घरमुंबईपंतप्रधानांसमोर पालिकेची बेइज्जती नको

पंतप्रधानांसमोर पालिकेची बेइज्जती नको

Subscribe

आधारवाडी डम्पिंगवर केमिकल फवारणी, २४ तास सुरक्षा रक्षकांचा पहारा

येथील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार आणि दुर्गंधी ही समस्या नित्याचीच असल्याने कल्याणकरांची डोकेदुखी बनली आहे. मात्र, पंतप्रधान मोदींच्या कल्याण दौर्‍याच्या निमित्ताने पालिकेने या समस्येवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. डम्पिंगवर आग लागू नये किंवा लावली जाऊ नये यासाठी २४ तास सुरक्षा रक्षकांचा पहारा आणि कचर्‍यामुळे दुर्गंधीचा त्रास येऊ नये यासाठी केमिकल फवारणी केली जात आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आधारवाडी कचरा डेपोची कचरा साठवण क्षमता संपली असून, हा कचरा डेपो शास्त्रोक्त पध्दतीने बंद करण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि न्यायालयाचे आदेश आहेत. उंबर्डे येथे कचर्‍याचा डेपो साकारण्यात येणार आहे. मात्र, राजकीय अडथळा असल्याने या कामाला गती मिळालेली नाही. प्रत्येकाला आपल्या विभागात कचरा नको आहे. त्यामुळे आधारवाडी कचरा डेपोवरच अजूनही कचरा टाकला जातो. कचर्‍याच्या दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. तसेच कचरा डेपोला आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. त्यावेळी आजूबाजूचा परिसर धुराने काळवंडून जातो. आधारवाडी कचरा डेपोपासून काही अंतरावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे त्यांच्या समोर तरी पालिकेची बेइज्जती नको म्हणून पालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर २४ तास ३० सुरक्षा रक्षक तैनात ठेवले आहेत. डम्पिंग ग्राऊंडच्या चारही दिशेला हे सुरक्षारक्षक खडा पहारा देत आहेत. यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले असून कचर्‍याची दुर्गंधी येऊ नये म्हणून डम्पिंगवर सतत केमिकल फवारणीही सुरू आहे. तर आग लागल्यास खबरदारीचा उपाय म्हणून शेजारील असणार्‍या एसटीपी प्रकल्पातून पाण्याची मोठी लाईनही वरपर्यंत नेण्यात आली आहे. मात्र या उपाययोजना केवळ पंतप्रधानांच्या दौर्‍यापुरती मर्यादीत न ठेवता, कायम स्वरूपी ठेवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -