घरसंपादकीयअग्रलेखमोदींची मोहिनी...अमेरिकेची गरज!

मोदींची मोहिनी…अमेरिकेची गरज!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याचा आजचा चौथा दिवस, परंतु या दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशीच भारत-अमेरिकेतील मैत्री पर्वाने नवा कळसाध्याय गाठल्याचे दिसले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी अर्थात अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला होता. २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत अमेरिकेचा ६ वेळा दौरा केला आहे.

कधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात भाषण करण्यासाठी, तर कधी क्वाड सदस्य देशांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले आहेत, परंतु यावेळी त्यांना स्टेट गेस्ट अर्थात अमेरिकेचे विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. कधीकाळी याच अमेरिकेने गुजरात दंगलीचे कारण देत पंतप्रधान मोदींना अमेरिकेचा व्हिसा नाकारला होता. आज त्याच मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेने पायघड्या घातल्या हे महत्त्वाचे. मोदींनी विमानातून अमेरिकेच्या जमिनीवर पाय ठेवताच २१ बंदुकांची फैरी झाडत त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एकमेकांना दिलेले घट्ट आलिंगन या नव्या पर्वाची साक्ष देणारे ठरले.

- Advertisement -

स्टेट व्हिजिट हा अमेरिकेतील सर्वात वरच्या श्रेणीतील दौरा मानला जातो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या औपचारिक निमंत्रणानुसार तो होतो. जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून पंतप्रधान मोदी स्टेट व्हिजिट करणारे तिसरे नेते ठरले आहेत. याआधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक-यिओल यांना हा सन्मान मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या ४ वर्षांच्या कार्यकाळात एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला केवळ एकदाच स्टेट व्हिजिट अर्थात विशेष राजकीय भेटीवर बोलावू शकतात. अध्यक्ष जो बायडेन यांचा कार्यकाळ जानेवारी २०२५ मध्ये संपत आहे. तोपर्यंत पंतप्रधान मोदी पुन्हा अमेरिकेच्या राजकीय दौर्‍यावर जाऊ शकत नाहीत, तर भारतातही २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. ८० वर्षांचे जो बायडेन डेमोक्रॅट्सकडून दुसर्‍यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची मनीषा बाळगून आहेत. अमेरिकेतील संसद वा सरकारमधील भारतीयांचा दबदबा सातत्याने वाढत आहे.

अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस, संरक्षण उपमंत्रीपदी रवी चौधरी हे याचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन मतदारांची संख्या ४० लाखांहून अधिक आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स यांच्यात भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना आपलेसे करण्यासाठी शर्यत लागते. गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी केलेला जाहीर प्रचार सर्वांनाच आठवत असेल. तसाच अप्रत्यक्ष प्रयत्न यंदा जो बायडेन यांनी केल्याचे दिसले. मोदी आणि बायडेन यांच्या संयुक्त निवेदनावेळी व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर मोठ्या संख्येने भारतीय नागरिकांना प्रवेश देण्यात आला होता. असे चित्र अपवादानेच दिसते. तिथेही मोदी… मोदी… हे घोषवाक्य कानी पडल्यावर खूश होऊन अमेरिकेने केलेला हा सन्मान माझा नसून समस्त १४० कोटी देशवासीयांचा आहे, असे म्हणायला मोदी विसरले नाहीत.

- Advertisement -

स्टेट व्हिजिटमध्ये दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये झालेली द्विपक्षीय बैठक अनेक अंगांनी महत्त्वाची ठरली. या बैठकीत दोन देशातील परस्पर सहकार्य तसेच राजकीय संबंधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. सोबतच संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे करारदेखील करण्यात आले. यामध्ये भारतीय बनावटीच्या तेजस मार्क २ विमानांसाठी जीई कंपनीचे एफ ४१४ जेट इंजिन, प्रेडिएटर ड्रोन खरेदी, संयुक्त अंतराळ मोहीम राबवणे यांचा समावेश आहे. कोट्यवधी डॉलरचे हे करार आहेत. काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाने एअरबस आणि बोईंग या विमान कंपन्यांकडून ४७० विमाने खरेदी करण्याचा ७० अब्ज डॉलरचा करार केला. या कराराच्या माध्यमातून अमेरिकेत दीड ते दोन लाखांहून अधिक नोकर्‍या उपलब्ध होणार असल्याचे म्हटले जाते. आजघडीला अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे.

अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय बँकांना टाळे लागले आहे. कोविडने अमेरिकेची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असून तरुणांच्या हातातील रोजगार हिरावून घेतला आहे, तर दुसरीकडे जागतिक महासत्ता होण्याच्या लालसेने पछाडलेला चीन १४ शेजारी देशांना वर्चस्वाखाली आणण्यासाठी सातत्याने कुरापती काढत आहे. हिंदी महासागरातून दक्षिण चीन समुद्रापर्यंत जहाजांची तटबंदी उभारत आहे. अशा स्थितीत चीनला आवर घालतानाच देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अमेरिका भारताकडे मोठी संधी म्हणून पाहत आहे. युक्रेनवर युद्ध लादण्याआधी रशियानेही क्रिमियापासून सुरुवात केली होती. चीनच्या आसुरी महत्त्वाकांक्षेला बांध घालायचा असेल तर गलावान खोर्‍यात भीष्म पराक्रम गाजवणार्‍या भारताशिवाय दुसरा पर्याय नाही, हे अमेरिकेला पक्के ठावूक आहे.

भारत-रशियामधील जुन्या मैत्रीच्या दबावाची अमेरिकेला चांगली जाणीव आहे. म्हणूनच थेट लष्करी भागीदारी करण्याऐवजी मैत्रीचे सेतू बांधण्याला अमेरिका प्राधान्य देत आहे. चीनचे लष्कर भारतीय लष्कराच्या चौपट आहे. भारतीय लष्कर सध्या त्याची बरोबरी करू शकत नसले तरी इरादे मजबूत असल्याने आधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धसामुग्री देत भारताचे बाहू मजबूत करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरावा. तूर्तास तरी पंतप्रधान मोदींचा ४ दिवसांचा अमेरिका दौरा जगात भारताच्या वाढत्या राजकीय आणि आर्थिक दबदब्याचे प्रतीक ठरला, असेच म्हणावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -