घरसंपादकीयदिन विशेषप्रतिभासंपन्न लेखक पु. भा. भावे

प्रतिभासंपन्न लेखक पु. भा. भावे

Subscribe

पुरुषोत्तम भास्कर भावे हे मराठीतील एक अष्टपैलू व प्रतिभासंपन्न लेखक होते. कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, व्यक्तिचित्र, चिंतनात्मक लेख, चित्रपटकथा, प्रवासवर्णन इत्यादी विविध साहित्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी धुळे येथे झाला. लेखन हा भावे यांचा जीवनव्यापी व्यवसाय होता. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी ‘ओम् फस्’ ही कथा लिहिली व आपल्या लेखनतपस्येचा श्रीगणेशा केला. भावे यांचे संस्कारक्षम बालपण विदर्भात गेले व नागपूरला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास झाला. संपन्न घराण्यात जन्मास येऊनही जीवनातील खडतर अनुभव त्यांना घ्यावे लागले. वाचनाचे त्यांना विलक्षण वेड होते. या वाचनामुळेच त्यांच्यातील वाङ्मयाभिरूचीचे पोषण झाले.

किर्लोस्कर खबरमध्ये (जुलै १९३१) त्यांची ‘फुकट’ ही कथा प्रकाशित झाली. तथापि त्यांचे लेखणीचे व प्रतिभेचे सामर्थ्य प्रगट झाले ते त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे. ‘आदेश’ (१९४१-४८) या त्यांच्या स्वतःच्या साप्ताहिकातूनही त्यांचे अनेक चित्तवेधक लेख प्रसिद्ध झाले. ‘रक्त’ आणि ‘अश्रू’ (१९४२) हा त्यांचा लेखसंग्रह केवळ त्यांच्याच नव्हे, तर एकूण मराठी निबंधवाङ्मयातही अद्वितीय असा आहे. परखड परंतु तर्कशुद्ध, चिंतनात्मक तरीही भावना उचंबळून सोडणारे असे त्यांचे वाङ्मय वैशिष्ठ्यपूर्ण आहे. ‘वाघनखे’ (१९६१), ‘विठ्ठला पांडुरंगा’ (१९७३), ‘अमरवेल’ (१९७४), ‘रांगोळी’ (१९७६) इत्यादी त्यांचे १४ लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत.

- Advertisement -

भावे सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक असले तरी कर्मठ नव्हते, प्रतिगामी नव्हते. जीवनातील दिव्यत्व, पौरुष, सौंदर्य यांचे ते पूजक होते. स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असतानाच ते स्वैराचारावर टीका करीत. अशा या प्रतिभासंपन्न लेखकाचे १३ ऑगस्ट १९८० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -