घरलाईफस्टाईलमुलांच्या कलागुणांना वाव द्या

मुलांच्या कलागुणांना वाव द्या

Subscribe

आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या पाल्याने सरशी करावी असे सर्वच पालकांचे स्वप्न असते. परिणामी पाल्याला शहरातील नावाजलेल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालक धडपड करतात. मात्र केवळ चांगल्या शाळेची निवड यावरच पाल्याचे भवितव्य अवलंबून नसून त्याच्या कलागुणांना वाव देण्याची जबाबदारी शाळेएवढीच पालकांचीही आहे. अभ्यासासोबतच त्याच्या अंगभूत गुणांना वाव देण्याचाही हाच कालावधी असतो. कारण याच काळात लहान मुलांमध्ये अंगभूत गुणांची वाढ होत असते. म्हणून अभ्यासासोबत त्याच्यातील कलागुणांना किंवा त्याच्यातील कौशल्यांनाही वाढवलं पाहिजे. त्यामुळेच एक पालक म्हणून तुम्ही काय करू शकता त्याविषयी खास…

मुलांच्या कलागुणांचे कौतुक करा – तुम्ही तुमच्या मुलांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांच्या विश्वात रममाण होता आले पाहिजे. यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यातील तुमचे अनुभव पाल्याशी शेअर करू शकता. तसेच आपल्या पाल्यामध्ये असलेल्या कलागुणांचे कौतुक करा. त्याच्या अभ्यासाचे बारकाईने निरीक्षण करा. शैक्षणिक कौशल्यांसह इतर कौशल्यात पाल्य पारंगत असल्यास त्याला प्रोत्साहन द्या. तसेच कौशल्ये विकसित होण्यासाठी लागणारा वेळ पाल्याला देणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

वेळेचे महत्त्व पटवून द्या – मुलांना वेळेचे महत्त्व माहीत असणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, म्हणून मुलांना सुरुवातीपासूनच वेळेचा सदुपयोग करायला शिकवा. त्याच्यातील गुणांना शोधून त्या गुणांना विकसित करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आवश्यक चांगल्या शिक्षकांचा शोध घ्या. वेगवेगळ्या स्पर्धा पाहायला तसेच स्पर्धेत सहभाग घ्यायला त्याला मार्गदर्शन करा. यामुळे त्याला स्पर्धेविषयी आवड निर्माण होईल व त्याची कष्ट करण्याची व यशस्वी होण्याची धडपड सुरू होईल.

श्रमाचे महत्त्व पटवून द्या – आयुष्यात श्रमाचे महत्त्व माहीत असणे मुलांसाठी आवश्यक आहे. मुलाला चांगल्यात चांगली कामगिरी करता यावी यासाठी त्याच्या पातळीनुसार आव्हानेही द्या. यातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वातून भविष्यातील आव्हानांना तो सहज सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच त्याला श्रमाचे महत्त्व पटवून द्या. लहानपणापासून मुलांवर श्रम संस्काराची जोपासना करा. श्रम किती महत्त्वाचे आहेत व श्रमाने आपली बौद्धिक आणि शारीरिक वृद्धी होत असते हे त्याला पटवून द्या.

- Advertisement -

मुलांना मोकळीक द्या – सतत केवळ अभ्यास केल्यानेच पाल्याचे भवितव्य उज्ज्वल होईल असा काही पालकांचा गैरसमज असतो. परिणामी अभ्यास कर म्हणून पालक मुलांच्या मागे धोशा लावतात. परिणामी मुलांमधील इतर कौशल्ये विकसित होत नाहीत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यावर सतत एकाच गोष्टींचा भडिमार करू नका. मुलाला त्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेशी मोकळीक द्या. मुलाला त्याच्या कामात प्रायव्हसी द्या, त्याला त्याचा स्पेस द्या. यामुळे तो बौद्धिक व शारीरिक सक्षम होईल; पण स्पेस देताना त्याच्याकडे लक्षही राहूद्या.

मुलांच्या आवडी जोपासा : मुलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यासाठी त्यांना प्रेरणा द्या. आवडीच्या क्षेत्रातील गोष्टी जमविण्यासाठी त्यांना मदत करा. जसे की, मुलाच्या आवडीच्या क्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, व्हिडिओ त्याच्यासाठी खरेदी करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -