घरमनोरंजनमहेश कोठारेंचा आजही 'धूम धडाका'

महेश कोठारेंचा आजही ‘धूम धडाका’

Subscribe

अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आपली ओळख निर्माण करणारे हरहुन्नरी कलाकार महेश कोठारे यांनी स्टार प्रवाहवरील 'विठू माऊली' या मालिकेच्या निमित्ताने आपलं महानगर आणि मी या फेसबुक लाईव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

महेश कोठारेंनी ‘धूम धडाका’ हा पहिला चित्रपट निर्मित केला. त्यानंतर त्यांनी आजतागायत केलेल्या कामांमधून धूम धडाकाच केलेला आहे. तरुणांना लाजवेल या एनर्जीने महेश कोठारे आजही काम करतायत. “माझ्यातली एनर्जी माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांमुळे येते. चाहत्यांच्या प्रेमामुळेच मी नेहमी उत्साही असतो. असेच प्रेम मिळत राहिले तर मी कधीच म्हातारा होणार नाही, सध्यातरी मी तरूण आहे.”, अशा शब्दात त्यांनी आपल्या काम करण्याच्या उर्जेचे रहस्य सांगितले.

विठू माऊली लोकांच्या पसंतीस

मराठी भाषेत यापुर्वी फार पौराणिक मालिका आल्या नव्हत्या. त्यात मला विविध प्रयोग करायला आवडतात. सिनेसृष्टीत आलेले नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायलाही आवडते. चांगली पौराणिक मालिका करण्यासाठी तंत्रज्ञानाचा खुप मोठा हातभार असतो. आम्ही जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया यानंतर विठू माऊली या मालिकांमध्ये तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला. गणपती बाप्पा मोरया या मालिकेत गणपतीची सोंड हलवताना आम्हीच पहिल्यांदा दाखवले. त्याआधी असा प्रयोग कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात झाला नव्हता. विठू माऊली या मालिकेतही विएफएक्सचे अनेक नवीन प्रयोग केले जात आहेत. विठू माऊली लोकांना आवडतेय याचा मला आनंद आहे. पौराणिक मालिकांसाठी शीर्षक गीत हे मोठे बलस्थान असते. ते जर हिट झाले तर मालिका सुद्धा हिट होते. विठू माऊलीचे शीर्षक गीत तयार करण्यासाठी आदिनाथ आणि त्याच्या टीमने खुप मेहनत घेतली. या गाण्याची गमंत अशी की, संध्याकाळी सात वाजता जेव्हा विठू माऊली मालिका सुरु होते, तेव्हा माझी नात जिजाही या गाण्यावर ताल धरायला लागते.
युगे युगे कलयुगे हा विठू माऊलीतला डॉयलॉगही सध्या चांगलाच फेमस झालाय. पराग कुलकर्णी यांनी हा लिहिला होता. महेशने तो उत्तम पद्धतीने डिलीव्हर केलाय.

- Advertisement -

#LIVE: Interview With Inspector of Marathi Cinema, Mahesh Kothare! Comment Your Questions and Participate!

#LIVE: मराठी सिनेसृष्टीतले धडाडीचे 'इन्स्पेक्टर' आणि आताचे 'डायरेक्टर' महेश कोठारे यांच्याशी थेट गप्पा! तुमच्या प्रश्नांना त्यांची उत्तरं…सो प्रश्न विचारा कमेंट बॉक्समध्ये आणि उत्तरं घ्या फेसबुक लाइव्हमध्ये! | #MyMahanagar

Posted by My Mahanagar on Friday, 14 December 2018

 

- Advertisement -

आणि पौराणिक मालिकांना सुरुवात

संतोष आयचित यांनी जय मल्हारची संकल्पना सांगितली होती. मला संकल्पना आवडली त्यानंतर आम्ही ती चॅनेलवर घेऊन गेलो. त्यानंतर वाहिन्यांना मी पौराणिक मालिका चांगल्या करु शकतो, असा विश्वास आल्यामुळेच गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली या मालिका करु शकलो.
पौराणिक मालिका करताना काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची गरज आहे. विशेषतः लहान मुलांना आवडतील असा कटेंट देण्याची गरज असते. कारण आपल्या आतही एक लहान मुल असतं. त्यामुळे त्याप्रमाणे तंत्र, कटेंट वापरले तर मालिका जास्तीत जास्त प्रसिद्ध होते.

तरुण वर्गाला थिएटरमध्ये आणण्यासाठी केला ‘धूम धडाका’

धूमधडाका हा माझा पहिला चित्रपट. त्याकाळात तरुणवर्गाला थिएटरकडे वळवण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. माझ्या कॉलेजवयीन काळात ‘प्यार किए जा’ हा हिंदी चित्रपट खुप चालला होता. त्यामुळेच याचा रिमेक करण्याचा निर्णय मी घेतला. अण्णासाहेब देऊळगावकर यांच्यामुळे हा चित्रपट होऊ शकला. त्यांनी मला खूप मदत केली. मेहमूद, शशी कपूर आणि किशोर कुमार यांचा हा गाजलेला चित्रपट. याचा रिमेक करताना माझ्या डोळ्यासमोर कास्टिंग निश्चित झाले होते. शशी कपूरच्या रोलसाठी मी स्वतः, किशोर कुमार यांच्या रोलसाठी अशोक कुमार, ओमप्रकाश यांच्या रोलसाठी शरद तळवलकर आणि मेहमूदच्या रोलसाठी कुणाला कास्ट करायचे हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. या रोलसाठी लक्ष्मीकांत बेर्डे मला मिळाला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक नवा सुपरस्टार…
‘लेक चालली सासरला’ हा चित्रपट माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा चित्रपट ठरला. कारण या चित्रपटावेळी मला अण्णासाहेब भेटले. त्यामुळेच मी धूम धडाका करु शकलो.

लक्ष्या आणि मी एक टीम

धूम धडाका नंतर लक्ष्या आणि माझी चांगलीच जोडी जमली. त्यानंतर आम्ही दोघांनी खूप काम केले. एक वेगळंच बॉडिंग आमच्यात निर्माण झालं होतं. माझ्या चित्रपटात लक्ष्मीकांत खुलून काम करायचा. हॉलिवूडमध्ये जशी डिन मार्टिन आणि जेरी लुईस यांची जोडी होती. तशी इथे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डेची जोडी आहे, असं मी तेव्हा गमंतीने म्हणायचो. ‘ही दोस्ती तुटायची नाय…’ हे गाणं आमच्या चित्रपटात होतं. ते खरंतर आम्ही मनापासून गायले होते. लक्ष्याचा मुलगा अभिनय बेर्डे देखील आता सिनेसृष्टीत आला आहे. त्याला घेऊन मला एक प्रोजेक्ट करायचा होता. पण त्यावेळी त्याचे दहावीचे वर्ष चालू होते. आदिनाथ आणि अभिनय यांना घेऊन एक चित्रपट करावा, अशी माझी इच्छा आहे.

असा आहे पाच अक्षरी फॉर्म्युला

माझ्या बऱ्याच चित्रपट आणि मालिकांचे नावे पाच अक्षरी आहेत. धुमधडाका, पछाडलेला, झपाटलेला, धडाकेबाज, जय मल्हार, विठू माऊली अशी सर्व नावं पाच अक्षरांची आहेत. यामागे कोणताही वेगळा विचार किंवा अंधश्रद्धा वैगरे काही नाही. या नावांमुळे लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे. ते कुतुहल कायम ठेवण्यासाठी मी पाच अक्षरी नावांचा फॉर्म्युला चालू ठेवलाय. हा फक्त योगायोग आहे.
पण यामुळे माझे सर्वच चित्रपट चाललेत का? तर असं नाही. मी एक हिंदी चित्रपट केला होता. ‘लो मे आ गया’ असे त्याचे नाव होते. ते ही पाच अक्षरी. मात्र तो चित्रपट फार चालला नाही. त्यामुळे त्या चित्रपटाचे नाव ‘लो मे लूट गया’ असे ठेवायला पाहीजे होते. कारण मी अक्षरशः लुटलोच गेलो होतो. त्यानंतर मी ठरवले की हिंदीत मोठा चित्रपट करण्यापेक्षा मराठीतच चित्रपट आणि मालिका करायच्या.

तात्या विंचू, कवट्या महाकाल असे सुचले

मला कल्पना करायला खूप आवडतं. माझ्या चित्रपटातील प्रत्येक गोष्टीचा कल्पकतेने विचार करुन ती गोष्ट ठरवली जायची. दे दणादणमध्ये जो व्हिलन होता, त्याचे नाव ठेवले होते ‘झगड्या रामोशी’. या नावांचे श्रेय मी अण्णासाहेब देऊळगावकर यांना देईल. त्यांनीच व्हिलनची नावे अँटिक ठेवण्याबाबत सांगितले. कवठे महांकाळ या गावाच्या नावावरुन मला ‘कवट्या महाकाल’ हे नाव सुचले. थ्रिलर चित्रपटातही कॉमेडी असते त्यामुळे ‘टकलू हैवान’ आणि त्याची टकली गँग साकारली. झपाटलेला चित्रपट मी सात दिवसांत लिहून पुर्ण केला होता. पण व्हिलनचे नाव काही सुचत नव्हते. हॉलिवूडमध्ये स्कॉर्पियन नाव प्रचलित होते. त्यावरुन मी मराठीत विंचू असे नामकरण केले. विंचूला बॅलन्स करण्यासाठी आमच्या सेटवर एक काका होते. त्यांना आम्ही तात्या म्हणायचो. त्यामुळे आमचा व्हिलन तात्या विंचू झाला..

इनस्पेक्टर महेश जाधव रिटायर होणार..

झपाटलेला या चित्रपटातून तात्या विंचू घराघरात जाऊन पोहोचला. लवकरच झपाटलेला ३ मधून तात्या विंचू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तात्या विंचूसोबत एक सरप्राईजिंग एलिमेंट असतील. या चित्रपटातून
इनस्पेक्टर महेश जाधवला रिटायरल करण्यात येणार आहे. पूर्वी माझी एक स्टाईल होती. माझ्या चित्रपटात आमच्या पात्रांची नावं तिच असायची जी आमची मुळ नावं आहेत. अशोक सराफचे अशोक आणि लक्ष्मीकांतचे लक्ष्या. माझे नावही महेशच असायचे. माझ्या नावाला आडनाव काय लावायचे? असा प्रश्न पडला तेव्हा मी जाधव आडनाव लावले. कारण पुर्वीपासून मला जाधव आडनाव अट्रॅक्टिव वाटत होते. या नावात काहीतरी दम वाटतो.

बालकलाकार म्हणून काम करताना घडत गेलो

छोटा जवान नंतर मी अनेक चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले होते. माझ्या घरातच अभिनयाचे वातावरण होते. आई-बाबा थिएटर करत होते. त्यामुळे माझा अभिनयाकडे नैसर्गिक ओढा होता. ‘राजा और रंक’ हा बालकलाकार म्हणून केलेला सर्वता हिट चित्रपट. सफर हा माझा बालकलाकर म्हणून शेवटचा चित्रपट. बाल कलाकार म्हणून काम करत असतानाच मोठे होऊन हेच करण्याचे ठरवले होते. मात्र शिक्षण करता करता स्ट्रगल सुरु होता. बालकलाकार म्हणून काम करताना सगळेच कौतुक करतात. पण प्रौढ कलाकार म्हणून काम करताना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत असते. चांगले काम मिळेपर्यंत एलएलबी करुन मी वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली होती. पण माझे लक्ष चित्रपटांकडेच होते.
मी जेव्हा बालकलाकार होतो तेव्हा ती वेगळा काळ होता. पण जेव्हा मी प्रौढ कलाकार म्हणून काम करु लागलो तेव्हा खरे आव्हान निर्माण झाले. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाने ‘प्रीत तुझी माझी’ने मला खुप काही शिकवलं. कारण हा चित्रपट फ्लॉप झाला होता.
हिंदी चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करताना मला खुप मोठ मोठे दिग्दर्शक मिळाले. लहानपणीच मला बलराज सहानी, निरुपा रॉय यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. दाक्षिणात्य दिग्दर्शक टी प्रकाश राव, के. पी. आत्मा, एल. प्रसाद, बी. नागीरेड्डी यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत मला काम करायला मिळाले. त्यांच्याकडून खुप काही शिकता आले. या लोकांमुळेच मी घडत गेलो.

सचिन आणि माझ्यात स्पर्धा होती, पण…

सचिन पिळगावंकर आणि महेश कोठारे यांच्यात स्पर्धा आहे, असं म्हटलं जातं. चांगल्या अर्थाने पाहिलं तर आमच्यात स्पर्धा होती, हेल्दी स्पर्धा. त्यावेळी अशोक आणि सचिन अशी जोडी जमलेली. दुसऱ्या बाजुला मी आणि लक्ष्या होतो. आमच्या दोघांच्याही फायटिंग स्पिरीटमुळे मराठी चित्रपटसृष्टीला चांगले चित्रपट मिळाले. सचिन आणि माझे संबंध आजही चांगले आहेत. ‘आयड्याची कल्पना’ या चित्रपटात मी, सचिन आणि अशोक सराफने एकत्र काम केले आहे. पुढेही चांगला प्रोजेक्ट आला तर आम्ही एकत्र काम करु.

पुर्ण कुटुंबच कलेशी निगडीत

माझे वडील ९२ तर आई ८८ वर्षांची आहे. माझे जेवढे चित्रपट झाले. त्या प्रत्येकाची आम्ही चर्चा आम्ही घरी केलेली आहे. माझा मुलगा आदिनाथ, सून उर्मिलाही क्षेत्राशी निगडीत आहे. आमच्या घरात प्रत्येकजण कला क्षेत्राशी निगडीत आहे.
शुभ मंगल सावधान या चित्रपटात आदिनाथ मला असिस्ट करत होता. याच चित्रपटात उर्मिला काम करत होती. या चित्रपटाचा स्क्रिनप्ले मी करत होतो. पण आदिनाथने स्वतःचा स्क्रिन प्ले बनवला आणि एक चांगली सून मला मिळाली.

जिजाशी आता लागलाय लळा

माझी नात जिजासोबत माझे छान नाते तयार झालंय. ती जर घरी असेल तर घर घर वाटत नाही. अनेकांना जिजा या नावाबद्दल कुतुहल वाटतं. ती जन्मायच्या आधीपासूनच आदिनाथ आणि उर्मिला यांनी जिजा हे नाव ठरवलं होतं. नशीबाने त्यांना मुलगीच झाली. जिजा हे आपल्या अभिमानाचे प्रतिक आहे. त्यामुळे मलाही जिजा नाव आवडतं.

नवोदित कलाकारांनी #मीटू पासून सावध रहावे

चित्रपटात काम करावे असे अनेकांना वाटत असते. पण माझ्यामध्ये खरंच टॅलेंट आहे का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला प्रामाणिक विचारला पाहीजे. जर टॅलेंट असेल तर नक्कीच या क्षेत्रात मेहनत घेऊन काम केले पाहीजे.
मी टू सारखा प्रकार माझ्या टिममध्ये कधीच घडलेला नाही. माझ्यावर तर कुणीही बोट उचलू शकत नाही. नवीन मुलं चुकीच्या लोकांकडे जात असल्यामुळे या घटना घडत आहेत. मला त्यांना सांगावसं वाटतं की तुम्ही चांगल्या लोकांना भेटा. जर तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही.


शब्दांकन – किशोर गायकवाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -