घरमहाराष्ट्रभाजपच्या घसरगुंडीला जबाबदार कोण ?

भाजपच्या घसरगुंडीला जबाबदार कोण ?

Subscribe

राज्यात पुन्हा एकदा भाजप- शिवसेना आणि अन्य पक्षांच्या महायुतीचे सरकार स्थापन होण्यास दिवाळी उलटून जाणार आहे. मात्र स्वबळावर सत्तेची स्वप्ने रंगवणार्‍या भाजप नेत्यांनी अद्याप राज्यातील घसरगुंडीची जबाबदारी नेमकी कुणाची? यावर काहीही भाष्य केलेले नाही.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील 227 विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे महायुतीतील हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीतही या 227 जागा आपल्यालाच मिळणार अशा गोड स्वप्नात रममाण झाले होते. मात्र जसे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली तसे भाजप व सेनेने विरोधी पक्षातील एकेक मोहरे स्वतःकडे ओढायला सुरुवात केली. यात कर्तेकरविते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते. त्यातही आधी भाजपकडे आयारामांची भरती ओव्हरफ्लो झाली तेव्हा त्यातील काही मोहरे शिवसेनेकडे पाठवण्यात आले.

- Advertisement -

मोदींचा नारा काँग्रेसमुक्त भारतचा होता. मात्र त्याचा राज्यातील भाजप नेत्यांनी स्वतःच्या राजकीय लाभासाठी भाजपयुक्त काँग्रेस राष्ट्रवादी असा सोईस्कर अर्थ काढत ही मेगा भरती केली. मात्र हे करताना ज्या विरोधकांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप उठवत काहुर माजवले होते. त्यांनाच स्वतःच्या पक्षात घेऊन क्लिनचिट देण्याचा लावलेला सपाटा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि अगदी विदर्भातील जनतेच्याही पचनी पडलेला नाही. मुळात ही रणनितीच प्रचंड जोखमीची होती. भाजपचा परंपरागत मतदार हा सूज्ञ आहे. मात्र 2014 नंतर मोदींमुळे जो नवीन मतदार भाजपशी जोडला गेला होता त्याला या रणनितीमुळे अत्यंत घातक संदेश दिला गेला हे भाजपतील चाणक्यांना लक्षातच आले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा हा खरे तर भाजपच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा प्रचार मुद्दा असायला हवा होता. कारण एवढ्या रणधुमाळीतही विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर तसे कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. तसेच राज्य सरकारची विकासकामेही दुर्लक्षित राहिली. शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्र, स्थानिक समस्या, याबाबत महायुतीमधील ना भाजपा नेते बोलले ना सेना नेते बोलले. साहजिकच उदासीन काँग्रेस- राष्ट्रवादीच्या हातात हे आयते कोलीतच मिळाल्या सारखे झाले.

- Advertisement -

त्यातच लोकसभा निवडणुकीत निष्प्रभ ठरलेल्या शरद व पवारांसारख्या मातब्बर आणि मुरब्बी नेत्याला इडीत अडकवण्याचा प्रयत्न हीट विकेट ठरला. ग्रामीण भागाची सहानुभूती पवारांच्या पाठीशी उभी करण्याचे काम ईडीने करुन टाकले. पवारांनी तेथेच राज्यातील बदलेल्या मानसिकतेची नस बरोबर हेरली. जे काम शिवसेनेसारखी आक्रमक संघटना भाजप बरोबर सत्तेत असताना करु शकली नाही ते काम शरद पवारांसारख्या विरोधी पक्षातील लढवैय्या नेत्याने करुन दाखवल्याने भाजपाविरोधी मतांचे काँग्रेस- राष्ट्रवादीकडे ध्रुवीकरण होण्यास मोठा हातभार लागला.

त्यातच पवारांनी सातारमधील ऐतिहासिक सभेत भर पावसात भिजत भाषण करुन त्यांचा भाजप विरोध किती टोकाचा आहे हे लोकांना दाखवून दिले. शरद पवार जिंकले ते इथे आणि भाजप व शिवसेना हरली ती ही इथेच. पवारांनी जे काही मास्टर स्ट्रोक्स मारायला सुरुवात केली की ते भाजप सेनेच्या डोक्यावरुन गेले.

एकहाती कारभार भोवला ?

महाराष्ट्रातील प्रचाराची सारी धुरा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती. मात्र अमित शहा यांनी 370 च्या कलमाभोवती प्रचार घुटमळत ठेवला. तर देवेंद्र फडणवीस हे विरोधकांपेक्षा स्वपक्षातील नेत्यांना वेसण घालण्यात , त्यांचे पत्ते कापण्यातच अधिक अडकून पडले. स्वपक्षातील मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक दूर करण्यात त्यांना अफलातून यश आले. मात्र शरद पवारांसारखा तेल लावलेला पैलवान मात्र त्यांच्या हातून निसटला. स्वकेंद्रीत कारभार फडणवीसांच्या डोकेदुखीत भर घालणारा ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -