घरसंपादकीयओपेडशिंदे-फडणवीस बेबनाव आणि विरोधकांच्या हाती आयते कोलीत!

शिंदे-फडणवीस बेबनाव आणि विरोधकांच्या हाती आयते कोलीत!

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला. यामुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राहावे यासाठी शिंदेंकडून झालेला हा केविलवाणा प्रयत्न ठरला आहे. दुसर्‍याच दिवशी सुधारित जाहिरात छापण्यात आली, पण हुजूर, जो बुंदसे गयी वो हौद से नही आती. अशी स्थिती शिंदेंची झाली आहे. त्यात पुन्हा विरोधकांच्या हाती हे जाहिरातीचे आयते कोलीत मिळाले आहे.

शिवसेनेत बंडखोरी करून भाजपसोबत पाठ लावून सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा गद्दारीचा शिक्का बसत आहे. यावेळी त्यांचा मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडूनच एकनाथ शिंदेंची मापे काढली गेली. निमित्त ठरली ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ ही जाहिरात. कोणतेही यमक न जुळणारी, कोणतेही प्रभावी शब्द किंवा ठोस माहितीचा अभाव असलेल्या या जाहिरातीने गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातच नाही तर देशात धुमाकूळ घातला आहे. राष्ट्रीय माध्यमांमध्येही महाराष्ट्रात काय सुरू आहे यावर चर्चासत्र झडत आहेत. वर्षपूर्तीकडे वाटचाल करणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असलेला बे-बनाव, एकमेकांवर होत असलेली कुरघोडी आणि सर्वाधिक पसंती ही मलाच हे दाखवण्याचा सुरू असलेला अट्टाहास या जाहिरातीतून जाहीररीत्या समोर आला आहे.

एका फुटकळ सर्वेक्षणाचा हवाला देऊन एकनाथ शिंदे यांना राज्यातील २६.१ टक्के जनतेची पसंती असल्याचा दावा जाहिरातीत करण्यात आला. विशेष म्हणजे शिंदेंच्या स्पर्धेत त्यांचेच सहकारी, त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिस्पर्धी करण्यात आले. या जाहिरातीनुसार फडणवीसांना फक्त २३.२ टक्के जनतेची पसंती असल्याचे मान्य करण्यात आले. उर्वरित ५०.७ टक्के जनतेची पसंती कोणाला आहे, हे मात्र जाहिरातीत सांगितले गेले नाही.

- Advertisement -

राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांसह, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसेलेले मात्र दिल्लीत वजन असेलेल विनोद तावडे आणि स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणवून घेणार्‍या पंकजा मुंडे आहेत. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही राज्यातील जनतेची पसंती असणार, मात्र उर्वरित ५०.७ टक्के जनतेची पसंती कोणाला आहे, हे जाहिरातीत पूर्णपणे टाळण्यात आले.

शिवसेनेचा धनुष्यबाण आणि मोदी व शिंदेंचा फोटो असलेल्या या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न झाला. आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राहावे यासाठी शिंदेंकडून झालेला हा केविलवाणा प्रयत्न ठरला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे. या आठवड्यात मंगळवारी ही जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यापूर्वी राज्य सरकारच्या प्रत्येक जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांचा फोटो न विसरता छापला जात होता, मात्र या जाहिरातीत फडणवीस यांच्या फोटोला तर फुली मारली गेलीच, पण ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वात काम करत आहे, त्या शिवसैनिकांच्या दैवताचाही फोटो वगळण्यात आला.

- Advertisement -

त्यामुळे आता शिंदेंचं दैवत कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रश्नांची सारवासारव करताना गेल्या ३ दिवसांपासून शिंदेंच्या मंत्र्यांच्या तोंडाला फेस येत आहे. नाही म्हणायला दुसर्‍याच दिवशी बुधवारी सुधारित जाहिरात छापण्यात आली, पण हुजूर, जो बुंदसे गयी वो हौद से नही आती. अशी स्थिती शिंदेंची झाली आहे. जाहिरातीनंतर फडणवीसांनी शिंदेंसोबत कोल्हापूरला जाणे टाळले. त्यांच्यासोबत मंचावर एकत्र येण्यास त्यांनी एक प्रकारे नकार दिला.

शिंदे आणि फडणवीस यांच्यात खरेतर सत्तासंघर्षाचा वाद निर्माण झाला तो कल्याणच्या सुभेदारीवरून. शिंदेंचे मंत्री हे उद्धव ठाकरेंवर कायम ‘बालहट्टा’चा आरोप करतात, पण शिंदेंनीही वेगळं काय केलं? ठाण्यातील स्थानिक नेत्यांनी ८ जून रोजी आगामी लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन करणार नाही असा ठराव पारित केला. यामध्ये आघाडीवर होते फडणवीसांचे विश्वासू कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण. यानंतर शिंदे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मला कोणत्याही पदाची अभिलाषा नाही. युतीतील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच २०२४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार स्थापन करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यामध्ये जर कोणी विरोध करत असेल, कोणी नाराज होणार असेल तर मी खासदारकीचा राजीनामा देण्यासही तयार आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. मात्र ही राजीनाम्याची भाषा किती वरवरची होती आणि किती मनातून आली होती. हे मंगळवारच्या जाहिरातीने स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागांवर लक्ष्य आहे. त्याचे सुतोवाच अमित शहांनी नांदेडमध्ये झालेल्या सभेत केले आहे. २०१९ मध्ये एकत्रित शिवसेना-भाजप युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या. त्यातील २३ भाजपला, तर एकत्रित शिवेसनेला १८ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर १२ खासदार हे शिंदेंसोबत गेले आहेत. शिवसेना-भाजप युतीच्या मतांच्या जोरावरच अर्थात मोदींच्या करिष्म्यामुळेच शिवसेनेचेही उमेदवार निवडून आल्याचा दावा भाजप नेत्यांचा आहे. त्यामुळे शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांना आता धनुष्यबाणावर लढायचे की कमळाच्या चिन्हावर हा प्रश्न सतावत असणार.

भाजपची विधानसभा निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. राज्यात त्यांनी २०० आमदारांचे टार्गेट ठेवले आहे. त्यासाठी नुकतीच २८८ मतदारसंघात निवडणूक प्रमुखांची घोषणाही केली गेली आहे. यावरूनही शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये धुसफुस सुरू झाली. युती म्हणून निवडणुकांना सामोरे जाण्याच्या वल्गना दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून होत आहेत, मात्र भाजपची कृती त्याला अनुसरून नसल्याचं दबक्या आवाजात शिंदेंसोबतच्या मंत्र्यांकडून बोलले जात आहे. या अस्वस्थतेतूनच मंगळवारची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शिंदेंच्या आमदारांना निधी मिळत नाही हीदेखील तक्रार गेल्या काही दिवसांमध्ये आमदारांकडून व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार याची शिंदेंना शाश्वती दिली जात नाही, तर दुसरीकडे आहे त्या मंत्र्यांनाच घरी बसवले जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. ही झाली राजकीय कोंडी, दुसरीकडे शिंदेंच्या मर्जीतील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्रही सुरू करण्यात आले. म्हणजे एकीकडे शिंदेंच्या आमदारांची कोंडी, तर दुसरीकडे शिंदेंच्या मर्जीतील लोकांना डावलण्याचे उद्योग होत आहेत. त्यामुळेच सुधारित जाहिरातीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, यांच्या फोटोसह शिंदेंच्या नवरत्नांचेही फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या नवरत्नांना त्यातून विश्वास देण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीने शिंदे सेनेची झालेली नाचक्की ही या कोणत्याही लिपापोतीने भरून निघणारी नाही.

या जाहिरातीने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जाहिरात सरकारी की शिवसेनेची हे स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. जाहिरात शिवसेनेच्या हितचिंतकाने दिली असल्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई सांगत आहेत, तर हे हितचिंतक कोण, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित करत आहेत. जाहिरातीतून फडणवीसांना कमी लेखण्याचा झालेला प्रयत्न त्यांच्या समर्थकांना फार लागला आहे. मग प्रवीण दरेकर असतील नाही तर खासदार अनिल बोंडे यांनी थेट एकनाथ शिंदेंनाच घेरण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीसांनी केलेल्या त्यागाचा दाखला त्यांचे समर्थक देत आहेत, तर बोंडेंसारख्या नेत्यांनी शिंदेंवर वैयक्तिक हल्लाबोल सुरू केला आहे. यामुळे शिंदे आणि फडणवीस समर्थकांमध्येच जुंपली आहे. सरकार ना शिवसेनेच्या ४० आमदारांमध्ये बनते ना, भाजपच्या १०५ आमदारांच्या सहभागाने तयार होते. या दोघांनाही २०२४ पर्यंत एकमेकांची गरज आहे, मात्र २०२४ नंतरही ही युती अबाधित राहील का? हे सध्याच्या धुसफुसीवरून आणि कुरघोडीच्या राजकारणावरून सांगणे कठीण आहे.

एकनाथ शिंदेंचा भाजपला आगामी निवडणुकीत किती फायदा होईल याचीही चाचपणी भाजप वरचेवर करत असते. त्यांच्या आतापर्यंतच्या अंतर्गत सर्वेंमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांचे रिपोर्टकार्ड हे रेड मार्कने भरलेले आहे, तर आता मतदान झाले तर शिंदेंचा भाजपला होणारा फायदा हा नगन्य असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळेच की काय भाजपचा शतप्रतिशतचा नारा दिवसेंदिवस बुलंद होत आहे. येत्या २० तारखेपासून त्यांचे संपर्क-समर्थन अभियान सुरू होत आहे. यासर्व माध्यमातून भाजप स्वबळाची बेटकुळी वारंवार फुगवून शिंदे सेनेला डिवचत आहे. कारण शिंदेंवर गद्दारीचा बसलेला शिक्का ते अजून पुसू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत आपले नुकसान करून घ्यायला भाजपचा एक गट तयार नाही. यामुळे वरवर सर्वकाही आलबेल दिसत असलेल्या युतीत काहीच आलेबल नाही, हे वारंवार त्यांच्याकडूनच वेगवेगळ्या पद्धतीने दाखवून दिले जात आहे.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -