घरसंपादकीयदिन विशेषसाहित्य संशोधक विनायक लक्ष्मण भावे

साहित्य संशोधक विनायक लक्ष्मण भावे

Subscribe

विनायक लक्ष्मण भावे यांचा आज स्मृतिदिन. विनायक भावे हे मराठी साहित्य संशोधन आणि ग्रंथाकार होते. त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1871 रोजी कुलाबा (विद्यमान रायगड) जिल्ह्यातील पळस्पे या गावी झाला. त्यांचे मराठी व इंग्रजी शिक्षण ठाणे येथे झाले. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून ते बी. एस्सी. झाले. ठाणे येथे माध्यमिक शिक्षण घेत असताना काव्येतिहाससंग्रह या मासिकाचे एक संपादक जनार्दन बाळाजी मोडक हे त्यांना मुख्याध्यापक म्हणून लाभले. जुन्या ग्रंथांचा जीर्णोद्धार करणे, मराठा काव्ये, जुन्या बखरी, इतिहासविषयक लेख प्रसिद्ध करणे हे काव्येतिहाससंग्रहाचे उद्दिष्ट होते. मोडकांचा सहवास व मार्गदर्शन यामुळे भावे यांना मराठी काव्ये वाचण्याची गोडी लागली. शालेय जीवनातच ते मराठी काव्ये आणि कविचरित्रे यांविषयी निबंध लिहू लागले होते. महाविद्यालयीन जीवनात विज्ञानाचा अभ्यास करीत असतानाही महीपति, श्रीधर, मुक्तेश्वर, अमृतराय यांसारख्या प्राचीन मराठी कवींची कविता ते वाचीत असत, तसेच प्राचीन मराठी साहित्याचे संशोधन करीत असत.

महाराष्ट्र सारस्वताच्या पहिल्या आवृत्तीचे लेखन त्यांनी महाविद्यालयात शिकत असतानाच केले होते. १८९३ मध्ये ठाणे येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाची त्यांनी स्थापना केली. १८९८ मध्ये भावे यांच्या वडिलांचे निधन झाले. नंतर वडिलांच्या मिठागरात लक्ष घालून त्यांनी मिठाचा व्यापार सुरू केला व त्यात यश मिळविले. १९१८ साली ते त्या व्यापारातून निवृत्त झाले व उर्वरित आयुष्य त्यांनी सर्वस्वी विद्याव्यासंगात घालविले. महाराष्ट्र सारस्वत हाच भावे यांचा पहिला ग्रंथ होय. त्याची पहिली आवृत्ती विष्णू गोविंद विजापूरकर संपादित ‘ग्रंथमाला’ या मासिकात क्रमशः प्रसिद्ध झाली (मार्च १८९८ ते मे १८९९). त्यानंतर या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. अशा या थोर साहित्य संशोधकाचे १२ सप्टेंबर १९२६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -