घरसंपादकीयदिन विशेषश्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी

श्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी

Subscribe

बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा आज स्मृतिदिन. बहिणाबाई या मराठी कवयित्री होत्या. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १८८० रोजी जळगावमधील असोदे या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे ‘लेवा गणबोली’ तील ओव्या व कविता रचून गात असत.

१९५० सालच्या जुलै-आगस्टमध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी आचार्य अत्रे यांच्याकडे आले. त्यांच्या हातात कवितांचे बाड होते. कविता चाळल्याबरोबर अत्रे उद्गारले ‘हे तर शंभर नंबरी सोने आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल!’ आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यास पुढाकार घेतला. अत्रे यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणार्‍या या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला.

- Advertisement -

या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही, की कोणाला दोष देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोर्‍या गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञानाचे वेगळेपण आहे. अशा या श्रेष्ठ कवयित्रीचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -