घरमनोरंजनसुवर्णकाळ ‘आनंदी गोपाळ’

सुवर्णकाळ ‘आनंदी गोपाळ’

Subscribe

सर्जनशील दिग्दर्शक म्हणून आजच्या घडीला ज्यांची नावे घेतली जातात त्यात समीर विद्वांस हा एक दिग्दर्शक आहे. नाटकाबरोबर चित्रपटातही त्याने आपली प्रगल्भता दाखवून दिलेली आहे. ‘डबल सीट’, ‘वाय झेड’, ‘टाईमपास’ हे त्याचे चित्रपट बरंच काही सांगून जातात. मनोरंजनाबरोबर सामाजिक विषय हा त्याच्या चित्रपटांचा मूळ गाभा राहिलेला आहे. याच समीरच्या दिग्दर्शनात ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट पुढल्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. ज्या काळात महिला म्हणजे चूल आणि मूल असा काहीसा रुढी परंपरेने आलेला शब्द प्रमाण मानला जात होता, त्यावेळी शिक्षणाचा ध्यास घेणार्‍या आनंदी गोपाळ या उभयतांची अधोरेखित करणारी कहाणी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.‘आनंदी गोपाळ’ हा एक प्रकारे सुवर्णकाळाचा दस्ताऐवजच असणार आहे.

आजच्या घडीला नऊ वर्षांची मुलगी म्हणजे शालेय शिक्षणाचे वय असा अर्थ लावला जात असला तरी काही दशकांपूर्वी नऊ वर्षे हे वय लग्नासाठी योग्य मानले जात होते. याच वयात लग्न झाले म्हणजे समाजाच्या रितीरिवाजांचे अनुकरण केल्याचे बोलले जात होते. त्यामुळे इच्छा असूनही कोणा कुटुंबाला या परंपरेला विरोध करता येत नव्हता. अशा स्थितीत महात्मा फुले यांनी पुढाकार घेऊन सावित्रीबाईंना शिकवले. इतकेच काय तर अशिक्षित मुलींना शिकवण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. पुढे काळ बदलला. मुलींना शिक्षण घेण्याची मुभा मिळाली; पण लग्नाच वय मात्र तेच ठेवले. थोडक्यात काय तर इथेसुद्धा शिक्षण पूर्ण करण्याची मुभा नव्हती. धाडस केले म्हणजे अंतिम यश गाठता येईलच याची खात्री देता येत नव्हती. अशा पार्श्वभूमीवर गोपाळरावांनी आनंदी नावाच्या मुलीला शिकवण्याची तयारी दाखवली. त्यातसुद्धा आनंदीबाईंना तडजोड करावी लागली. वय वर्षे अठ्ठावीस असलेल्या गोपाळरावांबरोबर नऊ वर्षांच्या यमुला अर्थात आनंदीबाईंना विवाहबद्ध व्हावे लागले.

एका मुलीचे भवितव्य घडत असेल तर तडजोड करायला काय हरकत आहे हा समज गोपाळरावांकडे होता. आनंदीने त्याचा ध्यास घेतला आणि तो ध्यास गोपाळरावांनी पूर्ण केला. ज्या वयात शिक्षणाचा विचार करणेच अवघड होते, त्या वयात आपण डॉक्टर झालोच पाहिजे हा आग्रह म्हणजे समाजाच्या विरोधात प्रवाह असा काहीसा अर्थ लावला जात होता. भारतीय इतिहासात महिलांची जी अनमोल कामगिरी आहे त्यात आनंदीबाईंचे गौरवाने नाव घ्यावे असा प्रवास त्यांचा झालेला आहे. थेट अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या त्या पहिला महिला आहेतच. परंतु भारताच्या ऐतिहासिक वाटचालीत पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मानही त्यांना प्राप्त झालेला आहे. बालपण, लग्न, शिक्षणाचा ध्यास, वयाच्या अठराव्या वर्षी समुद्र मार्गाने परदेशातला प्रवास, नंतर भारतात आगमन होणे आणि प्रत्यक्ष डॉक्टरी कारकिर्दीला सुरुवात करणे अशा प्रदीर्घ प्रवासातील महत्त्वपूर्ण गोष्टींना प्राधान्य देऊन हा चित्रपट तयार केलेला आहे.

- Advertisement -

भारतीयांनी अभिमान बाळगावा अशा ज्या स्त्रिया आहेत, त्यात डॉक्टर आनंदी जोशी या एक आहेत. पुस्तक, लघुपट, एकपात्री प्रयोग यांच्या निमित्ताने आनंदीबाई थोड्याफार प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने आनंदीबाईंबरोबर गोपाळरावांचेही समग्र दर्शन घडणार आहे. १९८२ या सालापूर्वीचा आणि त्यानंतरचा कालखंड या चित्रपटासाठी घेतलेला आहे. समीरचा यापूर्वी झी स्टुडिओने ‘डबल सीट’ हा चित्रपट प्रदर्शित केला होता. यावेळेलासुद्धा त्यांनीच पुढाकार घेतलेला आहे. करण शर्मा याची ही पटकथा असून इरावती कर्णिक यांनी त्याचे संवाद लेखन केलेले आहे. ललीत प्रभाकर गोपाळराव तर भाग्यश्री मिलिंद ही डॉ. आनंदी जोशींची व्यक्तीरेखा साकार करणार आहेत. याशिवाय अंकिता गोस्वामी, गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण, जयंत सावरकर, अथर्व फडणवीस, गॅरी जॉन, सोनिया अल्बिझुरी यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. हृषीकेश दातार, सौरभ भालेराव, जसराज जोशी यांचे संगीत या चित्रपटाला लाभलेले आहे. कथानकाला साजेल अशी गीते वैभव जोशीने लिहिलेली आहेत.

बी पी ते ए जी
‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटामध्ये डॉ. आनंदी जोशी यांची युवा ते प्रौढावस्थेतील व्यक्तीरेखा भाग्यश्री मिलिंद या युवतीने साकार केलेली आहे. पदार्पणातच माईलस्टोन म्हणावा असा चित्रपट तिच्या वाट्याला आलेला आहे. एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटक, काही मराठी चित्रपट यातून ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट तिच्या हाती लागलेला आहे. रवी जाधव यांच्या ‘बी पी’ अर्थात ‘बालक-पालक’ या चित्रपटात प्रेक्षकांच्या नजरेत येईल अशी भूमिका तिने केली होती. ‘३५ टक्के काठावर पास’ याही चित्रपटात ती दिसली होती. रुपेरी पडद्यावर जे नाव झळकले होते ते होते भाग्यश्री शांकपाळ. ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटापासून तिने भाग्यश्री मिलिंद हे नाव लावले आहे. मिलिंद हे तिच्या वडिलांचे नाव. शांकपाळ लावल्याने नाव मोठे वाटते. त्यामुळे वडिलांचे नाव लावल्याचे ती सांगते.

- Advertisement -

भाग्यशाली लक्ष्मी
‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी एक प्रार्थनाही लिहिली गेली आहे ज्यात स्त्रीच्या आजवरच्या कर्तृत्वाचा आलेख मांडलेला आहे. भारताच्या उज्ज्वल भवितव्यात ज्या स्त्रियांनी मुहूर्तमेढ रोवली, संघर्ष केला, आपले अस्तित्व दाखवून दिले अशा कितीतरी स्त्रियांच्या छायाचित्रांची झलक या प्रार्थनेत पहायला मिळते. तृतीयपंथी म्हणून आणि ‘मी हिजडा आहे’ हे जाहीरपणे सांगणे, पुस्तकात व्यक्त करणे अशा लक्ष्मी नारायण त्रिपाठी हिचे छायाचित्रसुद्धा या कर्तृत्ववान स्त्रियांबरोबर पहायला मिळते. खरंतर सामाजिक बांधिलकी आणि राजकीय पार्श्वभूमीवर कितीतरी तृतीयपंथीयांनी जागतिक पातळीवर नोंद घ्यावी असे कार्य सिद्ध केले असताना त्यांना प्राधान्य न देता लक्ष्मीला या कर्तृत्ववान स्त्रियांबरोबर दाखवण्याचे कारण म्हणजे आपण हिजडा आहोत हे जाहीरपणे व्यक्त करणारी ती एकमेव पहिली व्यक्ती आहे. त्यामुळेच तिची यात नोंद घेतल्याचे दिग्दर्शक समीर विद्वांस सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -