घरफिचर्ससारांशझणझणीत ‘लंडन मिसळ’

झणझणीत ‘लंडन मिसळ’

Subscribe

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आयकॉनिक चित्रपट ‘बनवाबनवी’ला मानवंदना देणारा ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट सहजसुंदर बनला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. म्हणूनच हा चित्रपट भावतो.

मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक नव्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे. अशातच आता आणखी एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये गाजलेलं नाव म्हणजे भरत जाधव. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत, मात्र गेली अनेक वर्षे ते सिनेसृष्टीपासून दूर आहेत. ‘लंडन मिसळ’ या नव्याकोर्‍या चित्रपटातून भरत जाधव आपल्या भेटीला आला आहे व त्याच्या भन्नाट अभिनयाने मन जिंकून गेला आहे.

खूप दिवसांनी कोणता तरी सिनेमा पाहून रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. खरंतर ह्या सिनेमाच्या नावातच गंमत आहे. ‘लंडन मिसळ’ अगदी याच्या नावाप्रमाणेच याचं वर्णन करायचं झालं तर एकदम झणझणीत तर्रीदार मिसळ खाल्ली की तीची चव जशी दिवसभर जिभेवर रेंगाळत राहते तसा हा सिनेमा आपल्या डोक्यात बघितल्यानंतर रेंगाळत राहतो व सुखद आनंद देतो. जालिंदर कुंभार सरांची अतिशय सुरेख कथा व त्याला न्याय देणारं दिग्दर्शनही त्यांनीच केलंय.

- Advertisement -

त्याबद्दल त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्यात अभिनेते भरत जाधव यांच्या अभिनयाची मेजवानी असेल तर बातच न्यारी असते. मी या सिनेमाबद्दल फार काही सांगणार नाही. कारण मग त्याची गंमत उरणार नाही. फक्त एवढंच सांगेन की या अनोख्या मिसळीची चव चाखून आलोय. तुम्हालाही हा झणझणीत अनुभव घ्यायचा असेल तर जवळच्या चित्रपटगृहामध्ये लवकरात लवकर जा.

ज्यांना माहीत नाही की मिसळ पाव काय आहे त्यांच्या माहितीकरिता, मिसळ म्हणजे तर्री असलेला झणझणीत रस्सा, जो चिवडा अथवा फरसाण आणि पावासोबत एकत्रितपणे खाल्ला जातो. त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीरही वापरली जाते. मिसळसाठी मसालेदार तर्री तयार करण्याकरिता सामान्यत: मटकीचा वापर केला जातो. पाव हा एक प्रकारचा ब्रेड आहे जो भारताच्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, जो सामान्यतः मिसळसोबत खाल्ला जातो. मिसळ ही खरंतर तिखट आंबट चवीची असते, परंतु प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे खाल्ली जाते. बर्‍याचदा शहराच्या नावावरून तिला ओळखले जाते. उदाहरणार्थ पुण्यात तिला पुणेरी मिसळ, नाशिकमध्ये नाशिकची मिसळ तसेच कोल्हापुरी मिसळ, नगरची मिसळ, सोलापूरची मिसळ असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे या मिसळवर आधारित असणारा ‘लंडन मिसळ’ सिनेमा हा नावाप्रमाणेच भन्नाट आनंद देणारा आहे.

- Advertisement -

एबी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट प्रस्तुत तसेच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट भन्नाट झाला आहे. चित्रपटाद्वारे भरत जाधव बर्‍याच वर्षांनी मोठ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप गायनदेखील केलं आहे.

‘लंडन मिसळ’ चित्रपटाची, चित्रपटातील गाण्यांची रसिक प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटाची रंगत वाढवली आहे. या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ‘बकेट लिस्ट’, ‘बॉईज’, ‘डार्लिंग’, ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या चित्रपटांतून मुख्य भूमिका साकारत रितिका श्रोत्री हिने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या ‘लंडन मिसळ’ची सर्वत्र हवा आहे. या चित्रपटात रितिका दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. दुहेरी भूमिकेत रितिकाने गाजवलेला मोठा पडदा प्रेक्षकांची नक्कीच मनं जिंकणार आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रेरित आहे.

आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणार्‍या दोन सख्ख्या बहिणींची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. रितिका यातील रावी ही भूमिका साकारत आहे. याशिवाय नायक म्हणून ती ‘रवींद्र’ हे पात्रदेखील साकारताना दिसणार आहे. रितिकासह ‘लंडन मिसळ’ चित्रपटात ऋतुजा बागवे, गौरव मोरे, माधुरी पवार, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत, तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसले आहेत.

‘लंडन मिसळ’ चित्रपटाचे शूटिंग भारतात तसेच लंडनमध्ये करण्यात आले आहे. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून प्रेरित आहे. चित्रपटाची कथा आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणार्‍या दोन सख्ख्या बहिणींची आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे ‘लंडन मिसळ’. या चित्रपटात नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे.

‘लंडन मिसळ’चे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत. सहनिर्माते सानिस खाकुरेल आहेत, तर सहयोगी निर्मात्या वैशाली पाटील आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली, तर पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. वैशाली सामंत, रोहित राऊत, वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. ‘बाईपण भारी देवा’च्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या साई-पीयूष या संगीतकारांच्या जोडीनं ‘लंडन मिसळ’चं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे. वैशाली सामंंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कर्‍हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -