घरसंपादकीयअग्रलेखशेवट गोड झाला...

शेवट गोड झाला…

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराचे खर्‍या अर्थाने शिल्पकार असलेले लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार केंद्र सरकारकडून जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. त्यावर लालकृष्ण अडवाणी यांनी समाधान व्यक्त करून आपल्या देशाविषयीच्या समर्पित भावना व्यक्त केल्या. लालकृष्ण अडवाणी भाजपमधील हार्ड कोअर म्हणजे कडवट हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतीच अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करून राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले, त्यासाठी भारताच्या इतिहासात नरेंद्र मोदी यांची नोंद घेतली जाईल. कारण राम मंदिराची उभारणी ही बाब अतिशय अवघड होती. श्रीराम हे हिंदूंचे आराध्य दैवत असले आणि हा देश जरी हिंदूबहुल असला तरी राम मंदिराला इथल्या अनेक हिंदूंचाच विरोध होता. त्याला त्यांनी सर्वधर्मसमभावाचा रंग दिलेला होता, हेच जर कुठल्या दुसर्‍या धर्मियांच्या विषयी असले असते तर ती त्यांची धार्मिक बाब आहे, म्हणून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले असते. त्यामुळे बरेचदा या हिंदूबहुल देशात हिंदूंची अवस्था स्वत:च्या घरी दूरचा पाहुणा मी, अशी होऊन बसते. राम मंदिरासाठी मोठा न्यायालयीन लढा द्यावा लागला. कपिल सिब्बल यांच्यासारखे धर्माने हिंदू असलेले लोकच राम मंदिराच्या विरोधात वकीलपत्र घेऊन सर्वोच्च न्यायालयात लढत होते.
राम मंदिर उभारण्यासाठी या हिंदूबहुल देशातील हिंदूंचा पाचशे वर्षे संघर्ष सुरू होता, या प्रदीर्घ कालावधीत अनेक हिंदूंनी बलिदान दिले. या सगळ्या समर्पणाची जाणीव लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी या दोघांना होती, त्यातूनच राम मंदिर उभे राहिले. आता राम मंदिर उभे राहिले असले तरी त्याच्या जागेवर पाचशे वर्षांपूर्वी मुस्लीम शासक बाबर याने जी मशीद बांधली होती, याचे काय करायचे हा प्रश्न होता. त्यासाठी मंदिर वही बनायेंगे, हा निश्चय करून लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा सुरू केली. त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हिंदूंच्या मनात काही शतकांपासून भीतीमुळे दबून राहिलेल्या भावनांना व्यक्त होण्यासाठी त्यामुळे वाव मिळाला. त्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या जागेवर असणारी मशीद कारसेवकांनी उद्ध्वस्त केली. राम मंदिर उभारले जावे, ही भावना अनेक हिंदूंच्या मनात होती. विश्व हिंदू परिषद आणि काही हिंदुत्ववादी संघटनांचे त्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी या चळवळीची सूत्रे आपल्या हाती घेतली, तेव्हा त्यात खर्‍या अर्थाने जोरकसपणा आला. त्यातूनच देशभर जे हिंदूमत जागे झाले त्यातूनच अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली आणि भाजपचे दोन खासदार होते, त्याचे दोनशे झाले आणि प्रथमच मित्र पक्षांच्या मदतीने भाजपची केंद्रात सत्ता आली. हे सगळे परिवर्तन घडविण्याचे श्रेय लालकृष्ण अडवाणी यांचे आहे. बाबरी मशीद पडल्यानंतर या चळवळीतील नेते म्हणून लालकृष्ण अडवाणींवर खटला चालला, त्याला ते मोठ्या धीटाईने सामोरे गेले. बाबरी मशीद पडल्यानंतर जगभरातून तीव्र पडसाद उमटत होते, त्यावेळी त्या सगळ्याला तोंड देऊन खंबीरपणे उभे राहणे अतिशय अवघड होते, पण अडवाणींनी तो सगळा विरोध झेलून मंदिर वही बनायेंगेचा निर्धार कायम ठेवला.
मोदी आणि अडवाणी हे भारतीय राजकारणातील एक विलक्षण समीकरण आहे. कारण जेव्हा मोदी राजकारणात नवखे होते, त्यांना फारसा अनुभव नव्हता, तेव्हा गुजरातमध्ये ज्येष्ठ भाजप नेत्यांचा जो काही संघर्ष सुरू होता, त्यातून मार्ग काढण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींना गुजरातमध्ये पाठवून त्यांना मुख्यमंत्री बनवले. मोदींनी त्या संधीचे सोने केले. मोदींनी अहोरात्र मेहनत घेऊन गुजरातमध्ये असा काही विकास घडवून आणला की, त्याची दखल जागतिक पातळीवर घ्यावी लागली. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण त्यात भाजपला यश आले नाही. त्यामुळे अडवाणी प्रचंड नाराज झाले. त्यानंतर २०१४ ची लोकसभा निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली भाजप लढवणार असा प्रश्न होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे येऊ लागले. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी नाराज झाले. त्यांनी आपल्या काही पक्षीय पदांचा राजीनामा दिला, पण पुढे नव्या दमाच्या नरेंद्र मोदी यांना भाजपमधून पसंती मिळाली. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, भाजपमधील केंद्रातील ज्येष्ठ नेते आपल्याला विरोध करणार हे मोदींच्या लक्षात आल्यावर त्यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी इत्यादींना सल्लागाराच्या भूमिकेत ठेवले. भाजपमध्ये जुने-नवे असे दोन गट पडले. नरेंद्र मोदी यांना लालकृष्ण अडवाणी यांनीच पुढे आणले, पण पुढे मोदींनीच त्यांना निवृत्त केले, असे चित्र निर्माण झाले. या कटुतेचा शेवट कसा होणार, अशी चर्चा होत असे, पण मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारकडून लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा बहुमान देण्यात आल्यामुळे शेवट गोड झाला, असेच म्हणावे लागेल.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -