घरफिचर्ससारांशअधिकाचे वाण!

अधिकाचे वाण!

Subscribe

त्या दिवशी पुराणिकबुवांनी धोंड्या म्हणजे पुरुषोत्तम-अधिक मासाची गोष्ट सांगितली होती. त्यांनी सांगितलेली गोष्ट काही मी ऐकली नाही, पण तिथून आलेल्या बायकांना त्या अधिक महिन्यात ३० आणि ३ पदार्थांचे यथाशक्ती दान करायचे असते हे मात्र कळले होते. त्या दिवशी मला खास माहिती देणारी कोना, तिनं मला विचारलं, धोंड्या मासात काही दिलं तौ चालसीन का? कोणाला द्यायचं? मी विचारलं. भटजीबुवाला, तिनं सांगितलं. मी मान उडवली, पण कोना आणि तिच्या मैत्रिणींच्या डोक्यात ३० आणि ३ पदार्थांचे दान करायचं हे पक्कं बसलं होतं. कोनाबाई म्हणजे सगळ्या बायकांची म्होरक्याच होती. अडलेले बाळंतपण असो किंवा साप डसला असो तिच्याकडं औषधे असायची.

–मंजूषा देशपांडे

एका अधिक महिन्यात मी छत्तीसगडमध्ये रामगढ इथे मोरिया गोंडाच्या संस्कृतीचा अभ्यास करीत होते. मध्य प्रांत आणि उत्तरेतील आदिवासींच्यातले महिने पौर्णिमेपासून सुरू होतात. त्यांना अधिक महिना माहीत नसतो. त्यावेळी खरंतर मलाही अधिक महिना आल्याची काही खबर नव्हती, पण त्या पाड्यात एक मोठं शिवमंदिर होतं. तिथे एक पुराणिकबुवा यायचे. संध्याकाळी बाया आणि बापे कथा ऐकायला तिथे जमायचे. त्याचं आणखी एक कारण म्हणजे पुराणिकबुवांच्या कथा सांगून झाल्यावर त्यांचा एक शिष्य पोहे, लाह्या, डाळ, काकडीच्या फोडी, पेरू, केळी, लिंबाचं लोणचं, थोडे दही, दूध घालून भरपूर गोपाळकाला तयार करायचा. पुराण संपेपर्यंत तो शिष्य मोहाच्या पानांचे मोठाले द्रोण करायचा आणि मोठ्या द्रोणातून तो गोपाळकाला जमलेल्या प्रत्येकाला द्यायचा. मलाही तो गोपाळकाला खायला फार आवडायचे. त्यामुळे मीही अधूनमधून पुराण संपल्यावर तिथे जाऊन यायचे.

- Advertisement -

त्या दिवशी पुराणिकबुवांनी धोंड्या म्हणजे पुरुषोत्तम-अधिक मासाची गोष्ट सांगितली होती. त्यांनी सांगितलेली गोष्ट काही मी ऐकली नाही, पण तिथून आलेल्या बायकांना त्या अधिक महिन्यात ३० आणि ३ पदार्थांचे यथाशक्ती दान करायचे असते हे मात्र कळले होते.
त्या दिवशी मला खास माहिती देणारी कोना, तिनं मला विचारलं, धोंड्या मासात काही दिलं तौ चालसीन का?
कोणाला द्यायचं? मी विचारले
भटजीबुवाला… तिनं सांगितलं.
मी मान उडवली, पण कोना आणि तिच्या मैत्रिणींच्या डोक्यात ३० आणि ३ पदार्थांचे दान करायचं हे पक्कं बसलं होतं.
कोनाबाई म्हणजे सगळ्या बायकांची म्होरक्याच होती. अडलेले बाळंतपण असो किंवा साप डसला असो तिच्याकडं औषधे असायची. त्याशिवाय कधी दूधमोगीचा (तिथली देवी) तर कधी सूर्या देव तर कधी शंभू महादेव यांचा कोप झाला असेल तर तेही तिला माहीत असायचे. त्यावरचे उपायही तिलाच माहिती असायचे. तिथल्या डुकर्‍या भगताशी तिचे मुळीच पटायचे नाही. कारण तो काही झालं तरी उठसूठ कोंबडं कापायला सांगायचा. ते आमच्या कोनाबाईला मुळीच पटायचे नाही. बोरं, कंदमुळं किंवा मोहाची फुलं घातली तरी देवतांचा कोप जातो, असे कोनाबाईचे म्हणणे असायचे,
पण दर तीन-चार महिन्यांनी महादेव मंदिरात येणार्‍या पुराणिकबुवांबद्दल तिला मोठी भक्ती वाटायची. त्यांचे एक पुराणही ती चुकवत नसे.
ते पुराणिक बुवा प्रत्येक वेळी साधारण आठवडाभर पुराण सांगत. आठवड्याच्या शेवटी तिथले सर्वजण मिळून त्यांना जेवायला घालत. जेवण साधेच असे. भात, डाळीचं तिखट वरण, कसली तरी पालाभाजी आणि कुटकीचे गोड लाडू. त्याचबरोबर कोणी कोणी मध, धान, शिंगाडे, बोरं, कवठ, औषधी मुळ्या हेही त्यांना देत असत, पण यावेळी तिथे अधिक महिना असल्याची गोष्ट सांगितली होती. त्या महिन्यात काही दान केलं पाहिजे हे कोनाबाईच्या डोक्यात पक्कं ठसलं होतं. ते तिनं इतर बायांच्याही गळी उतरवलं होतं.
मी तर म्हटलं, पुराणिकबुवांना जेवायला घालून त्यांना काय काय देता, ते दानच अजून काय दान द्यायचं?
त्यावर नेहमी देतो त्यापेक्षा जास्त द्यायचं असतं तरच नारायण देवाचीही कृपा होईल, असं कोनाबाईचं म्हणणं पडलं.
पुराणिक बुवांना ३० आणि ३ असंच दान दिलं पाहिजे असं तिचं म्हणणं होतं.
३० आणि ३ नाणी द्यावी का, असा विचार झाला, पण पुराणिकबुवा पैसे घेत नसत. कोणी पैसे दिले तरी जाताना ते तिथल्या सरपंचाच्या हाती पैसे देऊन जात. मग काय कुटकीचे लाडू द्यावे का, असाही विचार झाला, पण पुराणिक बुवांचे दात तितकेसे चांगले नव्हते. ते एखादा लाडू कसाबसा खात. एवढे लाडू दिल्यावर त्यांचे सगळेच दात पडले असते. त्यामुळे कुटकीचे लाडूही बाद झाले. शेवटी सर्वानुमते खडीसाखरेचे ३० आणि ३ खडे द्यायचे ठरले.
अजून काहीतरी वस्तूही भेट म्हणून देतात, मी उगीचंच म्हटले. अर्थातच मी नंतर सारवासारव केली तरी एकदा म्हटलेलं तेही त्यांच्या डोक्यात पक्कं बसलंच.
त्यानंतर दोन-तीन दिवसांनी पुराणिकबुवांचं त्यावेळचं शेवटचं पुराण होतं. शेवटच्या दिवशी महादेव मंदिरात पुराण झाल्यावर गावजेवण होतं. संध्याकाळपासूनच भात आमटी रांधली होती. खीर केली होती.
देवळाचा परिसर स्वच्छ केला होता. पांढर्‍या आणि पिवळसर कुंतीच्या फुलांनी महादेवाची पूजा बांधली होती. नंदीलाही माळा घातल्या होत्या. जेवायला पत्रावळी मांडलेल्या होत्या. जेवणाअगोदर पुराणिकबुवांना एका कठड्यावर घोंगडी घालून बसवलं. त्यांच्या गळ्यात रानगुलाबाची माळ घातली. मोहाच्या पानांच्या पत्रावळीवर खडीसाखरेचे खडे मांडले. त्यांच्यासमोर खापराच्या दिवल्यात करंजीचे तेल घालून दिवे ठेवले. तिथला भुर्‍या कुंभार खापराच्या एकावर एक अशा इतक्या सुंदर पणत्या बनवायचा की बस! त्यात एकावेळी दहा वाती लावता यायच्या. त्या पणत्यांना जोडून एका साखळीने तो दिवा अडकवताही यायचा. त्यानंतर सरपंच भुल्याने ३० आणि ३ कापडाच्या तुकड्यांची लाल गोंडे लावलेली शाल पुराणिकबुवांच्या अंगावर घातली.
ती शाल इतकी सुंदर विणलेली होती की पाहत राहावी. रायपूरच्या एका ठेकेदाराकडून तिथल्या शिंप्याच्या दुकानातले तुकडे आणि गोंडे मागवले होते. त्या तुकड्यांवर आरसे आणि भरतकाम केले होते. मग ते सगळे तुकडे मोठ्या लाल आणि पांढर्‍या जाड दोर्‍यांनी विरळपणे एकमेकांना जोडून जाळीदार शाल विणलेली होती. हे सगळं अक्षरशः दोन दिवसांतच पूर्ण केलं होतं. पुराणिकबुवांना आश्चर्यच वाटले. आनंदही अर्थातच झाला.
कोनाबाईनं सांगितलं, ती शाल, खडीसाखर आणि दिवा म्हणजे धोंड्याचं वाण आहे.
पुराणिकबुवांना जरा लाजल्यासारखं झालं.
त्याची काही गरज नव्हती हो कोनाबाई, पुराणिकबुवा म्हणाले.
नाही कसं, नारायण विष्णूचा आशीरवाद आम्हाला पण हवाच की! भुल्या सरपंच म्हणाला.
हे सगळं मला आता आठवायचं कारण म्हणजे सध्याही अधिक महिना सुरू आहे. माझ्या ओळखीच्या एका घरी जावयाला बोलावून सासूबाईंनी चांदीच्या ताटात ३० आणि ३ अनारसे, २ चांदीची निरांजने दिली. आमच्यासारख्या बर्‍याच मित्रमंडळींना जेवायला बोलावून दणक्यात अधिक महिना साजरा केला.
मला त्यावेळी रामगढच्या त्या अधिक महिन्याची आठवण झाली. आपल्याकडे जावयाला दान देण्यामागे आपल्या मुलीचा आनंद पाहिला जातो, पण कुणीतरी सांगितले म्हणून का असेना पण आपल्याजवळ देण्यासारखे जे आहे ते दुसर्‍याला द्यावे यामागे कोणती प्रेरणा असेल. देवाने निर्माण केलेल्या माणसांमधल्या अनेक चांगल्या गोष्टींपैकी ती सर्वात सुंदर गोष्ट आहे. त्यासाठी अनेक निमित्तही असतात. त्यातला एक म्हणजे हा अधिक महिना. आपल्याकडे थोडे अधिक यावे आणि जे अधिक असेल ते दुसर्‍यांनाही देऊन त्यांचाही आनंद द्विगुणित करावा तसे ते वाण! एकमेकांना द्यावे, घ्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -