घरसंपादकीयअग्रलेखपुनर्वसनाचे अवजड शिवधनुष्य!

पुनर्वसनाचे अवजड शिवधनुष्य!

Subscribe

महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपात सत्ताधारी महायुतीला उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कसरत करावी लागली. जागावाटपात महायुतीमधील बारा विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यातूनच काही ठिकाणी असंतोषाची ठिणगी पडली आहे. सध्या कुणालाही वार्‍यावर सोडले जाणार नाही. प्रत्येकाचे योग्यपद्धतीने पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही भाजपच्या नेत्यांकडून दिली गेली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात होत असलेल्या विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकांत असंतुष्टांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान भाजपला झेलावे लागणार आहे. महायुती सत्तेवर आल्यावर शिवसेनेतील अनेकांना मंत्रीपदाची हमी देण्यात आली होती, पण दोन वर्षे पूर्ण होत आली असतानाही ती पूर्ण न झाल्याने काही असंतुष्ट आमदार आपला संताप अधूनमधून व्यक्त करताना दिसतात. आपल्यानंतर सत्तेत आलेल्या अजित पवार गटाला विरोध असतानाही वजनदार खाती दिली गेली, ही खंतही शिंदे गटातील आमदारांमध्ये आहे. उपमुख्यमंत्रीपदावर आलेल्या अजित पवार यांना वित्तमंत्रीपदाची जबाबदारी देऊ नका, असा दबाब शिंदे गटातील अनेक आमदारांकडून येत होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार निधी न देता कोंडी करत असल्याचा आरोप सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार करत होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास अजित पवार हेही कारणीभूत आहेत, असेही शिंदे गटाचे आमदार वारंवार सांगत होते. पवारांविरोधात शिंदे गटात प्रचंड नाराजी असतानाही भाजपने त्याकडे दुर्लक्ष करीत वित्तमंत्रीपद देऊन अजित पवार यांना मानाचे स्थान दिले होते.

बच्चू कडू महायुतीतील असंतुष्टांमधील प्रमुख नेते आहेत. मंत्रीपद न मिळाल्याने अनेकदा उघड नाराजी व्यक्त करूनही कडूंना मंत्रीपदाच्या प्रतीक्षा यादीत टाकून देण्यात आले. त्यामुळे नाराज बच्चू कडू गेले काही महिने सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत. आपल्या कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपने पक्षात घेत लोकसभेची उमेदवारी दिल्यावर कडूंनी आक्रमक भूमिका घेतली. राणांविरोधात आक्रमक प्रचारही करत शक्तिप्रदर्शन केले. मेळाव्यासाठी दिलेले मैदान आयत्यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभेसाठी दिले गेल्याने कडूंनी रस्त्यावर उतरून दोन-तीन तास पोलिसांना चांगलेच धारेवर धरले होते. भाजपच्या अशा पद्धतीच्या राजकारणावर कडूंनी सडकून टीका करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. मंत्रीपदापासून दूर ठेवल्याने व्यक्त झालेला हा कडूंचा संताप आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सन्मानजनक वागणूक मिळाली नाही तर विरोधात जाऊ शकतो, असा अप्रत्यक्ष इशारादेखील कडू यांनी भाजप नेतृत्वाला त्यातून दिला आहे. महादेव जानकर उमेदवारी मिळत नसल्याने महाविकास आघाडीत सामील होण्याच्या तयारीत होते. हा धोका लक्षात घेऊन भाजपने जानकर यांना परभणीतून उमेदवारी देऊन शांत केले, पण परभणीत नाराजीची बिजे रोवली गेली असल्याने भाजपला याचा सामना आगामी विधानसभा निवडणुकीत करावा लागणार आहे. अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीतील घटक पक्षातच समन्वय नाही. आपल्या पक्षाचा उमेदवार नसल्याने इतर पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाही. त्यांना प्रेरणा द्यावी लागणार आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत भाजपने शिंदे गटाची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून आले आहे. शिंदे गटाच्या पाच खासदारांची तिकिटे भाजपने कापली आहेत. काही जागांवर भाजपने दिलेल्या उमेदवारालाच शिंदे गटाला तिकीट देण्यास भाजपने भाग पाडल्याचे दिसून आले आहे. या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विद्यमान बारा खासदारांची तिकिटे कापली गेली आहेत, तर अनेक इच्छुकांना डावलण्यात आले आहे. जागावाटपाचा तिढा सोडवणे कठीण होऊन बसले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवसी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी महायुतीत नाराजांची संख्या वाढली आहे. या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आहे. कुणालाही वार्‍यावर सोडले जाणार नाही. प्रत्येकाचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे. जून महिन्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागा रिक्त होत आहेत. तेरा विधानसभा, तर एक विधान परिषदेतील आमदार लोकसभा निवडणूक लढवत आहे. या जागांवर काही असंतुष्टांची वर्णी लावली जाऊ शकते. राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे राज्यसभा सदस्य लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या तीन रिक्त जागांवर असंतुष्टांची सोय लावण्याचा प्रयत्न असणार आहे, मात्र प्रफुल्ल पटेल आणि उदयनराजे भोसले यांच्या रिक्त जागांवर राष्ट्रवादीचा दावा असल्याने महायुतीत तणाव होणार नाही, याची काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. एकंदरीत, नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी देशभर भाजपने उलटसुलट राजकीय खेळी खेळल्या आहेत. त्यातील महाराष्ट्रातील राजकीय खेळीने आम जनतेत नाराजीचा सूर नक्कीच आहे. भाजपने महाराष्ट्रात साम-दाम-दंड-भेदाचा वापर करत लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी अनेक डावपेच खेळले आहेत. यात इच्छा नसतानाही अनेकांना स्वत:सोबत घेतले आहे. ही सोबत विधानसभा निवडणुकीत राहील का? भाजपने सर्व प्रकारची तडजोड करत आता वेळ मारून नेली असली तर येत्या विधानसभा निवडणुकीत असंतुष्टांचे संभाव्य आव्हान कसे पेलणार, हा खरा प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -