाळी लावायचे भस्म आहे. असे म्हणून त्यांनी आपल्या मनातील आपल्या शहीद मराठी बांधवांप्रती असलेल्या आस्थेला डोळ्यांतून वाट मोकळी करून दिली. या मराठी नेत्याने मोठ्या उमेदीने आणि आशेने आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. त्याच महाराष्ट्रामध्ये आज आरक्षणावरून मराठी लोक एकमेकांचे गळे पकडण्यासाठी आक्रमक झालेले आहेत. सध्या आरक्षणावरून जे काही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्याची तीव्रता वाढत आहे ते पाहिल्यावर पुढील काळात कुठल्याही सरकारला हा उद्रेक थांबवता येईल, असे वाटत नाही. मराठी लोकच आपापसात विभागून लढले तर कृष्ण जिवंत असतानाच त्याच्या डोळ्यासमोर सगळे यादव आपापसात लढून मेले तशी परिस्थिती महाराष्ट्रात येईल की काय, असे वाटू लागले आहे. त्यामुळे या आगीचे रूपांतर वणव्यात होऊन सगळ्या मराठी समाजाची हानी होऊ नये, म्हणून जाणकारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

आरक्षणातून आपला विकास साधला जाईल, असे आता प्रत्येकाला वाटत आहे. त्यामुळे त्यांना मिळाले तर माझ्या जातीलाही आरक्षण मिळाले पाहिजे, ही भावना उसळून उठत आहे. त्यातूनच मग मराठे म्हणतात आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या. ओबीसी म्हणतात, त्यांना आमच्यात घुसवून तुम्ही आमची गैरसोय कशाला करता? धनगर समाज म्हणतो, आम्हाला आदिवासी म्हणून आरक्षण द्या. तर आदिवासी म्हणतात, त्यांना आमच्याच घुसवून आमची गैरसोय करू नका. असे सगळे समाजगट जातीच्या नावावर वेगळे होऊन आक्रमक झालेले आहेत. त्यातून मार्ग कसा काढायचा, याचे राज्य सरकारसमोर आव्हान उभे राहिलेले आहे. ज्या वेळी भविष्याकडे पाहिल्यावर दिशा दिसत नाही, वर्तमान अस्वस्थ असते, तेव्हा भूतकाळातील एखादा आदर्श आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. जेव्हा मराठा सरदार आपापसात लढू लागले, तेव्हा पहिले बाजीराव पेशवे यांनी मराठा मंडळाची स्थापना केली. मराठा सरदारांनी एकमेकांविरोधात लढू नये, असा करार केला. आज महाराष्ट्रात मराठीजणांची आरक्षणावरून आपापसात सुरू असलेली लढाई पाहता पुन्हा अशाच मराठा मंडळाची गरज आहे, असे वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -