घरमनोरंजनप्रेक्षकांचं प्रेम हाच माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार

प्रेक्षकांचं प्रेम हाच माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार

Subscribe

इंट्रो - विनोदी, खलनायकी तर कधी ऐतिहासिक भूमिकांमध्ये दिसणारा पण खर्‍या आयुष्यात इतकाच भावूक असणारा मराठीतला डिम्पल बॉय म्हणजेच अभिनेता निखिल राऊत. याने शाळेतील बालनाट्यापासून सुरू केलेला अभिनयाचा प्रवास आज फर्ंजदसारखा सिनेमा आणि चॅलेंजसारख्या एक आव्हानात्मक नाटकांपर्यंत आणला आहे. स्पॉट बॉय असलेल्या कार्यक्रमातच पुढे कोअँकर झालेल्या निखिलने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबत फोटोग्राफीची प्रचंड आवड असलेल्या अभिनेता निखिल राऊत याने आपला कलाक्षेत्रातील अनुभव ’माय महानगर’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला आहे.

लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. त्यावेळी अनेकदा बालनाट्यात कामं केली. आंतरशालेय एकांकिका स्पर्धांमधून आणि नंतर बालनाट्यांमधून कामं करत गेलो. हळूहळू त्यात बक्षिसं मिळाली. शाळेत असताना सलग तीन वर्ष बेस्ट अ‍ॅक्टर बक्षिस मला मिळालं. अजूनही माझा हा रेकॉर्ड आमच्या शाळेत कोणीही मोडलेला नाही. ते करत असताना व्यावसायिक स्वरूपातही बालनाट्य केली. त्यावेळी मी बालनाट्याच्या कामाचे मानधन घेत होतो. तेच मानधन मला माझ्या पुढील वर्षातील शैक्षणिक खर्चांसाठी उपयोगी पडायचे. माझ्या घराची परिस्थिती बेताची होती. शाळेत असताना मी लोकांच्या घरी दूध टाकायचो. हे काम करताना पुण्यातील भरतनाट्य मंदीर नाट्यगृहासमोर दुधाची सायकल लावून नाटकासाठी मेकअप करायचो आणि तिसरी बेल देऊन बालनाट्य सुरू करायचो. यावेळी एकदा पुण्यातील बालनाट्य महोत्सवाला छोट्या पडद्यावरील ’शक्तीमान’ फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी उपस्थिती दर्शवली होती.

ती पुण्यातील पाच दिवस सलग बालनाट्य स्पर्धा होती. त्या पाचही दिवसांच्या बालनाट्यात पाच वेगवेगळी बालनाट्ये सादर झाली आणि त्या पाचही नाटकांमध्ये प्रमुख भूमिकेत मीच होतो. अगदी त्या वयापासून मी ’चॅलेंज’ घेण्यास सुरुवात केली होती. या महोत्सवाला मुकेश खन्ना शेवटच्या दिवशी आले होते. तेव्हा मला सर्वोत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. उपस्थित लहान मुलांना आम्ही गोष्टीची पुस्तकं वाटली होती. त्यावेळी एक लहान मुलगी माझ्याकडे आली. तिने ते पुस्तक माझ्याकडे दिलं. सोबत स्केचपेन दिलं आणि म्हणाली ’दादा मला यावर सही दे ना…’. मला खूप आनंद झाला. माझं ते पहिलं ऑटोग्राफ होत. सहीचं ऑटोग्राफ होणं काय असतं ते त्यावेळी मी अनुभवलं. त्यावेळी ती चिमुकली म्हणाली, ’दादा तू आमच्या घरी दूध टाकतोस ना..’ मी निःशब्द झालो. माझ्या कामचं कौतूक होत होतं. माझं पहिलं ऑटोग्राफ मी देत होतो आणि एक वेगळी ओळखही त्यावेळी समोर आली होती. ही घटना कायम माझ्या आठवणीत राहणारी आहे.

- Advertisement -

शिक्षणासोबतच माझ्या घरच्या परिस्थितीमुळे माझं पैसे कमवण्यासाठीही कामं सुरूच होतं. दरम्यान प्रोडक्शनची कामं करायचो. मात्र मनात कुठेतरी एक स्वप्न उराशी बाळगून होतं की, मोठ होऊन अभिनेता व्हायचं आहे. तेच स्वप्न घेऊन मी मुंबईत आलो. या स्ट्रगलच्या काळात माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार हा रिअ‍ॅलिटी शो. हा माझ्यासाठी आतापर्यंतचा दि बेस्ट काळ होता. हा काळ मी स्वतः खूप एंजॉय केला. खरंतर त्या आधीपासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. मुंबईत 2007 साली स्ट्रगलसाठी आलो. पण 2002 पासून मी ई टीव्हीवरील ’चांदा ते बांदा’ हा कार्यक्रम करत होतो. ज्या ठिकाणी स्पॉटबॉय म्हणून कामं केलं तिथेच पुढे शोचा कोअँकर झालो. त्यानंतर अनेक कार्यक्रम, एपिसोडची कामं, प्रोडक्शनची कामं, व्यावसायिक कामं करत होतो. दरम्यान, वळू हा चित्रपट आणि आणखी दोन सिनेमे केले. पण म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. लोकांपर्यंत पोहोचलो नाही. रिअ‍ॅलिटी शो हे लोकांपर्यंत पोहोचण्याच उत्तम माध्यम असतं. मला पब्लिसिटी हवी आहे, यात शंका नाही. तेवढ्याकरताच मी काम करतोय आणि ते मला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. याकरता महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोच्या ऑडीशनला गेलो. तिथे 9 हजार लोकांनी अर्ज केला. त्यातून 75 लोकांना निवडलं आणि त्यातही अंतिम 24 जणांची निवड झाली. त्यामध्ये मी होतो. त्या 24 मधून शोचा उपविजेता ठरलो. त्या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज कुठे ना कुठे चांगलं काम करतोय. ते दिवस विसरणं शक्य नाही.

हे सगळं सुरू असताना माझ्या घरच्यांचाही या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतं होता. वडिलांची कंपनी लॉकआऊट झाल्यामुळे मी घराची जबाबदारी घ्यावी ही त्यांची माफक अपेक्षा होती. मुलांनी शिकून चांगली नोकरी करावी असं एका बापाला वाटणं यात काहीच चूक नाही. त्यांनी माझ्या अभिनयावरील प्रेमाला सपोर्ट केला. पण याकडे एक छंद म्हणून बघ, इतकचं ते सांगत होते. त्यांचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन वदलला तो माझ्या वळू या चित्रपटानंतर. सिनेमा पाहून त्यांनी विरोध कमी झाला. परंतू महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोचा उपविजेता ठरल्यानंतर तर त्यांचा विरोध पूर्णपणे मावळला. त्यावेळी वडिल स्वतः वोट करा, हे पोस्टर बॅनर, भिंतीवर लावायचे. माझ्या प्रवासात सगळ्यांनीच साथ मला दिली. पण सगळ्यात मोठी साथ दिली ती आईने. ती सतत प्रोत्साहन देत राहिली.नुकताच ’फर्ंजद’ हा माझा सिनेमा प्रेक्षकांनी पाहिला आणि पुन्हा एकदा माझ्या कामासाठी माझं कौतूक झालं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्यातील प्रमुख बहीरजी नाईक यांचा साथीदार ’किसना’ ही भूमिका मी साकारली. लेखल दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मला ही भूमिका साकारण्याची संधी दिली. फर्ंजदचा एक भाग झाल्याचा मला अभिमान आहे.

- Advertisement -

सध्या रंगभूमीवर सुरू असलेल आमचं नाटक ’चॅलेंज’ हा माझ्या वैयक्तीक आयुष्यातही महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या नाटकात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. दरम्यान, मनाजोग्या भूमिका मिळत नसल्यामुळे मला आलेलं नैराश्य या व्यक्तीरेखेमुळे दूर झालं. आपल्याला काम येत नाही. लोकांना आपल काम आवडत नाही का, यामुळे माझा आत्मविश्वास ढळू लागला. त्या दरम्यान मला चॅलेंजची ऑफर आली. सावरकर यांची भूमिका करण आणि त्यातून लेखकाने दिलेले पल्लेदार वाक्य बोलायची यासाठी खूप मेहनत घेतली. मला या व्यक्तीरेखेनी एक वेगळा आत्मविश्वास दिला. एक दिशा दिली. यापुढे निखिल राऊत कधीच नैराश्यात जाऊ शकत नाही.

  महानगराने मला आपलं म्हटलं

मुंबई महानगराने मला खूप काही दिलं. प्रेम दिल, राहायला जागा दिली, काम दिलं. मित्र दिले. जीवनाला गती दिली, कामाची जिद्द दिली, स्वप्न दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं म्हटलं. स्ट्रगलसाठी महानगरात आलो. तेव्हा डोक्यावर छप्पर नव्हतं. तेव्हा दादर टीटीजवळ झोपायचो. समोर सुलभमध्ये फ्रेश व्हायचो, मग ऑडीशनला जायचो. काही कामं मिळवली आणि राहायची गरज भासू लागली. दादरला एका मित्राच्या घराच्या गच्चीवर राहायला लागलो. त्यानंतर कालांतराने पार्ल्यात राहू लागलो. नंतर गोरेगाव आणि आता बांद्रा येथे कलानगरमध्ये राहत आहे. त्यामुळे या स्वप्ननगरीलाही मला खूप काही द्यायचं आहे. मी माझ्या कामातून या महानगराला देण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई पोलीस, ठाणे ट्रॅफिक पोलीस यांच्यासाठी मी काम करत आहे. पण अजून या महानगरासाठी काम करायला, त्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करायला मला नक्कीच आवडेल.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -