घरमुंबईगणेशोत्सवातील फुलवाला ; इम्रानच्या सजावटीला मागणी

गणेशोत्सवातील फुलवाला ; इम्रानच्या सजावटीला मागणी

Subscribe

मुंबईचा गणेशोत्सव सर्वधर्मीय मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात. धार्मिक भेदभाव येथे गळून पडतात. विसर्जनावेळी मुस्लीम मोहल्ल्यातून गणपती मिरवणूक जाताना श्रद्धेने बाप्पाला निरोप दिला जातो. याही पुढे जाऊन एक मुस्लीम बांधव बाप्पाचा फ़ुलवाला बनला आहे

मुंबईचा गणेशोत्सव सर्वधर्मीय मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात. धार्मिक भेदभाव येथे गळून पडतात. विसर्जनावेळी मुस्लीम मोहल्ल्यातून गणपती मिरवणूक जाताना श्रद्धेने बाप्पाला निरोप दिला जातो. याही पुढे जाऊन एक मुस्लीम बांधव बाप्पाचा फ़ुलवाला बनला आहे. इम्रान चौधरी असे त्याचे नाव आहे. लहानपणापासून झालेले गणेशोत्सवाचे संस्कार यामुळे त्याला फुलांच्या सजावटीच्या व्यवसायात येण्यास भाग पाडले. यामुळे झालेली भरभराट म्हणजे गजाननाने दिलेला आशिर्वाद आहे, असे इम्रानचे म्हणणे आहे. गणपती सजावटीच्या व्यवसायातून इम्रानची १० ते १५ लाखांची वार्षिक उलाढाल आता होत आहे

मालाड येथे राहणारा इम्रान सात वर्षांपासून फुलांच्या सजावटीने बाप्पाची आरास सजवत आहे. इम्रानला लहानपणापासून गणेशोत्सवाचे खास आकर्षण होते. २०१० साली त्याने व त्याच्या मित्रांनी त्यांच्या चाळीमध्ये गणेशमूर्ती बसवायला सुरुवात केली. मंडपापासून सजावट या कामात इम्रान सर्वात पुढे असायचा. त्याला बाप्पाची सजावट करायला खूप आवडायचे; पण हीच आवड त्याला आर्थिक फायदा मिळवून देईल हे कधी त्याला वाटले नव्हते. गणेशोत्सवातील अनुभवानुसार २०१३ साली तो फुलांच्या सजावटीच्या व्यवसायात उतरला. २०१४ साली विलेपार्ले येथील वामनपाड्याचा राजा, पीएनबी कॉलनीचा राजा आदी ठिकाणी आरास बनविली. हळूहळू नाव होऊ लागले. २०१६ साली मुंबईच्या मोठ्या मंडळांची ऑर्डर मिळू लागली. काळाचौकी येथील अभ्युदय नगरच्या राजासाठी त्याने फुलांचा २० फूट उंच मोर बनविला. येथील काम पाहून त्याला चिंचपोकळीची आई भवानीची ऑर्डर मिळाली. तसेच २०१७ साली चिंचपोकळीचा चिंतामणीच्या पाद्यपुजनाची ऑर्डर मिळाली. तिथे इम्रानने दोन छोटे मोर बनविले होते. २०१८ साली त्याने लालबागच्या राजाच्या पाद्यपुजनावेळी फुलांची आकर्षक सजावट केली होती. अभ्युदय नगरच्या राजाच्या आगमनाच्या वेळी २० फुटांचा फुलांचा पंचमुखी नाग बनविला होता. यंदाच्या गणेशोत्सवात त्याला मोठ्या मंडळांच्या ऑर्डर्स आल्या आहेत.

- Advertisement -

व्यवसाय सुरू केला त्यावेळी इम्रानसोबत दोन कामगार होते. आज पाचजण त्याच्या साथीला आहेत. संजय पटेल, उमेश हुमणे, हर्षल खोत या मित्रांनी साथ दिल्यामुळे व्यवसाय वाढवण्यास मदत झाली. पूर्वी हस्तकौशल्याने आरासाची डिझाईन इम्रान तयार करत असे, आता या कौशल्याला संगणकाची जोड मिळाली आहे. मोठ्या सजावटीचे काम करण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात. थर्माकोल बंद झाल्यामुळे अडचणी येतात. पण आम्ही त्यावर पर्याय काढला आहे, असे इम्रान यांनी सांगितले. जी प्रतिमा बनवायची असते, त्यासाठी आधी लाकडाचा साचा निर्माण केला जातो. त्यावर फुले लावली जातात. नुकताच भव्य पंचमुखी नाग बनविला. त्यासाठी अडीचशे किलो गोंडा, २०० बंडल गुलाब (एका बंडलमध्ये २० गुलाब असतात) वापरण्यात आले. तसेच कित्येकवेळा ऑर्डरसाठी ऑर्किड, शेवंतीचा वापरही होतो. बंगळूरू, पुणे, नाशिक, उटी, दिल्ली, बँकॉक आदी ठिकाणांहून फुले मागविली जातात, अशी माहिती इम्रानने दिली.

गणेशोत्सवावेळी मला नेहमीच मानसन्मान मिळाला आहे. कोणताही धार्मिक भेदभाव दिसला नाही. मुंबईच्या गणेशोत्सवात नेहमीच एकोपा नांदतो. सर्वधर्मसमभावाचे हे प्रतिक आहे,
– इम्रान चौधरी

- Advertisement -

इम्रानचे सजावटीचे काम सुंदर असते. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून तो आमच्या मंडळाचे काम करत आहे. त्याने सजवलेली आरास ही नेहमी बघण्यासारखी असते. त्याच्या कामामुळे आमच्या मंडळाची शोभा वाढण्यास मदत होत आहे. – अविनाश मिठबांवकर, कार्यकर्ता,
अभ्युदय नगरचा राजा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -