घरसंपादकीयअग्रलेखगरज सरो, बंडोबा मरो!

गरज सरो, बंडोबा मरो!

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार, खासदारांसह बंडाचे निशान फडकावत राज्यात सत्तांतर घडवून आणले. एका वर्षापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या या अभूतपूर्व बंडाला ठाकरे गटाने पन्नास खोके म्हणत हिनवण्याचे काम अजूनही सुरूच ठेवले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी बंडानंतर अनेक गौप्यस्फोट केले. बंडाच्या वर्षपूर्तीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एक वेगळाच गौप्यस्फोट करत एकनाथ शिंदे यांचे बंड ऑपरेशन लोटसचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. या मोहिमेची मुख्य जबाबदारी आपल्याकडे होती, असे सांगत चव्हाण यांनी अनेक गुपिते आता उघड केली आहेत.

बंडामागे उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने तसेच हिंदुत्व सोडल्याने शिवसेनेत खदखद होती, अशी कारणे शिंदे गटाकडून दिली जात होती, पण भाजपचा कुटिल हेतू चव्हाण यांच्या विधानाने उघड झाला आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर ऑपरेशन लोटसचे तीन प्रयत्न झाले होते. 2019 मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदारांना एकत्र करून उठावाचे नियोजन झाले होते, पण तांत्रिक अडथळा आल्याने तो प्रयत्न फसला होता. 2021 च्या दरम्यान ऑपरेशन लोटस हाती घेण्यात आले होते, पण वरिष्ठांकडून होकार मिळाला नाही. अखेर जून 2022 मध्ये ठरल्याप्रमाणेच ऑपरेशन लोटस यशस्वी झाले. त्यासाठीच्या नियोजनाचा आपण एक भाग असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिंदे यांना सोबत घेऊन केवळ उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचा हेतू नव्हता, तर शिवसेनेला भाजपमय करण्याचा हेतू होता, हेच यावरून स्पष्ट होते. चव्हाण यांनी भाजपचा कुटिल डाव उघड केला आहे.
ऑपरेशन लोटससंदर्भात संपूर्ण माहिती असलेल्या एक-दोन व्यक्ती होत्या.

- Advertisement -

इतरांना केवळ त्यांच्यावरील जबाबदारीची माहिती होती. आपण एका ऑपरेशनमधील जबाबदारी पार पाडत आहोत, याची अनेकांना कल्पना नव्हती. आमदारांना सुरतपर्यंत ते कोणत्या वाहनात बसले आहेत, वाहन कोण चालवत आहे. याचीही माहिती नव्हती. चालकालाही त्याच्या वाहनात कोण बसलेय, याची माहिती नव्हती. सर्व आमदार अंगावरच्या कपड्यानिशी आले होते. सुरतला गेल्यावर अनेकांना दीर्घकाळ घरापासून दूर राहावे लागणार असल्याची कल्पना आली. मग त्यांनी शर्ट, पॅन्ट, अंतर्वस्त्रे, औषधे मागवली आणि ताण कमी केला.

सुरत, गुवाहाटीमधून कुणी निघून जाऊ नये, याकरता सर्वांवर नजर होती. कुणी वेशांतर करून, तर कुणी पोलिसांच्या बंदोबस्तात वसईमार्गे सुरतला गेले, अशीही माहिती रवींद्र चव्हाण यांनी आता उघड केली आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात आमदार राज्याबाहेर गेल्याची पहिली बातमी दैनिक ‘आपलं महानगर’ने दुसर्‍याच दिवशी दिली होती. पालघरचे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील स्वतः महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवरील चेक पोस्टवर स्वतः डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. आमदार राज्याबाहेर जात असल्याची कुणालाही माहिती मिळू नये म्हणूनच पाटील दक्षता घेत होते. बाळासाहेब पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष मर्जीतील मानले जातात. शिंदे यांनीच महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना पालघरच्या पोलीस अधीक्षकपदावर नियुक्त केले होते. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांनी इमानेइतबारे काम पार पाडले.

- Advertisement -

शिंदेंच्या बंडामागे भाजपच होती, हे कधीच उजेडात आले होते, पण शिंदेंचे बंड ऑपरेशन लोटसचा भाग असल्याचा गौप्यस्फोट प्रथमच झाला आहे. हा गौप्यस्फोट भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी स्वत:कडे या मोहिमेची मुख्य जबाबदारी होती, असे म्हटले आहे. रवींद्र चव्हाण यांनी नवा गौप्यस्फोट करण्याची साधलेली वेळही विचार करायला लावणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून छुपे युद्ध सुरू आहे. भाजपने तर कल्याण लोकसभा मतदारसंघावरच दावा ठोकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना कोंडीत पकडण्याचे काम केले. त्यानंतर शिंदे पिता-पुत्रांच्या नाराजीच्या प्रतिक्रिया त्वरित उमटल्याही होत्या. पुत्राची उमेदवारी धोक्यात येणार असल्यानेच शिंदे गटातून सर्वच वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी उघड झाली होती. भाजपकडून त्यावर जोरदार आक्षेप घेतला गेला. भाजप-शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला. भाजपच्या वरिष्ठांकडूनही कानउघडणी झाली.

जाहिरात अंगलट आल्याने दुसर्‍या दिवशी नवी जाहिरात देण्याची नामुष्की शिंदे गटावर आली. ती जाहिरात हितचिंतकाने दिल्याचा केविलवाणा खुलासाही शिंदे गटाला करावा लागला. एरव्ही ठाकरे परिवारावर घराणेशाही, पुत्रप्रेमाचे आरोप करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्रप्रेमही जाहिरातीमुळे दिसून आले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने मिशन 45 ची तयारी केली आहे. कल्याण आणि पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा असणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली गेली आहे. चव्हाण यांनाही आता लोकसभेचे वेध लागले असून त्यांच्या समर्थकांकडून कल्याणमधून खासदार श्रीकांत शिंदेंविरोधात नाराजीचा सूर निघाला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही कल्याण लोकसभा मतदारसंघाचा अनेकदा दौरा करून अप्रत्यक्षरित्या भाजपचे मनसुबे जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या बंडाला ऑपरेशन लोटस म्हणण्याला विशेष महत्व आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -