घरसंपादकीयदिन विशेषलोकप्रिय कादंबरीकार श्री. ना. पेंडसे

लोकप्रिय कादंबरीकार श्री. ना. पेंडसे

Subscribe

श्रीपाद नारायण पेंडसे हे लोकप्रिय मराठी कादंबरीकार होते. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९१३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोकणात, दापोली येथे झाले. नंतर बी. एस्सीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. ते काही काळ शिक्षक होते. पुढे ते मुबंईच्या बेस्ट परिवहनसंस्थेत उप-जनसंपर्क अधिकारी या पदावरून १९६८ मध्ये निवृत्त झाले. ‘खडकावरील हिरवळ’ (१९४१) हे पेंडसे यांचे पहिले पुस्तक. त्यात त्यांनी लिहिलेली शब्दचित्रे संगृहीत केलेली आहेत. अशा शब्दचित्रात्मक लेखनाकडून नंतर ते कादंबरीकडे वळले.

‘एल्गार’ (१९४९) या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला जाणत्या रसिकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘हद्दपार’ (१९५०) ‘गारंबीचा बापू’ (१९५२), ‘हत्या’ (१९५४), ‘यशोदा’ (१९५७), ‘कलंदर’ (१९५९), ‘रथचक्र’ (१९६२), ‘लव्हाळी’ (१९६६) आणि ‘ऑक्टोपस’ (१९७२) अशा ९ कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. एल्गारपासून कलंदरपर्यंतच्या ६ कादंबर्‍यांत कोकणचा निसर्ग समृद्ध प्रदेश त्यांनी प्रभावीपणे चित्रित केल्यामुळे प्रादेशिक कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. घटना-प्रसंग, निवेदन, संवाद, भाषाशैली यांसारख्या कादंबरीच्या घटकांची वेगवेगळी जाणीव ठेवून कादंबरीत केल्या जाणार्‍या कृत्रिम सजावटीचे तंत्र पेंडसे यांनी स्वीकारले नाही.

- Advertisement -

विशिष्ट प्रदेशात आणि वातावरणात माणसांची मने आणि जीवने कसकसे रंग धारण करतात, यासंबंधीच्या शोधातून आणि आकलनातून जन्माला आल्यामुळे पेंडशांच्या कादंबरीला मोठे बळ लाभले. पेंडशांनी नाट्यलेखनही केलेले आहे. ‘राजे मास्तर’ (१९६४), ‘यशोदा’ (१९६५), ‘गारंबीचा बापू’ (१९६५), ‘असं झालं आणि उजाडलं’ (१९६९) ही नाटके त्यांनी लिहिली. लेखक म्हणून अनेक सन्मान पेंडसे यांना लाभले. हद्दपार, हत्या, कलंदर या कादंबर्‍यांना व संभूसांच्या चाळीत आणि चक्रव्यूह या नाटकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले. अन्य भाषांतून पेंडसे यांचे साहित्य अनुवादित झालेले आहे. अशा या श्रेष्ठ कादंबरीकाराचे २३ मार्च २००७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -